फोटो – सोशल मीडिया

डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या आयुष्यात 2 मे 2021 हा दिवस वेगळा होता. 2014 पासून ज्या आयपीएल टीममध्ये आहे. ज्या टीमचा तो 2016 पासून कॅप्टन आहे. ज्या टीमकडून त्यानं सर्वात जास्त रन केले. टीमला अनेक विजय मिळवून दिले. एक आयपीएल विजेतेपद मिळवलं. मशिनगनमधून गोळ्या निघाव्या तसे वेगानं रन जमवले. नव्या पोरांना विश्वास दिला. बॉल टाकण्यापूर्वी मैदानातील दुसऱ्या टोकापासून पळत येऊन बॉलर्सना धीर दिला. त्या सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) वॉर्नरला टीमच्या बाहेर बसवलं. वॉर्नर मॅच खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि तरीही बेंचवर बसलाय हे 2014 पासून पहिल्यांदाच घडलंय. आयपीएल स्पर्धा म्हणजे वॉर्नरचे 500 रन हे समीकरण वर्षानुवर्ष पाहण्याची सवय असलेल्या प्रत्येकाला हैदराबादनं त्यांच्या सर्वात बेस्ट अशा डेव्हिड वॉर्नरला बाहेर का (Why Warner Out?) काढलं? हा प्रश्न आता पडला आहे.

निराशाजनक कामगिरी

सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरच्या कॅप्टनसीमध्ये पहिल्या 6 पैकी 5 मॅच गमावल्या. यापूर्वी 2014 आणि 2015 च्या आयपीएल सिझनमध्ये देखील हैदराबादची अशीच खराब सुरुवात झाली होती. त्या दोन्ही वर्षी हैदराबादला ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यानंतर 2016 ते 2020 या काळात प्रत्येक वर्षी हैदराबादनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे.

डेव्हिड वॉर्नर 2016 साली हैदराबादचा कॅप्टन झाला. त्याचवर्षी त्यांनी आयपीएल चॅम्पियनशीप (IPL 2016) पटकावली. एका वर्षांच्या बंदीमुळे 2018 साली आणि ऑस्ट्रेलियाची टीम जॉईन करण्यासाठी 2019 मधील ‘प्ले ऑफ’ दरम्यान वॉर्नर टीममध्ये नव्हता. या काळात आता हैदराबादचा कॅप्टन झालेल्या केन विल्यमसन (Kane Williamson) यानं टीमचं नेतृत्त्व केलं होतं.

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’

वॉर्नर पहिल्या सहा मॅचमध्ये हैदराबादचा क्रमांक दोनचा यशस्वी बॅट्समन आहे. 6 पैकी दोन वेळा त्यानं अर्धशतक झळकावलं. पण त्याचा स्ट्राईक रेट हा 110 इतका कमी होता. हैदराबादचे  5 पैकी 4 पराभव रनचा पाठलाग करताना झाले. यापैकी एकाही मॅचमध्ये वॉर्नरला शेवटपर्यंत उभं राहून टीमसाठी मॅच जिंकून देता आली नाही. चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध वॉर्नरनं अर्धशतक झळकावलं. पण त्या मॅचमध्ये खेळताना त्याला गॅप सापडत नव्हता. मनासारखे फटके मारता न आल्यामुळे स्वत:वरच निराश झालेला वॉर्नर त्या रात्री सर्व जगानं पाहिला.

विल्यमसन कॅप्टन का?

केन विल्यमसनकडं न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमचा अनुभव आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं भरपूर रन केले आहेत. वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं यापूर्वी हैदराबादच्या टीमचं नेतृत्त्व योग्य प्रकारे केलं होतं. तो या आयपीएल सिझनमध्येही चांगल्या टचमध्ये आहे. सीएसके विरुद्धच्या मॅचमध्ये वॉर्नरनं संघर्ष केला. पण त्याचवेळी विल्यमसननं 260 च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. टच हरवलेला आणि टचमध्ये असलेला बॅट्समन यामधील तो फरक होता.

टीममधील जागा का गेली?

वॉर्नर कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. त्याचा स्ट्राईक रेट कमी होता. त्यामुळे अनुभवी विल्यमसन कॅप्टन झाला. पण त्याची टीममधील जागा का गेली? (Why Warner Out?) हा प्रश्न कायम आहे. हे समजण्यासाठीचं दृश्य कारण म्हणजे टीममधील परदेशी खेळाडूंचं समीकरण. राशिद खान (Rashid Khan) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) हे दोघे फॉर्मात आहेत. विल्यनसन आता कॅप्टन आहे. त्यात वॉर्नरलाही टीममध्ये ठेवल्यास चारही विदेशी खेळाडूंच्या जागा पॅक होतात.

त्यामुळे बेंचवर असलेल्या मोहम्मद नबी, जेसन होल्डर, जेसन रॉय किंवा मुजीब यापैकी कुणालाही मॅचच्या परिस्थितीप्रमाणे घेणं हैदराबादला शक्य होत नव्हतं. त्यामुळे ती जागा ओपन करण्यासाठी वॉर्नरला टीममधून काढलं (Why Warner Out?) हे झालं वॉर्नरला आऊट करण्याचं दृश्य कारण.

क्रिकेटमधील मोजकेच दिवस शिल्लक असल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली!

निवड समितीशी मतभेद भोवले?

सनरायझर्स हैदराबादचा वरिष्ठ खेळाडू मनिष पांडे (Manish Pandey) याला टीममधून वगळण्याच्या निर्णयावर वॉर्नरनं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 26 एप्रिल रोजी झालेल्या मॅचमध्ये वॉर्नरनं नाराजी व्यक्त केली होती.

“माझ्या मते तो कठोर निर्णय होता. मात्र तो निर्णय शेवटी निवड समितीनं घेतला होता’’ या शब्दात वॉर्नरनं पांडेला वगळण्याच्या निर्णयावर मत व्यक्त केलं होतं. हैदराबादचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मुडी, कोच ट्रेवर बेलिस आणि मेंटॉर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या निवड समितीवर वॉर्नरनं नाराजी व्यक्त केली होती. वॉर्नरला त्याचं हेच वक्तव्य सर्वात जास्त भोवलं अशी शक्यता आहे. याच वक्तव्यानंतर त्याच्या अडचणी सुरु झाल्या आणि तो आधी कॅप्टनपदावरुन आणि नंतर टीममधून आऊट (Why Warner Out?) झाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: