
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या सीझनमध्ये सर्वात जास्त अडचणीत सापडलेली टीम म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad). पहिल्याच मॅचमध्ये एक ओव्हर टाकण्याच्या आता मिचेल मार्श स्पर्धेच्या बाहेर गेला. दुसरा ऑलराऊंडर विजय शंकर सुरुवातीला दुखापतीपुळे काही मॅच बाहेर होता. तो टीममध्ये स्थिरावलाय असं वाटत असताना पुन्हा दुखापतग्रस्त झाला. टीमचा मुख्य बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) जखमी होऊन स्पर्धेतून आऊट झाला. केन विल्यमसनलाही (Kane Williamson) याच कारणामुळे काही मॅच खेळू शकला नाही. हे सर्व कमी होते म्हणून की काय वृद्धीमान साहा देखील जबरदस्त फॉर्मात असताना दुखापतग्रस्त झाला.
या सर्व अडचणीतूनही सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. दिल्ली, बंगळुरु आणि मुंबई या टॉपच्या तीन टीम्सना शेवटच्या तीन मॅचमध्ये पराभूत करत बाद फेरी गाठली. बाद फेरीच्या पहिल्या मॅचमध्ये पुन्हा बंगळुरुला पराभूत केलं. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाल्याने ते फायनपूर्वी स्पर्धेतून आऊट झाले. पण, ‘ते शेवटपर्यंत लढले’ अशीच आता स्पर्धेच्या इतिहासात नोंद होणार आहे.
काय चुकलं?
आघाडीचे खेळाडू दुखापतग्रस्त सनरायझर्स हैदराबादच्या बेंच स्ट्रेंथच्या मर्यादा स्पर्धेत वारंवार उघड झाल्या. हैदराबादची टीम सुरुवातीच्या टप्प्यात तीन परदेशी बॅट्समनसह खेळली. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद या तरुण भारतीय खेळाडूंवर पाचव्या बॉलर्सचा कोटा पूर्ण करण्याची जबाबदारी आली. या दोघांनी अनुक्रमे 9.10 आणि 13.71 च्या इकॉनॉमी रेटनं रन्स दिले. प्रतिस्पर्धी टीमने त्यांच्या ओव्हर टार्गेट केल्या. शेवटच्या टप्प्यात जेसन होल्डरचा समावेश करत हैदराबादने ती चूक सुधारली. हा प्रयोग सुरुवातीलाच झाला असता तर ते कदाचित पहिल्या दोनमध्ये पोहचले असते.
हैदराबादची मीडल ऑर्डर गेल्या काही वर्षांपासून त्यांची डोकेदुखी ठरलीय. या स्पर्धेतही ती समस्या सुटलेली नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 14 रन्समध्ये सात विकेट्स फेकत या बॅट्समन्स हैदराबादला जवळपास स्पर्धेच्या बाहेर केलं होतं. त्यांचा ताण कमी करण्यासाठी केन विल्यमसनला त्यांनी सातत्याने चौथ्या क्रमांकावर खेळवलं. त्याला दुसऱ्या बाजूने फटकेबाज खेळाडूची भक्कम साथ मिळाली नाही. अब्दूल समदने अगदी शेवटच्या मॅचमध्ये आशा दाखवली आहे. त्याच्याकडून पुढच्या सिझनमध्ये हैदराबादला मोठ्या अपेक्षा असतील.
काय कमावलं?
एखादी मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असलेला इंटेंट सनरायझर्स हैदराबादकडे होता. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने अगदी 200 टक्के खेळ केला. त्याची स्पर्धेतील सुरुवात संथ झाली होती. शेवटच्या टप्प्यात त्याने गियर बदलला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फॉर्मातल्या रबाडाची धुलाई करत ‘पॉवर प्ले’ मध्येच मॅच दिल्लीपासून दूर नेली. वॉर्नरनं त्याच्या सलग पाच आयपीएलमध्ये 500 रन्स पूर्ण केले. हैदराबादच्या टीममध्ये असलेल्या अनेक नव्या पोरांना विश्वास दिला. त्यांना चांगला खेळ करण्यास, उत्तम फिल्डिंग करण्यात प्रोहत्सान दिलं. त्यांचं आघाडीवर राहून नेतृत्व केलं.
विल्यमसन – होल्डर या आंतरराष्ट्रीय टीमच्या कॅप्टननी त्यांच्या स्वभावाप्रमाणे शांतपणे चोख काम केलं. बंगळुरु विरुद्ध बाद फेरीत या जोडीनं शांतपणे पार्टरनरशिप करत टीमला विजय मिळवून दिला. होल्डरच्या टीममधील समावेशानं हैदराबादला स्थैर्य आलं. राशिद खानने त्याचं काम केलं. त्याच्या चार ओव्हर्स खेळून काढणे हे एकच प्रतिस्पर्धी टीम्सचं उद्दीष्ट होतं.
वृद्धिमान साहाला शेवटच्या टप्प्यात जॉनी बेअरस्ट्रोच्या ऐवजी संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील पहिल्या दोन टीमच्या विरुद्ध त्याने आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावली. तो टीममध्ये आल्याने वॉर्नरवरील ताण कमी झाला आणि त्याने स्वाभाविक खेळ केला. साहा शेवटच्या दोन मॅचमध्ये दुखापतीमुळे बाहेर गेल्याचा मोठा फटका हैदराबादला सहन करावा लागला. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीमध्ये संदीप शर्माने बॉलिंगचं उत्तम नेतृत्व केलं. पॉवर प्लेमध्ये त्याने सातत्याने विकेट्स घेत नवा आयपीएल रेकॉर्ड केला.
हैदराबादचा या स्पर्धेतील सर्वाधिक लक्षवेधी खेळाडू होता टी. नटराजन. तामिळनाडूच्या या यॉर्कर किंगने या आयपीएलमध्ये सर्वात जास्त यॉर्कर टाकले. बुमराह, रबाडा सारख्या आघाडीच्या बॉलर्सना त्याने कित्येक यॉर्कर मागे टाकलं. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्यावर मोठी जबाबदारी आली होती. नटराजनने त्या जबाबदारीला न्याय दिला. बंगळुरुविरुद्ध त्याने निर्णायक क्षणी संपूर्ण सेट असलेल्या डीव्हिलियर्सची दांडी उडवली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची त्याची विसावी ओव्हर पाहून त्याची बॉलिंग आणखी एका मॅचमध्ये पाहण्यासाठी तरी हैदराबाद फायनलमध्ये जावं असं अनेकांना वाटलं असणार…
स्पर्धेतील क्रमांक | 3 |
सर्वात खराब क्षण | पंजाबविरुद्ध 14 रन्समध्ये सात विकेट्स गमावल्या |
सर्वात आनंदी क्षण | मुंबई इंडियन्स विरुद्ध 10 विकेट्सने विजय |
सर्वात अपयशी खेळाडू | खलील अहमद |
सर्वात यशस्वी बॅट्समन | डेव्हिड वॉर्नर |
सर्वात यशस्वी बॉलर | राशिद खान |
लक्षवेधी खेळाडू | टी. नटराजन |
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.