
आयपीएल टीमची कॅप्टनसी ही राष्ट्रीय टीमच्या कॅप्टनसीपेक्षा अनेकदा अवघड आव्हान आहे. राष्ट्रीय टीमचा कॅप्टन होण्यापूर्वी त्या खेळाडूला आपल्या राष्ट्रीय टीममध्ये तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव असतो. देशांतर्गत क्रिकेटची यंत्रणा, संघातील सहकारी, नवे खेळाडू याची पुरेशी माहिती असते. वर्षभरातील बहुतेक काळ या सहका-यांसोबत घालवल्याने त्यांचा अंदाज असतो.
आयपीएल कॅप्टन हा वर्षभरातील दोन महिन्यांसाठी असतो. दरवर्षी जगभरातील वेगवेगळे खेळाडू टीममध्ये दाखल होतात आणि निघून जातात. अनेकदा कॅप्टन म्हणून घेतलेला खेळाडू देखील मागच्या वर्षी दुस-या टीममध्ये असतो. तसेच काही कॅप्टनच्या बाबतीत तो पुढच्या वर्षी त्याच टीममध्ये असेल का? याची खात्री नसते. संघमालकांच्या अपेक्षा आणि दबाव, टीममधील जुन्या आणि नव्या खेळाडूंची मोट बांधणे, वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंना टीममध्ये सामावून घेऊन त्यांचा योग्य वापर करणे या सर्व गोष्टीला वर्षातील फक्त 2 महिने असतात.
( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )
अचानक कॅप्टन बदलला!
केकेआरनं (KKR) यंदा इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन इऑन मॉर्गनला (Eion Morgan) करारबद्ध केलं. मॉर्गनला करारबद्ध करुन कॅप्टन करण्याचा विचार होता तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मॉर्गनला कॅप्टन करणे आवश्यक होते. त्यामुळे मॉर्गनलाही त्याचा रोल स्पर्धेपूर्वीच कळला असता. केकेआरनं सुरुवातीला दिनेश कार्तिकवर विश्वास दाखवला. कार्तिकच्या कॅप्टनसीखाली स्पर्धेच्या पूर्वार्धात सातपैकी चार मॅच जिंकल्या. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या (Dinesh Karthik) मॅच केकेआरनं कार्तिकनं हुशारीनं बॉलर्स हाताळले होते. पूर्वार्धात टीम चौथ्या क्रमांकावर होती. त्यानंतर अचानक केकेआरनं कॅप्टन बदलला. मॉर्गनला कॅप्टन केलं.
‘दिनेश कार्तिकने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय स्वत:हून घेतला. त्याच्या निर्णयाचा धक्का बसला’ ही केकेआरची याबाबतचे अधिकृत माहिती आहे. या माहितीवर अनेकांना शंका आहेत. केकेआरचा इतिहासच ही शंका निर्माण करतो.सौरव गांगुलीसारख्या (Sourav Ganguly) नॅशनल आयकॉनला केकेआरने तडकाफडकी कॅप्टनसीवरुन काढले होते. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) स्वत:हून सोडले असं सांगितलं जात असलं तरी शेवट उत्तम प्रकारे झाला नव्हता. त्यानंतर 2020 साली निम्मा आयपीएल सीझन बाकी असताना आणि केकेआरची कामगिरी फारशी खराब झालेली नसतानाही कार्तिकने कॅप्टनसी सोडली.
( वाचा : IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’ )
कॅप्टन बदलण्याचा निर्णय का?
आयपीएल सीझन सुरू असताना कॅप्टन बदलत असाल तर तो कॅप्टन खेळाडू म्हणूनही टीममध्ये राहण्यास योग्य नसावा इतका त्याचा फॉर्म खराब हवा. भविष्याचा विचार करुन तरुण खेळाडूला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला असेल तरी समजू शकतो. रिकी पॉन्टिंग ऐवजी रोहित शर्मा आणि गौतम गंभीरच्या ऐवजी श्रेयस अय्यरची निवड करताना मुंबई आणि दिल्लीच्या मॅनेजमेंटने हाच विचार घेतला होता. दिनेश कार्तिक किंवा केकेआरच्या बाबतीत ही परिस्थिती नव्हती.
मॉर्गन स्पर्धेचा पूर्वार्ध निव्वळ बॅट्समन म्हणून खेळाला. त्यामध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे कुठेही दिसले नव्हते. केकेआरची कार्यपद्धती पाहता तो आगामी तीन वर्षे सोडा पुढच्या वर्षी तरी टीममध्ये असेल का? याची खात्री नाही. शुभमन गिल हा उत्तम पर्याय असताना वर्ल्ड कप विजेतेपदाची पुण्याई आणि मॅकलमच्या जवळचं असणं हे घटक मॉर्गनच्या निवडीत महत्त्वाचे ठरले का? हे प्रश्न निर्माण झाले.
मॉर्गनच्या ग्लॅमरला भुललेल्या विदेशी आणि देशी फॅन्सना ते मान्य नव्हते. या मंडळींनी अगदी पहिल्या मॅचपासून ‘कार्तिक चले जाव’ चळवळ सुरु केली होती. मॉर्गन कॅप्टन झाल्यानंतर केकेआर आता टॉपला जाणार आणि विजेतेपद पटकावणार या स्वप्नात ही मंडळी दंग होती.
( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )
केकेआरची टीम सुनील नरीन आणि आंद्र रसेल यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून होती. या दोघांना दिनेश कार्तिकच्या फॉर्मची जोड मिळाल्याने त्यांनी 2018 साली बाद फेरी गाठली होती. यंदा मिडल ऑर्डरमध्ये स्थिरता यावी म्हणून त्यांनी मॉर्गनला करारबद्ध केलं. मॉर्गन आल्यानंतर टीम स्थिर होण्याऐवजी आणखी अस्थिर झाली. रसेल पूर्ण फिट नव्हता. बॉलिंग शैलीवर आक्षेप घेतल्यानं बाहेर बसावे लागल्यानं नरीनचा सूर हरपला. या गोंधळात कॅप्टन बदलत केकेआर मॅनेजमेंटनं आणखी गोंधळ घातला. या सर्व गोंधळात गोधळामुळेच केकेआरचे आयपीएलमधील आव्हान ‘प्ले ऑफ’ पूर्वीच संपुष्टात आले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.