
महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही ज्येष्ठांची टीम आहे, असा अनेकांचा मुख्य आक्षेप आहे. T20 क्रिकेट त्यातही आयपीएल स्पर्धा हा तरुणांचा प्रकार मानला जातो. यामध्ये अनेक टीम तरुण टॅलेंटच्या शोधात असतात. आयपीएलच्या अन्य टीमपेक्षा सीएसकेचं धोरण वेगळं आहे. इथं अनुभवी खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं. सीएसकेच्या टीममध्ये एक तरुण खेळाडू आहे. तो त्यांच्या टीमचा आता प्रमुख खेळाडू बनलाय. त्याला पाहिलं की चायना गेटमधील समीर सोनीची (Samir Soni) आठवण येते. तो धोनीच्या चायना गेटमधील समीर सोनी (CSK’s Samir Soni) वाटतो.
चायना गेट सिनेमात समीर सोनी ज्येष्ठांवरील भार हलका करण्यासाठी सर्व प्रकारची कामं करतो. इथंही धोनीच्या टीममधील समीर सोनी (CSK’s Samir Soni) टीमसाठी ओपनिंग बॉलिंग, डेथ बॉलिंग, ओपनिंग बॅटींग आणि डेथ बॅटींग हे सर्व प्रकार करत आहे. त्यानं मागच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) हे सर्व रोल केलेले आपण पाहिले आहेत. या समीर सोनीचं नाव आहे सॅम करन (Sam Curran).
पंजाबमधून झाली सुरुवात
सॅम करनच्या आयपीएल करियरची सुरुवात ही किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) या टीममधून 2019 साली (IPL 2019) झाली. पंजाबने त्याला 7.20 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पंजाबकडून खेळताना दुसऱ्याच मॅचमध्ये सॅम करननं वेगवान 20 रन काढले आणि त्यानंतर हॅट्ट्रीक घेतली. या कारणामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध करननं 23 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी झळकावली. वयाच्या विसाव्या वर्षी पहिल्या आयपीएल सिझनमध्ये खेळणाऱ्या सॅम करननं 9 मॅचमध्ये 95 रन काढले आणि 10 विकेट्स घेतल्या. या समाधानकारक कामगिरीनंतरही सॅम करनला पंजाबनं पुढील सिझनमध्ये कायम ठेवलं नाही.
सरासरी वय कमी केलं, सरासरी खेळ उंचावला
सॅम करनला पुढील सिझनमध्ये (IPL 2020) सीएसकेनं खरेदी केलं. तो सीएसकेकडून मागील सिझनमध्ये सर्व मॅच खेळला. 21 वर्षांचा सॅम करन प्रत्येक मॅच खेळल्यानं सीएसकेच्या अंतिम 11 जणांचं सरासरी वय काही प्रमाणात कमी झालं, पण त्याचवेळी सरासरी खेळाचा स्तर देखील उंचावला.
( वाचा : IPL 2020, चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )
सीएसकेसाठी मागचा सिझन सर्वात खराब गेला. या खराब सिझनमध्ये सॅम करन हा एकमेव त्यांचा आशास्थान होता. त्याने मागच्या सिझनमध्ये 186 रन काढले आणि 13 विकेट्स घेतल्या. तो सीएसकेचा सर्वात यशस्वी बॉलर होता. नव्या खेळाडूंना कानपिचक्या देणाऱ्या धोनीनं देखील या समीर सोनीचं (CSK’s Samir Soni) म्हणजेच सॅम करनचं कौतुक केलं होतं.
यंदा पुन्हा सज्ज
सॅम करन आयपीएल नंतर फार क्रिकेट खेळला नाही. भारताविरुद्धच्या मर्यादीत ओव्हर्सच्या सीरिजमध्ये (India vs England) तो दिसला. शेवटच्या वन-डेमध्ये त्यानं अगदी एकहाती इंग्लंडला विजयाच्या जवळ आणलं होतं. या खेळात अनेकांना धोनीची झलक दिसली. यंदा सीएसकेला मागील अपयश विसरुन पुन्हा एकदा नवी भरारी घ्यायची आहे. त्यांचे प्रमुख खेळाडू हे ज्येष्ठ आहेत. त्याचबरोबर यामधील अनेकांना पुरेशी मॅच प्रॅक्टीस देखील नाही. त्यामुळे या सॅम करनवर मोठी भिस्त असणार आहे. भारताविरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये सुंदर खेळ करत त्यानंही मी या सिझनसाठी सज्ज आहे, हे दाखवून दिलं आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.