फोटो – BCCI/IPL

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या (आयपीएल) तेराव्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला  (केकेआर) प्ले ऑफ गाठण्यात अपयश आलं. केकेआरनं या स्पर्धेत बॅटिंग ऑर्डर वारंवार बदलली. बॉलर्स बदलले. अगदी कॅप्टनही बदलला. या सर्व बदलात टीम इतकी अस्थिर झाली की त्यांना स्थिर पद्धतीने खेळ करताच आला नाही. केकेआरचा मुख्य कोच ब्रँडन मॅकलम हा आक्रमक आणि कल्पक कॅप्टन म्हणून ओळखला जात असे. त्याची कोच म्हणूनही तशीच कार्यपद्धती आहे.  ‘भाकरी फिरवली नाही, तर ती करपते’ हे जसं खरंय तसं ती सतत फिरवत बसलं तर नीट होत नाही हे देखील सत्य आहे. या सततच्या बदलामुळेच केकेआरची टीम संपूर्ण स्पर्धेत स्थिर झाली नाही.

इऑन मॉर्गन कॅप्टन झाल्यानंतर केकेआरनं सात पैकी तीन मॅच जिंकल्या तर चार गमावल्या. तीनपैकी एक विजय हा सुपर ओव्हरमधला आणि त्या मॅचमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या लॉकी फर्ग्युसनचा आहे. मॉर्गनची कॅप्टनसी मुंबई इंडियन्स विरुद्ध कमाल करु शकली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) विरुद्ध तर त्यांनी शरणागती पत्कारली. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सीएसके या केकेआरपेक्षा पॉईंट टेबलमध्ये खाली असलेल्या टीमविरुद्धही मॉर्गनची टीम पराभूत झाली.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये मॉर्गननं सरस बॅटिंग केली. कमिन्सनं सुरुवातीला विकेट्स घेतल्या. त्यानंतर श्रेयस गोपाळला लवकर आऊट करण्यात केकेआरचे बॉलर्स अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा रनरेट अपेक्षीत उंचीवर जाऊ शकला नाही. अखेर सनरायझर्स हैदराबाद इतकेच पॉईंट्स असूनही केकेआऱला खराब रनरेटमुळे या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं.

( वाचा : कार्तिक गेला, मॉर्गन आला! KKR चा गोंधळ आणखी वाढला )

अर्थात खराब रनरेट हे केकेआर आऊट होण्याचं मुख्य कारण नाही. अधिक विचारातून येणारा गोंधळ हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. आरसीबीविरुद्ध केकेआरला फक्त 84 रन्स वाचवायचे होते. त्या परिस्थितीमध्ये देखील त्यापूर्वीच्या मॅचमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या हातात मॉर्गननं थेट सातव्या ओव्हरमध्ये बॉल दिला. सीएसकेविरुद्ध मॉर्गनपेक्षा रिंकू सिंह अधिक चांगली आणि आक्रमक बॅटिंग करु शकतो हे फक्त मॉर्गन आणि मॅकलम या जोडीलाच वाटले असावे. अगदी राजस्थान रॉयल्सच्या मॅचमध्ये देखील मॉर्गनच्या आधी बेभरवशाचा सुनील नरीन बॅटिंगला आला होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कमलेश नागरकोटी टीममध्ये होता. त्याला मॉर्गननं एकही ओव्हर दिली नाही. त्यानंतरच्याच मॅचमध्ये नागरकोटीला शेवटची निर्णायक ओव्हर दिली. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या तिघांना स्पर्धेच्या उत्तरार्धात टीममध्ये का घेतलं आणि का काढलं? हे फक्त मॉर्गन आणि मॅकलम यांनाच माहिती असेल.

पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करु शकणारा राहुल त्रिपाठी 8, 1, 3 आणि 7 अशा सतत बदलत्या क्रमांकावर बॅटिंगला आला. सीएसकेविरुद्ध मोठी इनिंग खेळूनही त्याला सातत्याने ओपनिंगला खेळवलं नाही. शुभमन गिल सोडला तर एकाही बॅटसमनचा नंबर स्थिर नव्हता. गेल्या काही वर्षांपासून फिनिशर्सचं काम उत्तम पद्धतीनं खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला मॉर्गननं कायम स्वत:च्या आधी बॅटिंगला पाठवलं. त्याचा परिणाम कार्तिक आणि मॉर्गन दोघांच्याही बॅटिंगवर झाला.

केकेआरनं 2014 साली शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतरच्या सहा वर्षात बरीच परिस्थिती बदललीय. केकेआरचा कोर ग्रुप बदलला. दोन वर्षांपूर्वी सुनील नरीनला ओपनिंगला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर ते नरीनच्या मर्यादा उघड होऊनही सातत्याने त्याला मुख्य बॅट्समन्सच्या आधी पाठवतात. बहुतेकदा हा प्रयोग फसतो. पुन्हा केकेआर नव्या उत्साहाने जुगार खेळतं. आता पुढील वर्षी नरीनच्या प्रयोगावर केकेआरला गांभीर्याने उपाय करावा लागणार आहे.

केकेआरचे ‘टॉप थ्री’ बॅट्समन हे सर्व टीम्सच्या तुलनेत जास्त अपयशी ठरले. शुभमन गिल त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. नितीश राणानं शेवटच्या काही मॅचमध्ये चांगला खेळ केला पण त्यात सातत्य नव्हते. त्यामुळे केकेआरला चांगली सुरुवात मिळाली नाही. आंद्रे रसेल अनफिट होता आणि फॉर्मात नव्हता. त्यामुळे केकेआरची बाजू अधिक लंगडी पडली. या सर्व गोष्टी हुशारीने झाकण्यासाठी त्यांनी सात मॅचनंतर मॉर्गनला कॅप्टन केलं होतं.  मॉर्गननं ‘कालचा गोंधळ बरा होता!’ अशी परिस्थिती निर्माण केली आणि केकेआर स्पर्धेतून आऊट झाले.

स्पर्धेतील क्रमांक5
सर्वात खराब क्षणआरसीबीविरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 84 अशी अवस्था
सर्वात आनंदी क्षणवरुण चक्रवर्तीच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पाच विकेट्स
सर्वात अपयशी खेळाडू आंद्रे रसेल
सर्वात यशस्वी बॅट्समनशुभमन गिल
सर्वात यशस्वी बॉलरवरुण चक्रवर्ती
लक्षवेधी खेळाडू वरुण चक्रवर्ती

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: