दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) 2020 हे वर्ष संस्मरणीय ठरले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या बारा सीझनमध्ये दिल्लीला जे जमले नाही ते तेराव्या प्रयत्नात जमले. दिल्लीने यंदा प्रथमच स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, विजेतेपदापासून ही टीम अखेर दूरच राहिली.

काय चुकले?

सातत्याचा अभाव हे दिल्ली कॅपिटल्सच्या या स्पर्धेतील कामगिरीचे एका वाक्यातील वर्णन होते. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने दोन हाफ सेंच्युरी झळकावत सुरुवात जोरात केली होती. त्यानंतर त्याची गाडी इतकी घसरली की त्याला टीममधून काढावे लागले. पृथ्वीच्या मर्यादा स्विंग आणि बाऊंस या दोन्ही प्रकारच्या बॉल खेळतानाच्या मर्यादा वारंवार उघड्या पडल्या. पृथ्वी अजून तरुण आहे. आता येत्या काळात या अनुभवातून तो किती शहाणा होतो हे पाहावे लागेल.

दिल्ली कॅपिटल्सच्या मागील दोन वर्षांच्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant) मोलाचा वाटा आहे. मागील दोन वर्षातील 29 मॅचमध्ये 13 इनिंगमध्ये 40 पेक्षा जास्त रन्स काढणारा ऋषभ पंत या स्पर्धेत फायनलचा अपवाद वगळता कुठे दिसलाच नाही. रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) यंदा पंतची भूमिका बदलली होती. त्यामुळे पंतने त्याच्या नैसर्गिक खेळाला मुरड घातली. पहिल्या बॉलपासून आक्रमण करणारा पंत या स्पर्धेत दिसलाच नाही. त्याचा स्ट्राईक रेट घसराला. त्याचे सिक्सर्स घटले आणि फॉर्मही हरपला होता. फायनल मॅचमध्ये पंतने हाफ सेंच्युरी झळकावली. टॉप ऑर्डर स्वस्तात आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्स या बेस्ट टीमविरुद्ध त्याने सर्वोत्तम खेळ केला. पंतचा तो खेळ पाहून दिल्ली कॅपिटल्सचे मॅनेजमेंट आणि विशेषत:  रिकी पॉन्टिंगला काही शहाणपण आले तर ते दिल्लीच्या फायद्याचे असेल.

( वाचा : IPL 2020 : आरसीबीसाठी पहिले पाढे ( नेहमीच) पंचावन्न )

श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) स्पर्धेत 500 पेक्षा जास्त रन्स काढले. दिल्लीचं आयपीएल फायनलमध्ये नेतृत्व करणारा तो पहिला कॅप्टन बनला. पण त्याचा 122.37 हा स्ट्राईक रेट हा काळजीचाच विषय होता. त्यामुळे दिल्लीच्या मीडल ऑर्डरला वेगाने रन्स काढता आले नाहीत.

काय कमावले?

कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) 30 विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्ससाठी असलेली पर्पल कॅप पटकावली. स्पर्धेच्या पूर्वार्धात रबाडा आणि अँनरिच नॉर्खिया ही दक्षिण आफ्रिकेची जोडी फॉर्मात होती. त्यामुळे दिल्लीनं चांगली कामगिरी केली. याच कामगिरीमुळे उत्तरार्धात सलग चार पराभवानंतरही दिल्लीला बाद फेरीत दुसऱ्या क्रमांकासह प्रवेश करता आला.

शिखर धवनने (Shikhar Dhawan) दिल्लीकडून सर्वात जास्त 618 रन्स काढले. आयपीएल इतिहासात सलग दोन मॅचमध्ये सेंच्युरी झळकावणारा शिखर हा पहिला बॅट्समन बनला. फॉर्मात नसलेल्या दिल्लीच्या टॉप ऑर्डरची लाज शिखरने राखली.

मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis) हा ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर या स्पर्धेत चांगल्याच फॉर्मात होता. दिल्लीच्या पहिल्याच मॅचमध्ये पंजाब विरुद्धची शेवटची ओव्हर असो वा बंगळुरुमध्ये बाद फेरीत ओपनिंगला येणे स्टॉईनिसने त्याला दिलेले काम चोख केले. आयपीएलच्या एकाच सिझनमध्ये 350 पेक्षा जास्त रन्स आणि 10 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा स्टॉईनिस हा दहावा खेळाडू बनला. शेन वॉटसन, जॅक कॅलिस, सुनील नरीन, कायनर पोलार्ड, आंद्रे रसेल आणि हार्दक पंड्या या ऑलराऊंडरच्या यादीत स्टॉईनिस आता दाखल झाला आहे.

अक्षर पटेलने (Axar Patel) अमित मिश्रा दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर वाढलेली जबाबदारी सांभाळली. त्याने ‘पॉवर प्ले’ मध्ये टिच्चून बॉलिंग केली. संपूर्ण स्पर्धेत सात पेक्षा कमी इकॉनॉमी रेट्सने रन्स दिले. सीएसके विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत टीमला विजय मिळवून दिला.

2013 ते 2018 अशी सलग सहा वर्ष फॅन्सची निराशा केल्यानंतर दिल्लीनं मागील वर्षी पात्रता फेरीत प्रवेश करत तिसरा क्रमांक पटकावला होता. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत दुसरा क्रमांक पटकावला. दिल्लीने यंदा एक पाऊल आणखी पुढे टाकले असले तरी विजेतेपद पटकावण्यापासून ते अजूनही बरेच मागे आहेत. आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने फायनलसह त्यांना चार मॅचमध्ये पराभूत करुन ते दाखवून दिलं आहे.

स्पर्धेतील अंतिम क्रमांक2
सर्वात खराब क्षणमुंबई इंडियन्स विरुद्ध 9 विकेट्सने पराभव
सर्वात आनंदाचा क्षणसनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश
सर्वात अपयशी खेळाडूपृथ्वी शॉ
सर्वात यशस्वी बॅट्समनशिखर धवन
सर्वात यशस्वी बॉलरकागिसो रबाडा
लक्षवेधी खेळाडूमार्कस स्टॉईनिस

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: