
राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आयपीएल 2021 (IPL 2021) एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचा मागील सिझनमधील कॅप्टन स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) कॅप्टनसीसह टीममधून हकालपट्टी केली. संजू सॅमसन (Sanju Samson) हा राजस्थानचा नवा कॅप्टन असेल.
राजस्थानचं सुप्त आकर्षण
राजस्थान रॉयल्सनं आयपीएल स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. त्या वर्षी T20 हा प्रकार नवा होता. शेन वॉर्ननं (Shane Warne) रवींद्र जडेजा, युसूफ पठाण, मुनाफ पटेल या तरुण पोरांना हाताशी धरत सर्वांना चकीत केलं. त्या विजेतेपदानंतर अनेकांना राजस्थान रॉयल्सबद्दल सुप्त आकर्षण आहे. वास्ताविक या टीमनं 2008 नंतर एकदाही फायनल गाठलेली नाही. अंतिम चारमध्येही अगदी क्वचित प्रवेश केलाय.
स्मिथचा दोष काय?
भारतीय खेळाडूंचा उत्तम वापर करणारी टीम म्हणून राजस्थानचा आयपीएमध्ये गवगवा आहे. मागील आयपीएलमध्ये ही टीम संपूर्णपणे परदेशी खेळाडूंवर अवलंबून दिसली. चार परदेशी खेळाडूंची आधी निवड आणि नंतर त्यांच्यानुसार उरलेल्या सात भारतीय खेळाडूंचा वापर हेच राजस्थानचे संपूर्ण स्पर्धेत धोरण होते. त्याचा त्यांना फटका बसला.
राजस्थानने यंदा अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) दिल्ली कॅपिटल्सकडं (Delhi Capitals) पाठवलं. रहाणे ऐवजी स्टिव्ह स्मिथ सुरुवातीला ओपनिंगला आला. रहाणे आणि स्मिथ हे एकाच पद्धतीचे खेळाडू आहेत. स्मिथ शारजाच्या छोट्या मैदानामध्ये पहिल्या दोन मॅच चालला. त्यानंतर काही मॅच तो त्या मानसिकतेमधून बाहेर आलाच नाही.
( वाचा : IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )
स्मिथ स्पर्धेच्या पुर्वार्धात अगदी वाईट पद्धतीने झटपट आऊट होत होता. शेवटच्या टप्प्यातही जोस बटलरच्या (Jos Buttler) आधी बॅटिंग करण्याचा हेका स्मिथनं सोडला नाही. शेवटच्या मॅचमध्ये तर तो सॅमसन आणि बटलरच्या आधी आला.
आरसीबीविरुद्ध (RCB) जोफ्रा आर्चरची (Jofra Archer) ओव्हर शिल्लक असताना एबी डिव्हिलियर्ससमोर (AB de Villers) जयदेव उनाडकतला स्मिथनं बॉलिंग दिली होती. डिव्हिलियर्सनं 19 व्या ओव्हरमध्येच ती मॅच जवळपास संपवली. राजस्थाननं दोन महत्त्वाचे पॉईंट्स स्मिथच्या खराब कॅप्टनीमुळे गमावले.
राजस्थानचा तळाचा क्रमांक
स्टीव्ह स्मिथच्या कॅप्टनसीखाली राजस्थाननं 14 मॅचमध्ये 6 मॅच जिंकल्या आणि 8 गमावल्या होत्या. राजस्थानची टीम IPL 2020 मध्ये पॉईंट टेबलच्या अगदी तळाशी होती. स्मिथनं 14 मॅचमध्ये 25.91 च्या सरासरीनं 311 रन केले. ज्यामध्ये दोन हाफ सेंच्युरींचा समावेश होता. आयपीएलच्या 13 व्या सिझनमध्ये 69 हा त्याचा बेस्ट स्कोअर होता. तर त्याचा स्ट्राईक रेट 131.22 होता.
स्मिथला अंगभूत गुण भोवले?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेल्या टेस्टच्या दरम्यान ऋषभ पंत बॅटिंग करताना खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न करणारा स्मिथचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकारावर भारतीय फॅन्सनी त्याच्यावर सडकून टीका केली होती.
स्मिथच्या या नकारात्मक प्रतिमेचा टीमच्या फॅन बेस वर परिणाम होऊ नये म्हणून देखील राजस्थाननं स्मिथची कॅप्टनसी आणि टीममधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असावा
राजस्थानच्या टीममध्ये कोण इन कोण आऊट?
संजू सॅमसन आता राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असेल. श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकाराला (Kumar Sangakkara) राजस्थाननं ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून नियुक्त केलं आहे.
‘हे’ खेळाडू आऊट – स्टीव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशाने थॉमस, आकाश सिंह, वरुण आरोन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी आणि शशांक सिंह
‘हे’ खेळाडू कायम – संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, अनूज रावत, डेव्हिड मिलर, मनन व्होरा, रॉबिन उथप्पा, रियान पराग, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, माहिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, जयदेव उनाडकत आणि मयांक मार्कंडेय
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.