फोटो – ट्विटर/@venkateshprasad

राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) याच्या अनावधानाने ‘Spirit Of Cricket’ चा एक मोठा वाद या आयपीएलमध्ये (IPL 2021) सुरु होण्यापूर्वीच संपला. गेल्या दोन वर्षांमध्ये या विषयावर सातत्यानं दोन्ही बाजूनं मतं प्रदर्शित होत आहेत. यावर्षी रहमानचं लक्ष नव्हतं म्हणून हा वाद सुरु झाला नाही.

रहमानचं काय चुकलं?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यातील मॅचमध्ये हा प्रकार घडता-घडता रहमानच्या अनावधानामुळे टळला. राजस्थानकडून शेवटची ओव्हर रहमाननं टाकली. त्या ओव्हरमध्ये रहमाननं बॉल टाकण्यापूर्वी सीएसकेचा ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) रन काढण्यासाठी क्रिजच्या बाहेर पडला होता.

त्यावेळी आर. अश्विनसारखा (R. Ashwin) सजग बॉलर असता तर त्यानं मागच्या आयपीएलप्रमाणे (IPL 2020) किमान बॅट्समनला त्याच्या चुकीची जाणीव करुन दिली असती. पण ती ओव्हर अश्विन नाही तर मुस्तफिजूर रहमान टाकत होता. त्यामुळे त्याला काही ते लक्षात आलं नाही. त्यानं नेहमीच्या पद्धतीनं बॉल टाकला.

भारतीय बॉलर नाराज

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) या प्रकारामुळे नाराज झाला आहे. या प्रसंगाचा फोटो ट्विट करत त्यानं नाराजी व्यक्त केली आहे. ‘बॉलरनं काही इंच बाहेर पाय टाकला तरी त्याला दंड बसतो. बॅट्समन काही यार्ड बाहेर असेल तरी त्याला काही शिक्षा होत नाही. या प्रकारच्या बॅट्समला रन-आऊट करण्याचा बॉलरला पूर्ण अधिकार आहे. या गोष्टीला ‘Spirit of the game’ असे बोलणे हा एक जोक आहे, असं सांगत प्रसादनं या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलला (ICC) टॅग केले आहे.

नियम काय सांगतो?

क्रिकेटमधल्या नियम क्रमांक 41.16 नुसार बॉलरने बॉल टाकल्याशिवाय नॉन स्ट्रायकर एन्डचा बॅट्समन क्रिज सोडू शकत नाही. जर बॅट्समननं क्रिज सोडलं आणि बॉलरनं स्टंप उडवले तर त्या बॅट्सनमनला रन आऊट घोषित केलं जातं.  

IPL 2021: 0,0,0,0,0,1 आंद्रे रसेलला जखडून ठेवणारे मोहम्मद सिराजचे सहा बॉल काय सांगतात?

अडचण कुठं आहे?

दोन वर्षांपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPl 2019) तेंव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कॅप्टन असलेल्या आर. अश्विननं या पद्धतीनं राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर (Jos Buttler) याला रन आऊट केलं होतं. त्याच्या रन-आऊट नंतर जगभरातील ‘Sprit Of Cricket’  मंडळींनी आकांडतांडव केले.

अश्विननं केलेल्या रन आऊटची जखम दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याच्या ऱ्हदयात खोलवर झाली. त्यामुळे त्यानं अश्विननं दिल्लीच्या टीममध्ये येताच त्याला ‘माझ्या टीममध्ये असले Spirit of Cricket विरोधी प्रकार चालणार नाहीत’ अशी तंबी दिली.

मागच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये आरोन फिंच अश्विननं बॉल टाकण्यापूर्वीच पुढं पळाला होता. अश्विनला रन आऊट करण्याची संधी होती, पण त्यानं कोच पॉन्टिंग यांचा आदेश असल्यानं तसं काही केलं नाही. अश्विन बॉल टाकताना थांबला. तो इतका वेळ थांबला की तेंव्हा ‘हॉटस्टार’वर मॅच पाहणाऱ्या काही मंडळींना आपलं प्रक्षेपण गंडलंय की काय? असं वाटलं. अश्विननं फिंचला रन आऊट न करता फक्त सूचना दिली.

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट!

‘Spirit of Cricket’ जपलं पाहिजे!

एखाद्या विकेटकिपरला उद्या कोचनं बॅट्समननं क्रिज सोडली तरी ‘Spirit Of Cricket’ जपण्यासाठी तू स्टंपिंग करु नकोस हे सांगणे जितकं हास्यापद असेल तितकीच रिकी पॉन्टिंगनं अश्विनला केलेली सूचना हास्यास्पद होती आणि आहे. पण, कोचचा आदेश असल्यानं अश्विननं एक खेळाडू म्हणून त्याचं पालन केलं.

या लेखाच्या सुरुवातील आम्ही मुस्तफिजूर रहमानचे आभार मानले याचं कारण हेच आहे. कारण त्याचं ब्रोव्हो बाहेर आहे, याकडं लक्ष गेलं असतं तर कदाचित त्यानंही ब्राव्होला रन-आऊट करण्याचा प्रयत्न केला असता. त्यानंतर कदाचित पुन्हा एकदा गजहब उडाला असता.

क्रिकेटचे नियम काहीही असो, डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, व्यंकटेश प्रसाद यासारखी मंडळी काही म्हणो ‘Spirit Of Cricket’  जपलं गेलं पाहिजे. हेच काही मंडळींसाठी अंतिम सत्य (Last Word) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: