फोटो – ट्विटर/ BCCI IPL

त्याच चुका दरवर्षी नेमानं करणे हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं आजवर एकदाही आयपीएल (IPL) न जिंकण्याचं मुख्य कारण आहे. आरसीबीनं या स्पर्धेच्या पूर्वार्धात त्यांच्या या परंपरेला छेद देणारा खेळ केला. त्यामुळे आरसीबी फॅन्सच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, स्पर्धेच्या उत्तरार्धात सलग पाच सामने गमावत आरसीबीची टीम स्पर्धेतून आऊट झाली.

चांगली सुरुवात

आरसीबीने यंदा सुरुवात चांगली केली. पहिल्या मॅचमध्ये अगदी अनपेक्षित कमबॅक करत सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. किंग्ज इलेव्हन विरुद्ध गाडी घसरली होती. त्यानंतरच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत ती पुन्हा रुळावर आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असूनही डीव्हिलियर्स (AB de Villiers) पहिल्या मॅचपासून उत्तम खेळत होता. विराट कोहलीला (Virat Kohli) योग्य वेळी फॉर्म गवसला असं सर्वांना वाटलं होतं. या दोघांचा बॅटिंगमध्ये भार हलका करण्याचं काम देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) केलं. सुंदर-चहल जोडी बॉलिंगमध्ये कमाल करत होती. त्यातच ख्रिस मॉरीसच्या (Chris Morris) समावेशानंतर आरसीबीची टीम एकदम संतुलित झाली होती.

उत्तरार्धात गाडी घसरली

आयपीएलच्या पूर्वार्धात सातपैकी पाच मॅच जिंकणारी आरसीबी उत्तरार्धात एकदम ढेपाळली. फिंचला फॉर्म सापडत नव्हता. पडिक्कल आणि विराट संथ झाले. 7-14 ओव्हर्सच्या टप्प्यात सर्वात संथ बॅटिंग करणारी टीम आरसीबीची होती. फिंचनं 111, पडिक्कलनं 125 तर विराट कोहलीनं 121 च्या स्ट्राईक रेटनं रन्स केले. टॉप ऑर्डरच्या संथ खेळाचा ताण हा नंतरच्या बॅट्समन्सवर विशेषत: डीव्हिलियर्सवर पडला. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध विराट-डीव्हिलियर्स जोडी 65 बॉल्स एकत्र असूनही आरसीबीला 150 रन्स करता आले नाहीत. मुंबई इंडियन्स विरुद्ध वेगानं रन्स करण्याच्या नादात डीव्हिलियर्स पोलार्डच्या फुलटॉसवर आऊट झाला.

( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )

अचानक आणि अनावश्यक बदल

अचानक आणि अनावश्यक बदल हा आरसीबी मॅनेजमेंटचा स्थायी स्वभाव आहे. आरसीबीनं स्पर्धेच्या पूर्वार्धात त्याला मुरड घातली. उत्तरार्धात ते पूर्वपदावर आले. किंग्ज इलेव्हन विरुद्ध फॉर्मातला डीव्हिलियर्स वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबेच्या नंतर आला. आरसीबीचे किमान 25 रन्स कमी झाले. नवदीप सैनी जखमी झाल्यावर सैनीसोबत उडानाही काढत डेल स्टेनला खेळवलं. शेवटच्या मॅचमध्ये ख्रिस मॉरीस जखमी झाल्यावर पुन्हा उडानाला काढलं आणि या स्पर्धेत फारसं न खेळलेल्या मोईन अली आणि ॲडम झम्पाला खेळवलं.

विराट कोहलीचा फॉर्म ही आरसीबीसाठी निराशाजनक गोष्ट ठरली. विराटनं स्पर्धेत 42.36 च्या सरासरीनं 466 रन्स काढले. हे रन्स त्याच्या दर्जाला साजेसे नव्हते. राजस्थान रॉयल्स आणि सीएसके विरुद्धची प्रत्येकी एक अशा दोन हाफ सेंच्युरी सोडल्या तर विराटमधला नेहमीचा बॅट्समन या स्पर्धेत दिसला नाही. कॅप्टनसीच्या ओझ्याचा परिणाम विराटच्या बॅटिगवर जाणवू लागलाय. विराटच्या कॅप्टनसीखाली सलग आठव्या वर्षी आरसीबी विजेतेपदापासून दूर आहे. विराटनं हे अपयश मान्य करत स्वत:हून कॅप्टनसी सोडली पाहिजे. त्यामुळे त्याला बॅटिंगवर लक्ष देता येईल. विराटमधल्या बॅट्समन्सचं क्रिकेट करियर लांबणं अधिक बहरणं हे विराट, आरसीबी आणि टीम इंडियाच्या हिताचं आहे.

नव्या हिरोचा उदय!

आरसीबीसाठी काही सकारात्मक गोष्टी देखील या सीझनमध्ये घडल्या. तब्बल तीन वर्षांनी आरसीबीला आयपीएलची बाद फेरी गाठण्यात यश मिळालं. कर्नाटकचा तरुण खेळाडू देवदत्त पडिक्कलनं पहिल्याच आयपीएलमध्ये ठसा उमटवला. त्याने 5 हाफ सेंच्युरीसह 379 रन्स काढले. पहिल्या आयपीएल सिझनमध्ये सर्वात जास्त रन्स करण्याचा श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड पडिक्कलनं मोडला. पडिक्कलकडून आगामी काही वर्ष आरसीबीला मोठ्या अपेक्षा असतील.

( वाचा : देवदत्त पडिक्कल : कर्नाटकचा युवा बॅट्समन बनला आयपीएलचा हिरो! )

डीव्हिलियर्सनं विकेट किपिंगची जबाबदारी घेत टीमला संतुलीत करण्याचं काम केलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करत वेगानं रन्स काढले. युझवेंद्र चहलनं नेहमीप्रमाणे सरस कामगिरी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरनं उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराजनं केकेआर विरुद्ध अविस्मरणीय स्पेल टाकला. ख्रिस मॉरीसनं सुरुवातीच्या काही मॅचमध्ये चांगला खेळ केला. या सर्वांचा पुढील वर्षी आरसीबीनं उत्तम उपयोग केला तर त्यांना या सीझनपेक्षा चांगली कामगिरी करता येईल.

अर्थात पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न!  हा मंत्र आरसीबी मॅनेजमेंटनं सोडणे आवश्यक आहे.

आरसीबीची IPL 2020 मधील कामगिरी

स्पर्धेतील क्रमांक4
सर्वात खराब क्षण किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 97 रन्सने पराभव
सर्वात आनंदी क्षणकेकेआरला 8 आऊट 84 वर रोखले
सर्वात अपयशी खेळाडूडेल स्टेन
सर्वात यशस्वी बॅट्समनदेवदत्त पडिक्कल
सर्वात यशस्वी बॉलरयुझवेंद्र चहल
लक्षवेधी खेळाडू देवदत्त पडिक्कल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: