फोटो – ट्विटर

टीम इंडियाने दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 5 बॉल आणि 3 विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने 3 वन-डे मॅचच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) हा या विजयाचा हिरो ठरला. दीपकने 82 बॉलमध्ये नाबाद 69 रन काढत टीम इंडियासाठी अवघड बनलेल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दीपकची 69 रनची ही खेळी (Deepak Chahar Innings) त्याचे करियर ‘प्रकाश’मान करणार आहे.

अवघड परिस्थितीमध्ये विजय

श्रीलंकेच्या 276 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 7 आऊट 193 अशी झालेली असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ही जोडी एकत्र आली. भुवनेश्वर मैदानात उतरला त्यावेळी भारताला विजयासाठी 89 बॉलमध्ये 83 रनची आवश्यकता होती. सातही प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानं विजय श्रीलंकेच्या आवाक्यात आला होता. त्यावेळी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकच हाफ सेंच्युरी असलेल्या दीपकनं शांत खेळी करत श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास काढला.

दीपकने सातव्या विकेटसाठी कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) 33 तर सातव्या विकेटसाठी भुवनेश्वरसोबत नाबाद 84 रनची पार्टनरशिप केली. भारताला सर्वाधिक गरज असताना त्याने वन-डे करियरमधील पहिली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. तो अखेर 82 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 69 रन काढत नाबाद (Deepak Chahar Innings) राहिला.

दीपक आधी का आला?

दीपक चहरपेक्षा भुवनेश्वरकडं या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बॅटींग करण्याचा अनुभव जास्त आहे. त्याने 2017 साली याच परिस्थितीमध्ये श्रीलंकेविरुद्ध महेंद्रसिंह धोनीसोबत पार्टनरशिप करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. तरीही दीपक चहर भुवनेश्वरच्या आधी बॅटींगला आलेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. भुवनेश्वरनंच मॅच संपल्यावर याचं कारण सांगितलं आहे.

T20 वर्ल्ड कपच्या ‘या’ 4 जागांसाठी होणार श्रीलंका दौऱ्यातून निवड

‘दीपक, इंडिया A कडून तसेच अन्य काही सीरिजमध्ये राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली खेळला आहे. तो (चहर) बॅटींग करू शकतो आणि मोठे फटके देखील लगावू शकतो हे द्रविडला माहिती होते. त्यामुळे त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन देण्याचा निर्णय द्रविडचा होता. चहरने चांगली बॅटींग करत तो निर्णय योग्य ठरवला.’ असे भुवनेश्वरनं स्पष्ट केले.

‘माझे स्वप्न होते’

दीपक चहरनं या विजयानंतर बोलताना शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये जिंकण्याची खात्री होती, असे सांगितले. ‘या प्रकारची इनिंग खेळणे हे माझे स्वप्न होते. राहुल सरांनी मला जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा सल्ला दिला होता. मी इंडिया A कडून या प्रकारच्या काही इनिंग खेळलो आहे. त्यामुळे त्यांना मी सातव्या नंबरवरही बॅटींग करु शकेल असा विश्वास होता.

विजयाचे टार्गेट 50 पेक्षा कमी झाल्यावर आपण जिंकू याची मला खात्री झाली. त्यानंतरच मी रिस्क (Deepak Chahar Innings) घेतली. त्यापूर्वी परिस्थिती समान होती,’ असे सांगितले.

‘प्रकाश’ मान इनिंग

दीपक चहरचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीममधील सहकारी शार्दूल ठाकूरनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 5 बॉलमध्ये 15 रन करत टीमला विजय मिळवून दिला होता. या खेळीनंतर टीमचा ठाकूरवरचा विश्वास वाढला. त्यानंतर त्याने टीम इंडियाला देखील लोअर ऑर्डरमध्ये काही चांगल्या खेळी करत विजय मिळवून दिला होता. अगदी ब्रिस्बेन टेस्टही त्याने चांगली बॉलिंग करत गाजवली. बॉलिंगमध्ये फॉर्म नसतानाही केवळ त्याच्या उपयुक्त बॅटींगमुळे शार्दूलला त्या एका खेळीनंतर टीम इंडियामध्ये काही वेळा संधी मिळाली आहे.

असा घडला ब्रिस्बेन टेस्टचा हिरो ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

दीपक चहर हा बॅटींग करु शकतो हे अनेकांना माहिती होते. आयपीएल 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध त्याने एक चांगली खेळी खेळली होती. मात्र त्याची ही 69 रनची इनिंग त्याच्या करियरला निर्णायक वळण देणारी ठरणार आहे. त्याने या खेळीत कुठेही गडबड केली नाही. त्याचे रनिंग-बिटविन द विकेट चांगले होते. खराब बॉलची त्याने वाट पाहिली. रनरेट वाढणार नाही याची काळजी घेतली. योग्यवेळी फटकेबाजी केली. फटकेबाजी करण्यासाठी योग्य बॉलर निवडला. या खेळीतील (Deepak Chahar Innings) हे सर्व वैशिष्ट्य दीपकचे पुढील करियर ‘प्रकाश’मान होण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: