
दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धची पराभवाची मालिका अखेर ब्रेक केली आहे. पाच सलग पराभवानंतर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्त्वाखालील टीमनं आयपीएल चॅम्पियनचा 6 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा रोहित शर्माचा निर्णय अंगलट आला. मुंबई इंडियन्सच्या पराभवात अमित मिश्रा (Amit Mishra) याने निर्णायक भूमिका बजावली. त्यानं 24 रनमध्येच 4 विकेट्स (Amit Mishra vs MI) घेतल्या.
निवड समिताला विसर
अमित मिश्रा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय बॉलर आहे. एकूण यादीमध्येही त्याच्या पुढे फक्त लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. मिश्राजी या नावानं क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या 38 वर्षांच्या बॉलरचा निवड समितीला विसर पडून आता 5 वर्ष उलटलीत. T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा मुख्य स्पिनर असलेल्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) ज्या चेन्नईच्या पिचवर पहिल्या दोन मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. तिथं अमित मिश्रानं पहिल्याच मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सला पाडलं खिंडार
मुंबई इंडियन्सची बॅटींग ही आयपीएल स्पर्धेत बलाढ्य समजली जाते. पॉवर प्लेच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतनं मिश्राला बॉलिंग दिली. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा स्कोअर 1 आऊट 45 होता. मिश्राला पहिल्या ओव्हरमध्ये कमाल करता आली नाही. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन दिले.
मिश्राची पुढची ओव्हर मॅचसाठी टर्निंग पॉईंट ठरली. रोहित शर्मा (Rohit Sharma) सेट झाला होता. तो मिश्राच्या बॉलवर सिक्स मारण्यासाठी क्रिजसोडून पुढं सरसावला. हुशार मिश्रानं लगेच जाणीवपूर्वक 79 किमी प्रती तास वेगाचा संथ लेग ब्रेक बॉल रोहितच्या ऑफ स्टंपवर टाकला. रोहितला बॉलपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावा लागला. त्यामुळे रोहितला अपेक्षित फटका मारता आला नाही. तो स्टीव्ह स्मिथकडं कॅच देऊन आऊट झाला. त्यानंतर एकाच बॉलच्या अंतरानं मिश्रानं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मोहात पाडलं. हार्दिकही स्मिथकडं कॅच देऊन शून्यावर आऊट झाला.
एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्यानंतरही ऋषभ पंतनं मिश्राला पुढची ओव्हर दिली नाही. पंतनं कायरन पोलार्डसाठी (Kieron Pollard) मिश्राला राखून ठेवलं. पोलार्ड आला आणि मिश्रानं त्याला फसवलं. त्यानंतर मिश्रानं त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सेट झालेल्या इशान किशनला (Ishan Kishan) साफ चकवत बोल्ड केलं. मिश्राच्या या चार विकेट्सनं (Amit Mishra vs MI) मुंबई इंडियन्सला अपेक्षित स्कोअर उभा करता आला नाही.
IPL 2021: ऋषभ पंतला टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या जवळ नेणारी स्पर्धा
नव्या रेकॉर्डची नोंद
अनुभवी अमित मिश्राला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ नं गौरवण्यात आलं. या आयपीएलमध्ये (IPL 2021) खेळणाऱ्या बॉलर्समध्ये सर्वात जास्त (12) वेळा या पुरस्काराचा मानकरी होण्याचा रेकॉर्ड मिश्रांच्या नावावर आहे. या यादीमध्ये हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जडेजाला टाकलं मागं
अमित मिश्रानं मुंबई इंडियन्स विरुद्ध (Amit Mishra vs MI) चार विकेट्स घेतल्या. एकाच इनिंगमध्ये चार विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं पाचव्यांदा केली आहे. ही कामगिरी सर्वात जास्त वेळा करणारा तो भारतीय बॉलर आहे. त्यानं याबाबतीत रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) मागं टाकलंय. एकूण यादीमध्ये लसिथ मलिंगा अव्वल आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.