
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिजमधून अनेक हिरो उदयाला आले आहेत. टीम इंडियातल्या (Team India) नव्या खेळाडूंनी सभोवतालच्या अडचणींवर जिद्दीनं मात केली. त्याचा परिणाम खेळावर होऊ दिला नाही. उलट, आणखी त्वेषानं खेळ करत टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाचा एक प्रमुख हिरो आहे, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
भारतीय टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाली आणि त्यानंतर आठवडाभरात 20 नोव्हेंबर 2020 रोजी सिराजच्या वडिलांचं निधन झालं. ज्या वडिलांनी घरातील आर्थिक परिस्थितीची झळ मुलाच्या क्रिकेट प्रेमावर येऊ दिली नाही. आपल्या मुलानं टेस्ट खेळावं अशी ज्यांची इच्छा होती. ते सिराजचे वडील त्याला सोडून गेले. सिराजनं त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी भारतामध्ये परत न जाता टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिराजला वडिलांचं अंत्यदर्शन घेता आलं नाही.
( वाचा : मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता! )
विमानतळावरुन वडिलांच्या कबरीकडं धाव!
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला सिराज गुरुवारी (21 जानेवारी 2021) हैदराबादमध्ये परतला. यावेळी त्यानं विमानतळावरुन घरी न जाता कब्रस्तानात जाऊन वडिलांच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानं यावेळी वडिलांच्या कबरीवर फुलं वाहिली आणि प्रार्थना केली.
सिराजनं Sports Today शी बोलताना या भावनिक दिवसाचा अनुभव सांगितला आहे. “मी घरी गेल्यानंतर आईला भेटलो. मला पाहताच आईला रडू कोसळलं. मी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण, तो खूप अवघड क्षण होता. 6-7 महिन्यांतर तिचा मुलगा घरी परतला होता. माझी आई मी घरी कधी परतणार याकडं डोळे लावून बसली होती. ती रोज एक-एक दिवस मोजत होती.’’ अशी भावनिक प्रतिक्रिया सिराजनं दिली.
सिराजनं सांगितला ‘त्या’ सेलिब्रेशनचा अर्थ
ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये सिराज आणि मयंक अग्रवालचं (Mayank Agarwal) दोन्ही हात आभाळाकडं उंचावून केलेलं सेलिब्रेशन गाजलं होतं. सिराजनं ANI शी बोलताना त्याचा अर्थही सांगितला. “वडिलांचं स्वप्न पूर्ण करं असंच माझ्या कुटुंबीयांनी मला सांगितलं होतं. मी घरी फोन केला तेंव्हा माझ्या होणाऱ्या पत्नीनं मला प्रेरणा दिली. टीम भक्कमपणे माझ्या पाठिशी उभी होती. मी माझ्या सर्व विकेट्स वडिलांना अर्पित करतो. मयंक सोबत मी केलेल्या सेलिब्रेशनचाही तोच अर्थ होता.’’ असं सिराजनं यावेळी सांगितलं.
सर्वात यशस्वी बॉलर
सिराजनं मेलबर्नमध्ये टेस्ट टीममध्ये पदार्पण केलं. चारपैकी तीन टेस्ट खेळूनही तो टीम इंडियाचा या सीरिजमधील सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याला सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) शिवीगाळ देखील झाली. तरीही तो न खचता जिद्दीनं खेळला. त्यानं संपूर्ण सीरिजमध्ये 13 विकेट्स घेतल्या. यामध्ये ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दुसऱ्या इनिंगमध्ये घेतलेल्या पाच विकेट्सचाही समावेश आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.