फोटो – ट्विटर

इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs England Test Series) दोन टेस्ट वर्चस्व गाजवल्यानंतर हेडिंग्ले टेस्टमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव झाला. फक्त सीरिजचा विचार केला तर हा पराभव कदाचित खेळाचा भाग आहे, असं वाटेल. पण कॅप्टन विराट कोहलीचा दर्जा, फॉर्म, प्रतिष्ठा आणि भविष्य यासाठी हा पराभव भविष्यातील धोक्याचा इशारा (Virat Kohli Problem) देणारा आहे.

बॅटींगमधील पडझड

विराट कोहलीनं सलग आठ वेळा टॉस हरल्यानंतर हेडिंग्लेमध्ये टॉस जिंकला आणि तात्काळ  पहिल्यांदा बॅटींग घेतली. विराटनं टॉस जिंकल्याच्या आनंदात टीम इंडियाच्या बॅट्समननं अ‍ॅडलेडची आठवण व्हावी असा खेळ केला. या सीरिजमध्ये पिछाडीवर पडलेल्या इंग्लिश टीमला जीवदान देणाऱ्या खेळाची सुरुवात पहिल्याच दिवशी झाली. आपली टीम फक्त 78 रनवर ऑल आऊट झाली.

त्यानंतर इंग्लंडच्या ओपनर्सनीच टीम इंडियाचा हा स्कोअर पार केला. विराट कोहलीसह भारतीय बॅट्समननं विशेषत:  मिडल ऑर्डरनं त्याच चुका करत इंग्लिश बॉलर्ससमोर शरणागती पत्कारली. त्यामुळेच सलग दुसऱ्या विदेश दौऱ्यात जगातील बलाढ्य बॅटींग एका संपूर्ण इनिंगमध्ये तीन आकडी स्कोअरही करु शकली नाही.

विराटचे अपयश अस्वस्थ करणारे

मिडल ऑर्डर हा कोणत्याही बॅटींग ऑर्डरचा कणा असतो. हा कणाच नीट उभा नसल्यानं टीमची सतत पडझड होत आहे. विराटनं शेवटची सेंच्युरी 50 आंतरराष्ट्रीय मॅचपूर्वी झळकावली आहे. चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) सेंच्युरी झळकावून 32 महिने उलटले आहेत. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू असूनही अजूनही त्याचा टीमच्या विजयातील थेट सहभाग सातत्यानं कमी होत आहे.

या तिघांमध्येही विराटचे अपयश (Virat Kohli Problem) हे जास्त अस्वस्थ करणारे आहे. तो मनुष्य आहे. बॅड फॉर्म कुणालाही चुकला नाही. सध्या त्याचा वाईट कालखंड चालला आहे, हे ऐकण्यात आता 50 इनिंग उलटल्या आहेत. आत्मविश्वास आणि आक्रमकता ही विराटच्या खेळाची मुख्य ओळख होती. जुन्या चुका टाळणे आणि आपल्या विकेटचं मोल ओळखणे यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा होता. इतरांपेक्षा झपाट्यानं मोठा झाला.

नॉटिंघम, लॉर्ड्स किंवा हेडिंग्ले तीन्ही ठिकाणी मैदान बदललं. बॉलर बदलले. परिस्थिती देखील वेगळी होती. पण विराटची आऊट होण्याची पद्धत ही एकसारखी होती. भारतीय टीमला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यात (Virat Kohli Problem) त्याला अपयश येतंय.

इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाची मोठी डोकेदुखी, इलाज शोधला नाही तर….

खराब फॉर्मचा कॅप्टनसीवर परिणाम

विराट कोहलीच्या या खराब फॉर्मचा त्याच्या कॅप्टनसीवरही परिणाम होत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॅट्समनचं वर्चस्व होतं. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी  ज्या इटेन्स खेळासाठी विराट ओळखला जातो, तो त्याचा खेळ दिसला नाही. खराब दिवशी भारतीय बॉलर्सचा उत्साह वाढवण्यात त्याला अपयश आले. प्रत्येत सेशनची सुरुवात इशांत शर्माच्या स्पेलनं करणे आणि इशांतच्या अपयशानं दोन्ही टीमच्या धावसंख्येत वाढत जाणारं अंतर पाहणे याशिवाय विराट काहीही करु शकला नाही.

जागं होण्याची गरज कारण…

विराट कोहलीची प्रत्येक नवी होणारी इनिंग ही आता सेंच्युरीची प्रतीक्षा संपेल या आशेनं सुरू होते, आणि तितक्याच मोठ्या निराशेनं संपते. या सीरिजमध्ये बॉलर्सनी अफलातून कामगिरी करुन लॉर्ड्स टेस्ट जिंकून दिली. पण त्यानंतर इंग्लंडचे परतीचे मार्ग कापण्यात टीम इंडियाची बॅटींग कमी पडली.

टीम इंडियाच्या या खराब कामगिरीचं जनकत्व हे विराट कोहलीकडं (Virat Kohli Problem) आहे. बॅट्समन म्हणून त्याच्या हरवलेल्या फॉर्ममध्ये आहे. सभोवतालची खाली मान घालून परतणाऱ्या गर्दीचा विराट एक भाग बनला आहे, हे आता स्वीकारायला हवं.

ज्याच्या खांद्यात जग जिंकण्याचे सामर्थ्य भारतीय फॅन्सनं पाहिलं आहे. ज्याच्या बॅटनं जगातील सर्व मैदानात बॉलर्सना पाणी पाजलं आहे. ज्याची तुलना अन्य कुणाशी नाही तर थेट सचिन तेंडुलकरशी केली जाते, ज्याच्या आक्रमक खेळानं भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला त्या विराट कोहलीबद्दल सहानुभूतीचा भाव निर्माण होणे हे विराटच्या कट्टर विरोधकालाही आवडणार नाही.

भारत-इंग्लंड सीरिजचा निकाल, त्यानंतर होणारा टी20 वर्ल्ड कप जिंकणार की नाही? या स्पर्धेनंतर विराटच्या कॅप्टनसीचे भवितव्य काय असेल याचा सध्या विचार करण्याची गरज नाही. आता निर्भिडतेचा विराट कोहली ब्रँड हेंडिग्लेमधील पराभवानं धोक्यात (Virat Kohli Problem) आला आहे. तो वाचवणे हे फक्त विराटच्या हातामध्ये आहे. या सीरिजमधील उर्वरित दोन टेस्टमध्ये एखादी मोठी सेंच्युरी या ब्रँडला नवं बळ देऊ शकेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: