फोटो – BCCI – IPL

सर्व जगाप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) देखील 2020 हे वर्ष वेगळं होतं.  त्यांना मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) पहिल्यांदाच ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आलं. चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स यामुळे निराश होणं स्वाभाविक आहे. त्याचबरोबर त्यांचे टीकाकारच यामुळे जास्त काळजीग्रस्त झाले होते. गेलं आयपीएल सुरु असतानाच ‘CSK पुढील वर्षी कशी बदलणार? (CSK 2021) धोनी रिटायर होणार. इतके प्लेयर जाणार…हे नवे प्लेयर येणार’ असे अंदाज बांधत प्रत्येकांचे कागद आणि लेख तयार होते. ते वाचायला मिळाले. काहींचे ड्राफ्टमध्ये पडून असतील. या आयपीएल ऑक्शननंतर (IPL 2021 Auction) या विषयावरची काही उत्तरं मिळाली आहेत. धोनीच्याच भाषेत सांगयचं तर संपूर्ण बदल ‘Definitely not’ हवे तितके बदल ‘Yes’ अशी रचना सीएसकेची झाली आहे.  अगदी ऑक्शनमध्ये उपस्थित असलेल्या मंडळींचा टी शर्ट देखील तेच सांगत होता.

ऑफ स्पिनरवर बोली

सीएसकेनं सुरुवातीला ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. मॅक्सवेलसाठी त्यांनी मोठी बोली लावली. पण, त्यामध्ये त्यांना अपयश आलं. त्यानंतर मोईन अली (Moeen Ali) हा इंग्लंडचा आणि कृष्णप्पा गौतम (K. Gowtham) हा भारतीय ऑलराऊंडर घेतला आहे.

( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )

मोईन अलीला चेन्नई टेस्टमध्ये (Chennai Test) इंग्लंडचा पराभव नक्की झाल्यावर लगावलेले पाच सिक्सर फळले. मॅक्सवेल मिळाला नाही आणि सीएसकेला ऑफ स्पिनर अधिक नंबर 1 ते नंबर 7 पर्यंत कुठंही बॅटींग करु शकेल असा खेळाडू हवा होता. ती जागा मोईननं भरुन काढली आहे.

गौतमला मागच्या आयपीएलमध्ये त्याच्या क्षमतेनुसार खेळ करता आला नाही. कर्नाटककडून चांगली कामगिरी करणाऱ्या या ऑलराऊंडरमध्ये क्षमता चांगली आहे. त्याचा खेळ नव्या टीममध्ये (CSK 2021) खुलला तर सीएसकेचे अनेक प्रश्न सुटतील.

टीममध्ये स्थिरता

रैनाची अनुपस्थिती, वॉटसनचा हरवलेला टच, केदारचा हरवलेला फॉर्म, ब्राव्होची दुखापत आणि धोनीचं कमी झालेलं क्रिकेट यामुळे सीएसकेला मागच्या आयपीएलमध्ये अपयश आले. आता नव्या सिझनमध्ये त्यांनी फार बदल न करता टीममध्ये (CSK 2021)  स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

चेतेश्वर पुजाराचा समावेश

टीम इंडियाची नवी वॉल असलेल्या चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) निवड हा चेन्नईच्याच नाही तर संपूर्ण लिलावातील एक मोठा क्षण होता. पुजाराचं भारतीय क्रिकेटसाठी योगदान मोठं आहे. पण तो T20 क्रिकेटर मानला जात नाही. तो 2014 नंतर एकदाही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्याचा आणि आयपीएल नियमित खेळणारे स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे यांच्या स्ट्राईक रेटमध्ये फार फरक नाही. पुजाराला जर फॉर्म गवसला तर तो त्यांना स्ट्राईक रेटमध्ये या आयपीएलमध्ये गाठू शकतो. पण त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अगदीच गरज भासली तर चेन्नईच्या संथ पिचवर त्याला ओपनिंगला पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

अशी असेल चेन्नईची टीम

ऋतूराज, फाफ, रैना, रायुडू, धोनी, जडेजा, मोईन, करन, शार्दुल, दिपक चहर आणि अकराव्या नंबरला एन्गिडी, ताहीर किंवा हेजलवूड अशी चेन्नईची टीम असेल. त्याचबरोबर जगदीशन, उथप्पा, पुजारा के. गौतम, ब्राव्हो, करण शर्मा, मिचेल स्टॅनर आणि साई किशोर असे चांगले राखीव खेळाडू देखील चेन्नईकडं आहेत. यंदाच्या ऑक्शनमध्ये घेतलेल्या सी. हरी निशांत, हरीशंकर रेड्डी, के. भगत वर्मा या तरुण खेळाडूंसाठी हे शिकण्याचं वर्ष असेल.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ )

चेन्नई सुपर किंग्सची टीम :  महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायुडू, सी.हरी निशात, चेतेश्वर पुजारा, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ ड्यू प्लेसी, इम्रान ताहीर, जोश हेजलवुड, के. भगत वर्मा, के. गौतम, करण शर्मा, केएम असिफ, लुंगी एन्गिडी, मिचेल स्टॅनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर. साई किशोर, रवींद्र जडेजा, रॉबीन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि सुरेश रैना

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: