फोटो – ट्विटर

आंद्रे रसेल (Andre Russell) हा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) किंवा आयपीएलचा नाही तर क्रिकेटविश्वातील सर्वात आक्रमक बॅट्समनपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) ओळख अगदी मागच्या आयपीएलपर्यंत पंचिंग बॅग अशी होती. आंद्रे रसेल हा केकेआरचा गेल्या अनेक वर्षांपासून आधारस्तंभ आहे. सिराजचं त्याच्या आयपीएल टीममधील स्थान मागच्या वर्षीपर्यंत नक्की नव्हतं. शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन समोर दिसेल त्या बॉलवर बॅटचा दांडपट्टा फिरवणं हे काम रसेल कित्येक वर्षांपासून करत आला आहे. आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्येही रसेलनं ते काम सुरु केलं होतं. रसेलला भरती आली होती तेंव्हा मोहम्मद सिराज 19 व्या ओव्हरला रसेलविरुद्ध (Siraj vs Russell) बॉलिंगला आला आणि त्यानं भन्नाट 6 बॉल टाकले. सिराजनं त्या ओव्हरचे सर्व बॉल रसेलला टाकले. त्या 6 बॉलमध्ये फक्त 1 रन निघाला.

दोघांमधील इतिहास रंजक

मोहम्मद सिराज विरुद्ध आंद्रे रसेल  (Siraj vs Russell) यांच्यातीस द्वंद्वाचा रंजक इतिहास आहे. 2018 साली या दोन टीममध्ये झालेल्या आयपीएल मॅचमध्ये सिराजनं रसेलला त्याच्या वाढदिवशी पहिल्या बॉलवर आऊट (Golden Duck) केलं होतं.

सिराजनं 2018 साली रसेलची वाढदिवसाची पार्टी खराब केली. पुढच्या वर्षी चेहरा लपवण्याची वेळ सिराजवर येणार होती. 2019 च्या आयपीएलमध्ये रसेल बॅटींगला आल्यावर विराट कोहलीनं (Virat Kohli) 18 व्या ओव्हरमध्ये मोठ्या अपेक्षेनं सिराजकडं बॉल दिला. सिराजनं दोन बॉल निर्धाव (डॉट) टाकत सुरुवात चांगली केली. तिसरा बॉल वाईड बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रसेलनं वेगानं बॅट फिरवीत त्यावर सिक्स लगावला.

त्यानंतरच्या पुढच्या बॉलवर ती दुर्दैवी घटना घडली. सिराजनं तो बॉल बिमर टाकला. सिराजनं त्या मॅचमध्ये टाकलेला तो दुसरा बिमर होता. त्यामुळे अंपायरनं त्याची बॉलिंग थांबवली. सिराजचे उरलेले दोन बॉल मार्कस स्टॉईनिसला टाकावे लागले. स्टॉईनिसच्या त्या दोन्ही बॉलवर रसेलनं खणखणीत सिक्स खेचले. मोक्याच्या क्षणी कॅप्टनच्या विश्वासाला आणि टीमच्या अपेक्षांना सुरुंग लावणाऱ्या सिराजवर त्यावेळी जोरदार टीका झाली होती

2021 मध्ये बदल कसा झाला?

मोहम्मद सिराजनं 18 एप्रिल 2021 रोजी झालेल्या आयपीएल मॅचमध्ये रसेलवर वर्चस्व गाजवल्याचा ज्यांना धक्का बसला असेल त्यांनी एक वर्षांपूर्वी या दोन टीमच्या मॅचमध्ये काय झालं हे आठवलं पाहिजे.

21 ऑक्टोबर 2020 रोजी या दोन टीममध्ये (RCB vs KKR) झालेली मॅच ही सिराजच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. त्यानं त्या मॅचमध्ये 4 ओव्हर 2 मेडन 8 रन आणि 3 विकेट्स अशी भन्नाट बॉलिंग केली. सिराजनं यापैकी पहिल्या दोन ओव्हर मेडन टाकत 3 विकेट्स घेतल्या होत्या. हेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर पहिल्या 2 ओव्हरनंतर सिराजच्या बॉलिंगचं विश्लेषण होतं, 2 ओव्हर 2 मेडन शून्य रन आणि 3 विकेट्स.

केकेआर विरुद्ध झालेली ती मॅच रसेल दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण सिराजच्या आयुष्यासाठी ती मॅच टर्निंग पॉईंट ठरली. पंचिंग बॅग ही त्याची ओळख त्या मॅचमुळे पुसली गेली. त्यानंतर सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आणि त्यानंतर जे घडलं हा इतिहास सर्वांना माहिती आहे.

मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता!

‘या’ मॅचमध्ये काय झालं?

मोहम्मद सिराज आंद्रे रसेलच्या विरुदध बॉलिंगला येण्यापूर्वी (Siraj vs Russell) रसेल सेट झाला होता. त्यानं युजवेंद्र चहलनं टाकलेल्या 17 व्या ओव्हरमध्ये 6,4,4,4 अशी धुलाई केली होती. जेमिसनच्या 18 व्या ओव्हरमध्ये फार रन निघाले नाहीत. त्यामुळे सिराज 19 वी ओव्हर सुरु करण्यापूर्वी केकेआरला मॅच जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 44 रन हवे होते. सिराजसमोर रसेल स्ट्राईकवर होता.

रसेलसारखा आक्रमक बॅट्समन मैदानात आणि समोर रनरेट डोंगराएवढा झालेला. डोंगर चढण्यासाठी आता पाऱ्यांची नाही तर रोप-वे ची गरज होती. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त टार्गेट राहू नये म्हणून 19 व्या ओव्हरमध्येच जास्तीत जास्त रन काढण्याची रसेलची योजना होती.

रसेलला फक्त बॉल टप्प्यात मिळाला की शक्तीचा प्रयोग करुन त्यावर सिक्स किंवा फोर मारायचा होता. रसेल हे काम कित्येक वर्षांपासून करत आलाय. याच कामासाठी त्याला केकेआरनं इतकी वर्ष टीममध्ये सांभाळलं आहे. याच कामामुळे त्याचा जगभर दरारा आहे. त्यामुळे रसेलपेक्षा जास्त दबाव हा सिराजवर होता.

IPL 2021 KKR : प्रयोग कमी केले तरी बरंच काम होईल!

‘आता सिराज बदलला आहे’

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीच्या शब्दात सांगायचं तर सिराजमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर खूप बदल झाला आहे. वडिलांच्या निधनाचं दु:ख, सिडनीमध्ये प्रेक्षकांनी केलेली वंशद्वेषी टिप्पणी, ब्रिस्बेन टेस्टमध्ये सर्व प्रमुख बॉलर्स जखमी झाल्यानं अचानक आलेलं बॉलिंग युनिटचं नेतेपद या सर्व कसोटीच्या प्रसंगांचा सिराजच्या क्रिकेटवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट त्याचं क्रिकेटमधील कौशल्य घासून-पुसून लख्ख झालंय.

या बदललेल्या सिराजनं आंद्रे रसेलला शेवटपर्यंत बॅटवर ब़ॉल दिला नाही. आता सिक्स मारेन, पुढच्या बॉलवर सिक्स मारेन, त्यानंतरच्या बॉलवर तर मी नक्की सिक्स मारतो असं करत रसेलनं सिराजचे पाच बॉल खेळून काढले. त्याला एक रन काढून स्ट्राईक बदलण्याची संधी होती. पण त्यानं तसं केलं नाही. रसेलच्या प्रत्येक चालीवर, सर्व प्रकारच्या दबावतंत्रावर, सिराजकडं उत्तर होतं. पाच बॉल सिक्स मारण्याच्या प्रयत्नात वाया घालवल्यानंतर रसेलला अखेर शेवटच्या बॉलवर 1 रन घ्यावा लागला.

IPL 2021 : बंगळुरु फॅन्सचं ‘विराट’ स्वप्न पूर्ण होणार का?

मोहम्मद सिराज आता बदललाय. तो आता आव्हान समोर आल्यानंतर चुकत नाही हे सिराजनं दाखवून दिलं. आरसीबीची या आयपीएलमधील पुढील वाटचाल कशी असेल याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. पण सिराजच्या करियरमध्ये ही ओव्हर आणखी एक बदल घडवणार आहे.

त्याचबरोबर अन्य टीमला देखील रसेलला डेथ ओव्हरमध्ये फटके मारण्यापासून रोखता येतं हा संदेश या मॅचमधून गेला आहे. 0,0,0,0,0 आणि 1 या सिराजनं टाकलेल्या भन्नाट ओव्हरचा हा अर्थ आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: