फोटो – ट्विटर – BCCI/IPL

नेहमीच्या गृहितकांना छेद देणारं वर्ष म्हणून 2020 ची नोंद झालीय. 2020 मध्ये अनेक गोष्टी बदलल्या, अनेक पहिल्यांदाच घडल्या. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा ही अपवाद नव्हती. आयपीएल स्पर्धेच्या तारखा बदलल्या, मैदान बदललं, मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीविना ही स्पर्धा पार पडली. 2019 आणि 20 या वर्षभरात आयपीएलमध्ये (IPL) अनेक बदल झाले. फक्त एक गोष्टी दोन्ही वर्षात समान होती ती म्हणजे विजेते. 2019 प्रमाणे 2020 मध्ये देखील ही स्पर्धा मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जिंकली. सलग दोनदा आयपीएल जिंकण्याच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या विक्रमाची यंदा मुंबईने बरोबरी केली.

काय कमावलं?

मुंबई इंडियन्ससाठी 2020 हे ड्रीम वर्ष होतं. त्यांनी पहिली मॅच गमावली. त्यानंतर लगेच त्यांची गाडी रुळावर आली. ती विजेतेपद पटकावूनच थांबली. स्पर्धेची खराब सुरुवात करण्याची नेहमीची समस्या त्यांना यंदा जाणवलीच नाही. स्पर्धेच्या पूर्वार्धापासूनच त्यांनी जेतेपदाच्या थाटात खेळ केला.

सूर्यकुमार यादवचा कमी स्ट्राईक रेट आणि इशान किशनचा अनिश्चित खेळ या मुंबईच्या स्पर्धेपूर्वी दोन मुख्य समस्या होत्या. यंदा सूर्यकुमारने 145 च्या स्ट्राईक रेटनं रन्स काढले. तर, इशान किशनने मुंबईकडून सर्वात जास्त म्हणजे 516 रन्स काढले. इशान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्पर्धेतील ‘सिक्स हिटर्स’ना मागे टाकत सर्वात जास्त (30) सिक्सर्स लगावले. U19 वर्ल्ड कपमधून उदयाला आलेल्या झारखंडच्या तरुण पोरावर मुंबईने मागील दोन वर्षांमध्ये गुंतवणूक केली, त्याच्यावर विश्वास दाखवला, त्याला वारंवार संधी दिली त्याचे मुंबईला रिटर्न्स मिळाले.

इशान किशनसारखीच सूर्यकुमार यादवचीही गोष्ट आहे. मुंबईकर सूर्यकुमार गेल्या तीन वर्षांपासून मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. तीन क्रमांकावर खेळायला येणारा या स्पर्धेत ‘ड्रीम फॉर्म’ मध्ये होता. त्याने ती जबाबदारी चोख पार पाडली. रोहित शर्मा दुखापतीमुळे काही मॅच बाहेर होता. त्याच्या अनुपस्थितीचा विशेष परिणाम मुंबईला जाणवला नाही याचे मुख्य श्रेय सूर्यकुमार यादवनं जबाबदारीनं केलेल्या खेळात आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सूर्यकुमारची निवड न होणं ही राष्ट्रीय बातमी बनली. त्याच्या फॉर्मकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आता मुंबई इंडियन्सला परवडणारे नाही.

मुख्य लिलावाप्रमाणेच दोन खेळाडूंच्या हस्तांतरणातून चांगले खेळाडू मिळवणे हे देखील मुंबईच्या यशाचे मुख्य यश आहे. या स्पर्धेपूर्वी त्यांनी दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेंट बोल्ट मिळवला. बोल्टनं मुंबईला सातत्याने लवकर यश मिळवून दिलं. त्याच्या स्विंगमुळे पात्रता फेरीतील दोन्ही मॅच ‘पॉवर प्ले’मध्येच मुंबईसाठी सेट झाल्या होत्या. बोल्टकडे अनुभव, गुणवत्ता आणि क्षमता पूर्वीपासून होती. त्याचा योग्य वापर करणारी टीमही त्याला यंदा मिळाली आणि पुढे जे घडलं तो इतिहास आहे.

काय सुधारणा हवी?

‘मुंबई इंडियन्स ही T20 क्रिकेटमधील बेस्ट टीम आहे का?’ अशी चर्चा आता सुरु झालीय हे मुंबईच्या 2020 आयपीएलमधील यश आहे. तेराव्या सीझनमध्ये मुंबईने त्यांच्यामधील त्रूटींवर उत्तम पद्धतीने मात केली. मात्र, हे यश कायमस्वरुपी टिकवण्यासाठी त्यांना आणखी काही गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे.

‘उत्तम दर्जाच्या स्पिनर्सची उनुपस्थिती’ ही मुंबईची गेल्या तीन वर्षातील मुख्य समस्या आहे. तीन पैकी दोन वर्ष राहुल चहरने ओढली आहेत. मात्र स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात राहुलचा फॉर्म हरपला होता. जयंत यादवने फायनलमध्ये चोख काम केलं. पण हा प्रयोग दरवेळी यशस्वी होईलच असे नाही. त्यामुळे आगामी स्पर्धेत मुंबईने राहुल-जयंत जोडीवर अधिक काम करणे किंवा एक उत्तम दर्जाच्या स्पिनर्सचा टीममध्ये समावेश करणे यापैकी एक गोष्ट करणे आवश्यक आहे.

बुमराह-बोल्ट हे अव्वल दर्जाचे बॉलर्स मुंबईकडे आहेत. ही जोडी फॉर्मात असल्याने अन्य बॉलर्सचा खेळ सुधारला. मात्र, यापैकी एकाचा फॉर्म पुढील स्पर्धेत हरपला तर अन्य बॉलर्सवर ताण वाढू शकतो. पॅटिंसन/ कुल्टर डी नाईल भारतीय पाटा पिचवर आणखी महागडे ठरु शकतात. त्यामुळे आगामी सिझनमध्ये मुंबई इंडियन्स या दोघांनाही करारमुक्त करुन नव्या फास्ट बॉलरकडे वळू शकतात.

तेरा वर्षात पाच विजेतेपदं पटकावून मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील आता सर्वात यशस्वी टीम बनलीय. त्यांच्यात आणि अन्य टीममधील अंतर यंदा आणखी वाढलंय. त्यामुळे आता पुढील हंगामात अन्य टीम्सपेक्षा चांगले खेळण्याबरोबरच स्वत:चा चांगला खेळण्याचा स्तर अधिक उंचावण्याचे मुख्य आव्हान मुंबई इंडियन्सपुढे असणार आहे.

स्पर्धेतील अंतिम क्रमांक1
सर्वात निराशादायक क्षणसनरायझर्स हैदराबादकडून 10 विकेट्सने पराभव
सर्वात आनंदाचा क्षणदिल्ली कॅपिटल्सला पराभूत करुन पाचव्यांदा विजेतेपद
सर्वात अपयशी खेळाडूकुल्टर डी नाईल
सर्वात यशस्वी बॅट्समनइशान किशन
सर्वात यशस्वी बॉलरजसप्रीत बुमराह
लक्षवेधी खेळाडूसूर्यकुमार यादव

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: