
कोणत्याही गोष्टींमध्ये सतत नकारात्मकता शोधण्यात, परिस्थितीला नावं ठेवण्यात आणि दुसऱ्याला नावं ठेवणाऱ्या आपल्या सर्वांसाठीच एक जिद्दीची गोष्ट क्रिकेटच्या मैदानातून आहे. आयपीएल स्पर्धेनं अनेक खेळाडूंची जगाला ओळख करुन दिली आहे. त्यांचं आयुष्य या स्पर्धेनं बदललं. दरवर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये नवे खेळाडू उदयाला येतात. या आयपीएलनं (IPL 2021) चेतन सकारियाची (Chetan Sakariya) जगाला ओळख करुन दिली आहे.
पहिल्याच मॅचमध्ये छाप
राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) कार्तिक त्यागी जखमी झाल्यानं चेतन सकारियाला पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये संधी दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे मैदान हे बॅट्समनसाठी नंदनवन ठरत आहे. पंजाबच्या टीममध्ये अनेक आक्रमक बॅट्समन आहेत. त्यांनी राजस्थान विरुद्ध 221 रन करत बॅटींगची शक्ती देखील दाखवली. बॉलर्सची कसोटी पाहणाऱ्या पिचवर आणि प्रतिस्पर्धी टीम विरुद्ध सौराष्ट्राचा फास्ट बॉलर असलेल्या चेतननं आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
चेतननं 4 ओव्हर्समध्ये 31 रन देत मयांक अग्रवाल, केएल राहुल आणि झाय रिचर्डसन या तिघांना आऊट केलं. राजस्थानच्या इनिंगची पहिली आणि शेवटची या दोन्ही ओव्हर चेतननं टाकल्या. T20 क्रिकेटमध्ये ‘पॉवर प्ले’ आणि ‘डेथ ओव्हर्स’ या दोन्ही विभागात चांगली बॉलिंग करण्याची क्षमता चेतननं दाखवून दिली आहे. त्याचबरोबर त्यानं निकोलस पुरनचा एक अविस्मरणीय कॅच घेतला. राजस्थाननं खराब फिल्डिंग करत तीन कॅच सोडल्या असताना चेतननं टीमचा फिल्डिंगचा स्तरही उंचावण्याचा प्रयत्न केला.
खेळायला बुटही नव्हते...
23 वर्षांच्या चेतन सकारियाचं (Chetan Sakariya) नाव सहा वर्षांपूर्वी कुचबिहार ट्रॉफीमध्ये सर्व प्रथम चर्चेत आलं होतं. त्यानं त्या स्पर्धेतील सहा मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याची चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशसाठी निवड झाली. या ठिकाणी जाण्यासाठी चेतनकडं चांगले बुटही नव्हते.
सौराष्ट्रचा सिनियर खेळाडू शेल्डन जॅक्सन याने चेतनला बुट घेऊन दिले. ‘मला नेटमध्ये आऊट केलंस तर तुला बुट घेऊन देईल’ असं चॅलेंज जॅक्सननं चेतनला दिलं होतं. चेतननं ते चॅलेंज पूर्ण केलं. त्यानंतर जॅक्सननं दिलेल्या नव्या बुटासह तो एमआरएफ फांऊडेशनमध्ये गेला.
यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) चेतननं 4.90 च्या इकॉनॉमी रेटनं 12 विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी पाहूनच राजस्थान रॉयल्सनं त्याला करारबद्ध केलं.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ बॉलर्सना उघडणार IPL चे दार?
चेतनची गोष्ट वेगळी का आहे?
चेतन सकारियाच्या (Chetan Sakariya) या प्रवासाचं महत्त्व त्यानं आजवरच्या प्रवासात किती खास्ता खाल्ल्या आहेत, हे समजल्याशिवाय कळणार नाही. चेतनचे वडिल हे टेम्पो ड्रायव्हर होते. त्यांचा टेम्पो चालवताना तीनदा अपघात झाला आहे. त्यामुळे ते आता अंथरुणाला खिळून आहेत.
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चेतनचं क्रिकेट एक वर्ष थांबलं होतं. यावेळी त्याच्या मामानं त्याला क्रिकेट खेळण्यासाठी मदत केली. चेतनला इंजिनियर व्हायचं होतं. पण त्यानं शिक्षण थांबवलं. त्यानं दोन वर्ष बुक स्टॉलवर नोकरी केली.
यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु असताना चेतनच्या भावानं आत्महत्या केली. चेतनच्या खेळावर याचा परिणाम होऊ नये म्हणून घरच्यांनी ही बातमी त्यापासून सहा दिवस लपवून ठेवली होती.
चेतन आयपीएल लिलावानंतर कोट्याधीश झाला. सध्या तो घरचा एकमेव कमावता व्यक्ती आहे. या स्पर्धेतून मिळणाऱ्या पैशातून राजकोटमध्ये चांगलं घर घेण्याचं चेतनचं स्वप्न आहे. परिस्थितीशी झगडून त्यावर मात करत चेतन सकारिया (Chetan Sakariya) ‘सौराष्ट्र एक्स्प्रेस’ नं इथवरचा प्रवास केला आहे. आगामी काळात ही एक्स्प्रेस यशाची आणखी स्टेशन पार करेल यात शंका नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.