फोटो – ANI

कोरोना व्हायरसशी लढण्याचे दोन वेगळे मॉडेल सध्या जगात आहेत. पहिलं ऑस्ट्रेलियन मॉडेल जिथं कोरोना काळात अगदी कडक लॉकडाऊन आणि निर्बंध लागू आहेत. दुसरं इंग्लंडचं मॉडेल जिथं कोरोना वाढत असला तरी सर्व काही प्रचंड गर्दीत आणि उन्मादी वातावरणात (युरो कप फायनल काळातील राडा) साजरे होत आहे. भारत देशाचे मॉडेल या दोन टोकाच्यामध्ये आहे. पण योगायोगाची गोष्ट अशी की टीम इंडियाला या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टोकाच्या कोरोना मॉडेलमध्ये राहावे लागले आहे. यापैकी ऑस्ट्रेलिया दौरा सुखरुप पार पडला. पण, इंग्लंड दौऱ्यात मात्र ऋषभ पंतला (Pant Tests Covid19 Positive) कोरोनाची लागण झाली.

विस्तवाशी खेळल्याचा फटका

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या रोजच्या नवीन पेशंट्सचं प्रमाण मोठं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) नंतर टीम इंडियाची 20 दिवसांची सुट्टी सुरू झाली. या काळात तर हे प्रमाण चिंताजनक झालं. अगदी पाकिस्तान विरुद्धची सीरिज दोन दिवसांवर आली होती तेव्हा इंग्लंडच्या टीममधील 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) संपूर्ण टीमला आयसोलेशनमध्ये पाठवावं लागलं.

इंग्लंडच्या टीममध्ये कोरोना ब्लास्ट, पाकिस्तान सीरिजपूर्वी 7 जणांना लागण

या सर्व घडामोडी घडत असताना टीम इंडियाचे खेळाडू हे इंग्लंडमध्ये सुट्टी साजरी करत होते. कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) पासून या दौऱ्यावर गेलेल्या कोणत्याही खेळाडूचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर त्यामध्ये ते सर्व ‘जीवाचं इंग्लंड’ (Pant Tests Covid19 Positive)  करत असल्याचं दिसून येतं.

रवी शास्त्री, अश्विन हे विम्बल्डन पाहण्यासाठी गेले. ऋषभ पंत, बुमराह, हनुमा विहारी यांनी युरो कपचा आनंद स्टेडियममध्ये उपस्थित राहून घेतला. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, केएल राहुल, इशांत शर्मा हे सर्व खेळाड़ू या काळात सहकुटुंब गर्दीच्या ठिकाणी धोका पत्कारुन फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर सापडतील.

बीसीसीआयनं इशारा दिला होता!

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियामध्ये कोरनाचा शिरकाव झाल्याची बातमी उघड होताच काही तासांमध्ये आणखी एक बातमी माध्यमांमध्ये आली. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी विशेषत: युरो कप आणि विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी जाऊ नका असा स्पष्ट इशारा ईमेल द्वारे दिला होता. हे वृत्त वाचून काही प्रश्न पडले आहेत.

बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्ट सूचना केल्यानंतरही कोच रवी शास्त्रीसह काही भारतीय खेळाडू या स्पर्धा पाहण्यासाठी का गेले?  

टीम इंडियातील संबंधित खेळाडू आणि स्टाफनी या इशाऱ्याकडं दूर्लक्ष केलं असं समजावं का?

दुर्लक्ष करुन गर्दीच्या ठिकाणी फिरणाऱ्या खेळाडूंवर शिस्तभंग समिती कारवाई करणार का?

20 दिवसांच्या मोठ्या सुट्टीमध्ये इंग्लंडमधील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बदल करावा असं बीसीसीआयला का वाटलं नाही?

खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्याची विशेष परवानगी दिली असेल तर मग यापूर्वी इशारा देण्याचा काय उद्देश आहे?

टीम इंडियात कोरोना शिरल्याचं समजताच आपली प्रतिमा जपण्याच्या प्रयत्नातून जय शहांच्या ईमेलची बातमी प्रसिद्धीस आली आहे का?

हे प्रश्न फक्त भारतीय क्रिकेटबद्दल आपुलकी असलेल्या प्रत्येकाला पडले आहेत. ‘Cricket मराठी’ नं हे फक्त शब्दबद्ध केले आहेत.

मागील अनुभवानंतर शहाणपण नाही

कोरोना व्हायरसमुळेच बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली. कोरोना व्हायरसची लागण अगदी सुरक्षित भागातील व्यक्तींनाही होऊ शकते, झाली आहे. हे सर्व मान्य आहे. त्यामुळे याबाबत जास्तीत जास्त काळजी घेणे हा त्यावर उपाय आहे. पण बीसीसीआयनं टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला सुट्टी मुक्तपणे साजरी करण्याचे स्वातंत्र्य दिले.  

ऋषभ पंत (Pant Tests Covid19 Positive)  आणि टीम इंडियातील अन्य सर्व मंडळी आयसोलेशनमधून लवकर बाहेर येतील. इंग्लंड दौऱ्यात मैदानावरील किंवा पडद्यामागील भूमिका चोख बजावतील. या सर्व शुभेच्छा त्यांच्यासोबत कायम आहेत. मात्र त्याचवेळी या मोठ्या चुकांमधून शिकण्याचं शहाणपण भारतीय क्रिकेटचा गाडा चालवणाऱ्या मंडळींनी दाखवलं तरच सध्याच्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये क्रिकेटपटूंचे आरोग्य नॉर्मल राहणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading