फोटो – ट्विटर, BCCI IPL

आयुष्यात किंवा खेळात सर्वांच्या अपेक्षा असताना जिंकणं ही मोठी गोष्ट असते, यात वाद नाही. पण, त्याहीपेक्षा मोठी गोष्ट तुम्हाला सर्वांनी मोडीत काढल्यानंतर स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवत जिंकण्यात असते. चेन्नई सुपर किंग्सनं चौथ्यांदा मिळवलेलं आयपीएल विजेतेपद (Chennai Super Kings Win IPL Title) हे दुसऱ्या गटातलं आहे. त्यामुळेच हे विजेतेपद या टीमसाठी खूप खास आहे. ‘ते आता संपले आहेत’ असा कानठळ्या बसणारा जयघोष सुरू असताना या टीमनं या सिझनमध्ये पुनरागमन करत थेट आयपीएल विजेतेपद (CSK IPL 2021 Champion) पटकावले.

क्षमतांवर विश्वास हीच विजयाची खात्री

चेन्नई सुपर किंग्स ही या आयपीएल सायकलमधील (IPL 2018 ते 2021) सर्वात यशस्वी टीम ठरली. त्यांनी चार पैकी 3 वेळा फायनलमध्ये धडक मारली. त्यामध्ये दोन वेळा विजेतेपद पटकावले. तर 2019 मध्ये (IPL 2019) फक्त 1 रननं त्यांचं विजेतेपद हुकलं. आयपीएल 2020 मध्ये ही टीम फ्लॉप गेली. पण, त्यामुळे ते गडबडले नाहीत. लिलावापूर्वी भरमसाठ प्लेयर्सना रिलिज केलं नाही. लिलावात प्रत्येक खेळाडूच्या मागे लागले नाहीत. त्यांनी मोजक्याच जागा रिकाम्या केल्या. त्या जागा भरल्या आणि विजेतेपद पटकावलं.

राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलेल्या रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) चेन्नईनं घेतलं. उथप्पा अगदी शेवटच्या टप्प्यात आयपीएलमध्ये खेळला. पण, टीमनं त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. 2018 मधील फाफ ड्यू प्लेसीसच्या खेळाची आठवण येईल असा खेळ उथप्पानं प्ले ऑफ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केला. आरसीबीनं कधी नीट न वापरलेला इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीवर (Moeen Ali) सीएसकेनं विश्वास दाखवला. त्याला थेट 3 नंबरवर उतरवलं. स्पिनर्सवर हल्ला करण्याचं स्वातंत्र्य दिलं. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सीएसकेच्या विजयात मोईन आघाडीवर होता. दुसऱ्या टप्प्यात तो फार खेळला नाही. त्यामुळे त्याला प्लेईंग 11 मधून वगळण्यात आलं नाही. फायनलमध्ये (IPL 2021 Final) मोईननंही उपयुक्त खेळी (CSK IPL 2021 Champion) केली.

IPL 2021 CSK: संपूर्ण बदल ‘Definitely Not’ हवे तितके बदल ‘Yes’!

चांगले शॉट्स, भरपूर रन

T20 क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी पॉवर गेम खेळला पाहिजे हा समज खोडून काढणारी बॅटींग ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) आणि फाफ ड्यू प्लेलिस (Faf du Plesis) यांनी केली. त्यांना त्यांचा रोल माहिती होता. फाफ पहिल्या 6 ओव्हर्समध्ये फास्टरला अंगावर घेणार आणि ऋतुराज फिल्डर्स पांगल्यावर स्पिनर्सची धुलाई करणार हा सोपा वाटणारा पण अनेकांना न जमणाऱ्या फॉर्म्युलाची त्यांनी अचूक अंमलबजावणी केली.  

इनिंगचा पाया रचणे, स्कोअरबोर्ड हलता ठेवणे आणि शेवटच्या टप्प्यात बॉलर्सवर तुटून पडणे ही कामं ऋतुराजनं केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटी गाठलेलं फटकेबाजीचं शिखर, राजस्थान विरुद्धची सेंच्युरी आणि क्वालिफायरमध्ये मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना दिल्ली विरुद्धची खेळी ऋतुराजमधल्या मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंच ऑरेंज कॅप पटकावली. ड्यू प्लेसिसनंही ऋतुराजच्या खांद्याला खांदा लावून खेळ केला. फायनलमध्ये मॅच विनिंग खेळी केली. ऋतुराजपेक्षा फक्त 2 रन कमी काढले.

ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’

अनुभवी खेळाडूंचे रिटर्न्स

T20 क्रिकेट हा तरुणांचा खेळ समजला जातो. जगभरातील फ्रँचायझी तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करत असताना चेन्नईनं मात्र मागील चार वर्षांमध्ये अनुभवी खेळाडूंमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी टीमला चांगले रिटर्न्स दिले.

