
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) सतत अपयशी होणं, हे आयपीएल स्पर्धेतील एक रहस्य होतं. हा आयपीएल सिझन (IPL 2021) याला अपवाद ठरत आहे. मॅक्सवेलनं पहिल्या दोन्ही मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) चांगला खेळ केला आहे. आरसीबीमध्ये आल्यानंतर अशी काय जादू झाली? आणि मॅक्सवेल खेळू लागला…असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मॅक्सवेलनंच आता या प्रश्नाचं उत्तर (Maxwell On RCB) दिलंय.
मॅक्सवेलची स्पर्धेतील कामगिरी
ग्लेन मॅक्सवेलला मागच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) एकही सिक्स मारता आला नव्हता. त्यानं या आयपीएलमधील दोन मॅचमध्येच पाच सिक्स मारले आहेत. मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये मॅक्सवेलनं सिक्सचा दुष्काळ संपवला. त्यानं तब्बल 1079 दिवसानंतर आयपीएलमध्ये सिक्स मारला. 170 बॉल आणि 18 इनिंगनंतर मॅक्सवेलनं सिक्स मारला होता.
या सिक्सनंतर मॅक्सवेलचा आत्मविश्वास वाढला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीत त्यानं 28 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह 39 रन काढले होते. त्या मॅचमध्ये मॅक्सवेल शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकला नव्हता.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मॅक्सवेलनं आणखी एक पाऊल पुढं टाकत अगदी शेवटच्या बॉलपर्यंत त्यानं किल्ला लढवला. चेन्नईचं पिच बॅटींगसाठी अवघड आहे. विराट कोहली आणि डीव्हिलियर्स आऊट झाल्यानं सर्व जबाबदारी मॅक्सवेलवर होती. यापूर्वी सर्रास विकेट फेकणाऱ्या मॅक्सवेलनं मंगळवारी त्याच्या गुणवत्तेला साजेसा खेळ केला. त्यानं 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 59 रन काढले. पाच वर्ष आणि 40 इनिंगनंतर मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये हाफ सेंच्युरी केली. या खेळाबद्दल मॅक्सवेलला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.
बेभरवशाच्या आणि नव्या खेळाडूवर आरसीबीचा जुगार, रिस्क है तो…
दोन मॅचमध्ये नेमकं काय बदललं?
ग्लेन मॅक्सवेलनं हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर बोलताना त्याच्या बदललेल्या खेळाचं रहस्य सांगितलं आहे. ‘आरसीबीकडून माझी सुरुवात चांगली झालीय. त्यांनी (Maxwell On RCB) मला विशिष्ट जबाबदारी सोपवलीय. माझ्या सोबतचे बॅट्समन मला स्थिर होऊन मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ देतात. ऑस्ट्रेलियन टीममध्ये मला असलेल्या रोलसारखी ही जबाबदारी आहे.” असं मॅक्सवेलनं सांगितलं.
ग्लेन मॅक्सवेलची ही चौथी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून खेळला आहे. अन्य टीम आणि आरसीबीमधील फरक देखील मॅक्सवेलनं (Maxwell On RCB) यावेळी उलगडला.
बंगळुरु फॅन्सचं विराट स्वप्न पूर्ण होणार का?
“मी मैदानावर येताच मोठे फटके मारावेत अशी अन्य फ्रँचायझींची माझ्याकडून अपेक्षा होती. ज्यामधे मी फारसा चांगला नाही. ही माझी चौथी आयपीएल टीम आहे. त्याचा माझ्यावर काही प्रमाणात दबाव होता. पण मी सुरुवात चांगली केलीय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी बॉलिंग करण्याची संधी कधी मिळेल याची वाट पाहात आहे. वॉशिंग्टन सुंदर आमचा सुपरस्टार आहे. मी जितकी बॉलिंग कमी करेल तितकं बॅटींगमध्ये अधिक योगदान देईल आणि तितकाच आनंदी असेल.” असं मॅक्सवेलनं यावेळी स्पष्ट केलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.