फोटो – ट्विटर/@DelhiCapitals

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) साठी मागील सिझन (IPL 2020) हा आजवरचा सर्वात यशस्वी सिझन होता. दिल्लीनं आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता मागच्या वर्षी थोडं अलिकडं पडलेलं पाऊल पुढे टाकत विजेतेपदावर नाव कोरण्याचा दिल्लीचा यंदा (DC 2021) प्रयत्न असेल.

पॉन्टिंगच्या टीममध्ये स्मिथ

श्रेयस अय्यरची टीम (Shreyas Iyer) यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. या लिलावापूर्वी (IPL Auction 2021)  त्यांनी टीममधील कोअर गट कायम ठेवला होता. मागच्या वर्षीच्या अनुभवानंतर त्यांना एक बॅटिंग ऑल राऊंडर आणि ऋषभ पंतला (Rishabh Pant) बॅक अप म्हणून एक विकेटकिपर हवा होता. अमित मिश्राचा (Amit Mishra) बॅक अप म्हणून एक चांगला लेगस्पिनर देखील टीमची गरज होती.

दिल्लीनं सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथची  (Steve Smith)   निवड केली. स्मिथ आणि रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) ही ऑस्ट्रेलियन जोडी आता दिल्लीत एकत्र आली आहे. स्मिथ कमी पैशात मिळाला हे जरी खरं असलं तरी टी-20 क्रिकेटमध्ये आजवर फार मोठी कामगिरी न करणाऱ्या स्मिथला घेऊन दिल्लीलं कुणाला खूश केलं? हा प्रश्न पडला आहे.

शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे ओपनर एकाच पद्धतीनं खेळणारे आहेत. त्यामुळेच मागच्या वर्षी पृथ्वी शॉ चा फॉर्म हरपल्यानंतर दिल्लीच्या वेगवान सुरुवातीला खिळ बसली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी दिल्लीला अखेर शेवटच्या टप्प्यात मार्कस स्टॉईनिसला ओपनिंगला पाठवावं लागलं. आता एखादा आक्रमक टॉप ऑर्डरचा बॅट्समन घेण्याच्या ऐवजी दिल्लीनं धवन आणि रहाणे पंथामधील स्मिथला घेतलं आहे. पॉन्टिंग कनेक्शनचाच फायदा स्मिथला झाला का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.

( वाचा : IPL 2020 दिल्ली कॅपिटल्स : एक पाऊल पुढे, तरीही अजून बरेच मागे! )

चमत्कारिक निवड

इंग्लडचा फास्ट बॉलर टॉम करन (Tom Currn) हा दिल्लीचा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मागच्या आयपीएल सिझनमध्ये संपूर्ण फ्लॉप गेलेल्या करनला घेऊन दिल्लीनं काय साधलं? हा प्रश्न आहे. दिल्लीकडे कागिसो रबाडा आणि अँनरिच नॉर्खिया ही दक्षिण आफ्रिकन फास्ट बॉलरची चांगली जोडी आहे. त्याचबरोबर त्यांना बॅक अप म्हणून ख्रिस वोक्स देखील यावर्षी असेल. यामुळे करनची अंतिम 11 मध्ये निवड होण्याची शक्यता नाही. तरीही बॅटींग ऑल राऊंडरची निवड न करता दिल्लीनं इंग्लंडच्या करनवर मेहरबानी केली आहे.  

भारतीय खेळाडूंचा समावेश

भारतीय टेस्ट टीममधील खेळाडूंना प्रतिनिधित्व हे दिल्ली कॅपिटल्स कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य (DC 2021)  यंदाही कायम राहिलं आहे. इशांत शर्माचा टेस्ट टीममधील सहकारी उमेश यादव (Umesh Yadav) दिल्लीच्या टीममध्ये परतलाय. त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणारा लुकमन मेरीवाला (Lukman Meriwala) आणि फायनलचा हिरो एम. सिद्धार्थ (M. Siddharth) यांना दिल्लीलं करारबद्ध करत भारतीय खेळाडूंचा चांगला संच केला आहे. विष्णू विनोद (Vishnu Vinod) हा आणखी एक चांगला विकेटकिपर ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून दिल्लीच्या टीममध्ये आला आहे.

( वाचा : SMAT: सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ बॉलर्सना उघडणार IPL चे दार? )

दिल्ली कॅपिटल्सला आजवर एकदाही न मिळालेलं विजेतेपद पटकावण्यासाठी यंदा (DC 2021) मागच्या वर्षी पेक्षा एक पाऊल पुढं टाकण्याची शक्यता आहे. हे पाऊल पुढं पडण्यासाठीचे अडथळे लिलावानंतरही कायम आहेत.

दिल्ली कॅपिटल्सची टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अमित मिश्रा, अँनरिच नॉर्खिया आवेश खान, अक्षर पटेल, ख्रिस वोक्स, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, ललित यादव, लुकमन मेरीवाला, एम. सिद्धार्थ, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, आर. अश्विन, रिपल पटेल, ऋषभ पंत, सॅम बिलिंग्ज, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ, टॉम करन, उमेश यादव आणि विष्णू विनोद

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: