फोटो – ट्विटर/ICC

18 वर्षांखालील भारतीय क्रिकेटपटूनं इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात इंग्लिश बॉलर्सना पाणी पाजल्याची घटना यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पहिल्या इंग्लंड दौऱ्यात झाली होती. आता ती शफाली वर्माच्या (Shafali Verma) बाबतीमध्ये झाली आहे. या पहिल्या वाक्यात शफालीची सचिनबरोबर तुलना करण्याची घाई नाही. तर सचिननं जसा भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, तसाच भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलण्याची क्षमता शफालीमध्ये आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातच शफालीनं इंग्लंड विरुद्ध 152 बॉलमध्ये 96 रनची खेळी केली. तिला पदार्पणात सेंच्युरी करण्यासाठी 4 रन कमी पडले. पण, म्हणून शफालीच्या या शंभर नंबरी सोन्याच्या (Superstar Shafali Verma) खेळीचं महत्त्व कमी होत नाही.

‘म्हारी छोरी छोरें से कम है के’

आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातील हे टाळीफेक वाक्य फोगट भगिनींप्रमाणे ज्या मोजक्या मुलींना लागू होते, त्यापैकी एक शफाली आहे. मुलींचे जन्म प्रमाण अतिशय कमी असलेल्या हरयाणात वाढलेल्या शफालीनं वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कमी वयात पदार्पण करण्याचा सचिनचा रेकॉर्ड तिने मोडला.

शफालीचे इतक्या कमी वयातील पदार्पण हेच मुळात मोठे आश्चर्य होते. पण आपण नुसते पदार्पण करुन गायब होण्यासाठी नाही तर क्रिकेट गाजवण्याठी (Superstar Shafali Verma) आलो आहोत हे शफालीनं नंतरच्या काळात दाखवून दिलं आहे. त्यामुळेच ती वयाच्या 17 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय T20 रँकिंगमधील पहिली बॅटर बनली आहे.

मुलांच्या स्पर्धेत खेळली आणि गाजली

भारतासारख्या खंडप्राय देशातून रोहतक या क्रिकेटच्या विश्वातील एका आडवाटेवरच्या ठिकाणावरुन शफालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. शफालीचा हा प्रवास एका फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. हरयणामध्ये तिला क्रिकेट खेळण्यासाठी चांगले कोचिंग मिळत नव्हते. नकार ही नेहमीची गोष्ट झाली होती.

शफालीच्या वडील संजीव वर्मा (Sanjeev Varma) मुलीच्या पाठी पहाडासारखे उभे होते. त्यांनी शफालीचे केस कमी केले आणि तिला मुलांच्या स्पर्धेत उतरवले. 14 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत शफालीनं धमाका केला. ती नॅशनल हेडलाईन (Superstar Shafali Verma) बनली. टीम इंडियामध्ये आली.

T20 वर्ल्ड कपमध्ये शफाली

मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20  वर्ल्ड कपमध्ये (Women T20 World Cup 2020) महिला क्रिकेटची भावी सुपरस्टार असल्याचे जगाला दाखवले. तिने T20 वर्ल्ड कपमध्ये 158.25 च्या स्ट्राईक रेटनं रन काढले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 बॉल 29, बांगलादेश विरुद्ध 17 बॉल 39, न्यूझीलंड विरुद्ध 34 बॉल 46, श्रीलंकेविरुद्ध 34 बॉल 47 हे शफालीचे जगातील प्रमुख स्पर्धेत प्रमुख बॉलर्सविरुद्ध काढलेले रन होते.

शफालीनं करुन दिलेल्या आक्रमक सुरुवातीमुळेच टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरला श्वास घेण्याची संधी मिळाली. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या प्रमुख बॅटर फॉर्मात नसतानाही त्यांच्या अपयशावर पांघरुण घालण्याचे काम तेव्हा नुकत्याच 16 वर्षांच्या झालेल्या शफालीने केले. शफाली फायनलमध्ये अपयशी ठरली, त्याची मोठी किंमत टीम इंडियाला मोजावी लागली.

ब्रिस्टल टेस्टमध्ये रेकॉर्ड

ब्रिस्टल टेस्टपूर्वी शफालीला लॉकडाऊनमुळे फार सराव करता आला नाही. तिने रोहतकच्या गल्लीमध्ये क्रिकेटचा सराव केला. मोहित शर्मासह (Mohit Sharma) हरयाणाच्या प्रमुख फास्ट बॉलर्सना नेटमध्ये खेळण्याची थोडी संधी तिला मिळाली. त्या मर्यादीत अनुभवावर ती इंग्लंडमध्ये दाखल झाली. भारतीय महिला टीम 7 वर्षांनंतर टेस्ट क्रिकेट खेळणार होती. ‘नाव तेच करतात जे संधी गमावत नाहीत’  ही ‘स्टार स्पोर्ट्स’ नं तिच्यावर केलेली जाहीरात शफालीला माहिती होती. तिने ब्रिस्टल टेस्टमध्ये मिळालेली संधी गमावली नाही.

ब्रिस्टल टेस्टमध्ये 396 रनचा पाठलाग करण्यासाठी भारतीय टीम उतरली त्यावेळी तिने नवे रेकॉर्ड्स (Superstar Shafali Verma) केले. शफाली पदार्पणातील टेस्टमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणारी महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण क्रिकेटपटू बनली आहे. शफालीनं 83 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

शफाली-स्मृती जोडीनं पहिल्या विकेट्ससाठी 167 रनची पार्टरनरशिप केली. ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील टेस्टमधील सर्वोच्च ओपनिंग पार्टरनरशिप आहे. 1999 साली अंजू जैन आणि चंद्रकांता कौल यांनी केलेला 132 रनच्या पार्टरनरशिपचा रेकॉर्ड या जोडीनं मोडला.

शफालीची सेंच्युरी चार रननं हुकली. पण, भारताकडून पदार्पणातील टेस्टमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा विक्रम तिने केला. यापूर्वी गार्गी बॅनर्जीनं 1984 साली टेस्ट पदार्पणात 87 रन काढले होते.

एका टेस्ट इनिंगमध्ये दोन सिक्स लगावलेली शफाली वर्मा ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

पदार्पणातील टेस्ट इनिंगमध्ये दोन सिक्स लगावलेली शफाली वर्मा ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

लेडी सहवाग नाही शफाली वर्मा

See Ball, hit Ball ही शफालीची स्टाईल सर्वांना वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) आठवण करुन देते. मुलतान टेस्टमध्ये 295 वर असताना सेहवागनं सिक्स मारला, इतिहास रचला. ब्रिस्टल टेस्टमध्ये 96 वर शफालीनंही असाच एक धाडसी फटका मारला होता. तो फटका यशस्वी झाला नाही. पण म्हणून तिच्या खेळीचं महत्त्व कमी होत नाही.

ON THIS DAY: नजफगडचा नवाब बनला मुलतानचा सुलतान!

आपली ओळख आता ‘लेडी सेहवाग’  अशी राहिली नसून ‘शफाली वर्मा’ (Superstar Shafali Verma) झाली आहे, हे तिने दाखवून दिले आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: