
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ची टीम आयपीएलमध्ये पहिल्यांदाच बाद फेरीमध्ये प्रवेश न करता आऊट झाली. नेहमीच्या घटना न घडणारं वर्ष हा 2020 चा ट्रेंड या निमित्ताने आयपीएलमध्ये देखील दिसला. सीएसकेची ही खराब कामगिरी पहिल्यांदाच झाली असली तरी ती अगदीच अनपेक्षित नव्हती.
सीएसकेनं 2018 च्या ऑक्शनमध्ये अनुभवी आणि चेन्नईच्या पिचवर उत्तम खेळ करु शकतील अशा खेळाडूंनाच निवडले होते. सीएसकेचे बहुतेक प्लेयर्स क्रिकेट करियरच्या उत्तरार्धात होते. त्यांचं इंधन कधी तरी संपणार हे सर्वांनाच माहिती होतं. 2018 साली विजेतेपद मिळाले. 2019 साली फक्त 1 रन्सनं विजेतेपद हुकलं. त्यामुळे या टीमवर मॅनेजमेंटचा, कॅप्टनचा आणि चाहत्यांचा पूर्ण विश्वास होता.
नेमके काय चुकले?
स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवस उरले असतानाच सुरेश रैना बाहेर जाणं हा सीएसकेसाठी मोठा धक्का होता. रैनाच्या बाहेर जाण्याने सीएसकेकडे टॉप ऑर्डरला एकही आक्रमक डावखुरा बॅट्समन उरला नाही. सॅम करनला ओपनिंगला पाठवून त्यांनी प्रयोग केला पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे शेवटच्या चार मॅचमध्ये करन पुन्हा लोअर ऑर्डरमध्येच खेळला. रैनाचे प्रकरण सीएसके मॅनेजमेंटनं नीट हातळले असते तर…. हा प्रश्न सीएसके फॅन्सना नेहमीच सतावेल.
रैनाच्या अनुपस्थितीपेक्षाही कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचं संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप होणं सीएसकेला महाग पडले. धोनीचा फॉर्म हा सीएसकेसाठी अगदी आवश्यक बाब होती. धोनी फॉर्मात असल्यानेच 2019 साली सीएसकेनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. या स्पर्धेत धोनीला एकही हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. वरुण चक्रवर्तीनं दोन्ही मॅचमध्ये त्याला चकवलं. ‘आमचं लक्ष नेट रनरेटवर आहे’ ‘नव्या खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही’ या धोनीच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली.
शेन वॉटसन केदार जाधव आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यावर सीएसकेचा मोठा विश्वास होता. वॉटसननं थोडे रिटर्न्स देण्याचा प्रयत्न केला. पंजाब विरुद्धची एक मॅच फाफ ड्यू प्लेसी सोबत जिंकून दिली. क्रिकेट कमी खेळणे आणि वाढते वय याचा फटका वॉटसनला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या सीएसकेला बसला. केदार जाधवनं संपूर्ण निराशा केली. आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्नही न करणारा केदार अनेकांना खटकला. ड्वेन ब्राव्हो संपूर्ण फिट नव्हता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निर्णायक शेवटची ओव्हर त्याला टाकता आली नाही. त्यामुळे सीएसके पराभूत झाली.
काय आहेत जमेच्या बाजू?
मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा सीएसकेसाठी या स्पर्धेतील सर्वात मोठं फाईंड आहे. ऋतुराजबद्दल स्पर्धेपूर्वी एन. श्रीनिवासनसह सर्वजण चांगलं बोलत होते. त्याच्यावर तितका विश्वास दाखवला असता तर त्याचा सीएसकेला फायदा झाला असता. सुरुवातीच्या टप्प्यात ऋतुराज त्याचा नेहमीचा क्रमांक सोडून खेळला आणि अपयशी ठरला. शेवटच्या चार मॅचमध्ये त्याला ओपनिंगला पाठवलं. चारपैकी तीनमध्ये त्यानं हाफ सेंच्युरी झळकावत सीएसकेला विजय मिळवून दिला. सीएसकेची अगदीच नामुष्की टाळण्यात ऋतुराजनं शेवटच्या तीन मॅचमध्ये खेळलेल्या इनिंगचा निर्णायक वाटा आहे.
सॅम करन – रवींद्र जडेजा ही जोडी देखील संपूर्ण स्पर्धेत चांगलं खेळली. सॅम करननं ओपनिंग बॉलिंग, मीडल ओव्हरमध्ये बॉलिंग आणि डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग केली. ओपनिंग बॅटिंग, मीडल ओव्हरमध्ये बॅटिंग आणि लोअर ऑर्डरला बॅटिंग केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्व प्रमुख बॅट्समन आऊट झालेले असताना त्याने हाफ सेंच्युरी झळकावत सीएसकेची खूप मोठी नामुष्की टाळली.
( वाचा : ‘बाळाच्या जन्मावेळी माही सोबत नव्हता तेंव्हा काय वाटलं?’; साक्षीने सांगितली ‘मन की बात’ )
चेन्नईच्या पिचची साथ नसल्यानं रवींद्र जडेजाची बॉलिंग यंदा चालली नाही. जडेजानं ती कसर बॅटिंगमध्ये भरुन काढली. जडेजानं संपूर्ण स्पर्धेत 46.40 च्या सरासरीनं आणि 171.85 च्या स्ट्राईक रेटनं रन्स केले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स करत विजय खेचून आणला.
पराभवाच्या दाढेतून विजय खेचणे आणि संपूर्ण मॅचमध्ये सफाईदार पद्धतीनं विजय मिळवणे या जुन्या सीएसके टीमचं ड्रेडमार्क असलेल्या गोष्टी 2020 च्या सीएसके टीमनं शेवटच्या दोन मॅचमध्ये केल्या. या दोन आठवणी पुढील वर्षी सीएसके टीमला आणि फॅन्सला नवी उभारी देणाऱ्या असतील.
स्पर्धेतील क्रमांक | 7 |
सर्वात खराब क्षण | मुंबई इंडियन्स विरुद्ध 10 विकेट्सनं पराभव |
सर्वात चांगला क्षण | किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध 9 विकेट्सनं विजय |
सर्वात अपयशी खेळाडू | महेंद्रसिंह धोनी |
सर्वात यशस्वी बॅट्समन | फाफ ड्यू प्लेसी |
सर्वात यशस्वी बॉलर | सॅम करन |
लक्षवेधी खेळाडू | ऋतुराज गायकवाड |
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.