अंबाती रायडूनं मुंबई इंडियन्स विरुद्ध हरलेल्या मॅचमध्ये आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावत आयपीएलमधील बेस्ट बॉलिंग अटॅकला तुडवण्याची क्षमता असल्याचं दाखवून दिलं. सीएसकेच्या अन्य विजयातही रायडूनं शांतपणे त्याचे योगदान दिले. ड्वेन ब्राव्होची बॉलिंग आजही शेवटच्या टप्प्यात खेळता येत नाही. ब्राव्होनं त्याला जमत असलेलं काम परफेक्ट करत शेवटच्या ओव्हर्समध्ये रन रोखले.

सर आणि लॉर्ड!

सर रवींद्र जडेजा आणि लॉर्ड शार्दुल ठाकूर या दोघांबद्दल लिहल्याशिवाय या विजेतेपदाबद्दलचं लेखन पूर्ण होणारच नाही. या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यासाठी सर आणि लॉर्ड ही नावं दिली गेली. आज त्यांच्याबद्दल ही नावं आदरानं घेतली जातात.

जडेजानं संपूर्ण स्पर्धेत बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही क्षेत्रात जोरदार कामगिरी केली. पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलच्या एका ओव्हरमध्ये त्यानं 37 रन काढले. झटपट ओव्हर्स टाकण्याची परंपरा जमत जमलेल्या बॅटर्सना आऊट केलं. तसंच बाऊंड्रीचं रक्षण करत कॅचेस घेत मॅचमध्ये टीमला परत आणलं. जडेजावर चेन्नईनं काही वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासानं गुंतवणूक केली होती. त्याचे रिटर्न्स (CSK IPL 2021 Champion) आता मिळत आहेत. धोनीनंतर सीएसकेचा कॅप्टन म्हणून त्याचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

शार्दुल ठाकूरच्या क्रिकेट करिअरला सीएसकेमध्ये चांगलाच ब्रेक मिळाला आहे. शार्दुल हा देशांतर्गत क्रिकेटमधील महागडा बॉलर. त्याच्या रन वाटण्याच्या सवयीमुळे तो यापूर्वीच्या आयपीएल टीमकडून कधी नियमित खेळला नाही. सीएसकेनं शार्दुलला सुरक्षितता दिली. त्याला डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याचा रोल दिला. त्यानं मागील आपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी केली होती. यंदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातील अनुभवानंतर या आयपीएलमध्ये खऱ्या अर्थानं कमाल केली. दोन वर्षांपूर्वी आयपीएल फायनलमध्ये विजेतेपदासाठी एक बॉल 2 रन हवे असताना दुर्दैवी आऊट झालेला शार्दुल ते या आयपीएलमध्ये एकाच ओव्हरमध्ये 2 रन काढत मॅच जिंकून देणारा शार्दुल (CSK IPL 2021 Champion) हा मोठा प्रवास  त्यानं पूर्ण केला आहे.

धोनीची कॅप्टनसी

सीएसकेच्या संपूर्ण टीमला बांधणारा धागा. एक बॅटर म्हणून धोनीसाठी ही स्पर्धा साधारण गेली. पण सीएसकेच्या टीमची मोट एकत्र बांधून विजेतेपद मिळवून देण्यात कॅप्टन म्हणून त्याचं असलेलं कौशल्य सर्वात महत्त्वाचं ठरलं. आयपीएल सोडून अन्य सर्व क्रिकेटमधून रिटायर झालेल्या या माणसानं रांचीतील फार्म हाऊसच्या बाहेर येऊन पुन्हा एकदा त्याच्या कॅप्टनसीची जादू जगाला दाखवली.

मागच्या वर्षीच्या पराभवातून डगमगून न जाता यंदा प्रोसेस नीट केली. थेट आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली. एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त मैदानात 120 टक्के योगदान देऊन होत नाही. तर मैदानात उतरण्यापूर्वी देखील भक्कम प्लॅनिंग केली पाहिजे. हे प्लॅनिंग असेल तर मैदानात उतरल्यावर काम सोपं होतं, हेच धोनीनं पुन्हा एकदा दाखवून (CSK IPL 2021 Champion) दिलं आहे.     

स्पर्धेतील क्रमांक1
सर्वात खराब क्षणराजस्थान रॉयल्स विरुद्ध 189 रन केल्यानंतरही मोठा पराभव
सर्वात आनंदी क्षणआयपीएल स्पर्धेचं विजेतेपद
सर्वात अपयशी खेळाडूसुरेश रैना
सर्वात यशस्वी बॅटरऋतुराज गायकवाड
सर्वात यशस्वी बॉलरशार्दुल ठाकूर
लक्षवेधी खेळाडू रवींद्र जडेजा
रिटेन करावे असे खेळाडूरवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर/सॅम करन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: