फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल स्पर्धा ही अनेक भन्नाट गोष्टींचं घर आहे. पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) हुशार शेन वॉर्ननं (Shane Warne) नव्या पोरांना हाताशी धरत थेट विजेतेपद पटकावले होते. शेन वॉर्नची ती टीम आणि ते विजेतेपद हे आता ‘क्रिकेट कथा’ चा भाग बनलंय. त्याच पद्धतीची एक आणखी एक अद्भुत गोष्ट यंदा घडलीय. गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans)  त्यांच्या पहिल्याच सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद पटकावलंय. पहिल्या सिझनच्या वेळी T20 क्रिकेट नवं होतं. अनेक आयपीएल फ्रँचायझी चाचपडत होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही. प्रत्येक टीमकडं ‘डेटा महासागर’ आहे. त्यानंतरही वेगवेगळ्या आयपीएल टीमनं कमी लेखलेल्या खेळाडूंना हाताशी धरून गुजरातनं विजेतेपद जिंकणे हे अधिक आव्हानात्मक होतं त्यामुळे अधिक अद्भुत आहे. त्यामुळेच हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीचं हे गुजरात मॉडेल (IPL 2022 GT Season Review) ही एका नव्या बदलाची नांदी आहे.

हार्दिक पांड्या – द कॅप्टन!

हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) आयपीएल टीमचा कॅप्टन होण्याची ही सर्वात योग्य वेळ होती. त्याचा फॉर्म आणि फिटनेस खालावला होता. टीम इंडियातील जागा गेली. मुंबई इंडियन्सनं रिटेन केले नाही. अनेकांनी ‘तो संपला’ अशी भविष्यवाणी केली. त्यावेळी हार्दिकला गुजरात टायटन्सच्या कॅप्टन पदाची संधी चालून आली. त्यानं कॅप्टन म्हणून आघाडीवर राहून नेतृत्त्व केलं. त्याचा सर्वोत्तम खेळ केला आणि सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम खेळ काढून घेतला.

हार्दिकनं बॅट आणि बॉल या दोन्हीच्या माध्यमातून आघाडीवर राहून टीमचं नेतृत्त्व केलं. त्यानं टीमची गरज ओळखून मिडल ऑर्डरची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं प्रत्येक मॅचमध्ये बॉलिंग केली नाही. पण, केली तेव्हा त्याचा परिणाम होईल याची काळजी घेतली. आयपीएल फायनल हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

हार्दिक पांड्याची तुलना अनेकदा कपिल देवशी केली जाते. ती करणाऱ्या अनेक मंडळींचा त्याला खिचवण्याचा हेतू अधिक असतो. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवनं त्याच्या ऑल राऊंड कामगिरीनं सर्व टीमला एकत्र करत कुणालाही कल्पना नसताना वर्ल्ड कप जिंकला होता. हार्दिकनं कपिलसारखीच कामगिरी (IPL 2022 GT Season Review) ऑल राऊंडर आणि कॅप्टन म्हणून या आयपीएलमध्ये केली आहे.

IPL 2022, Explained: सर्वांचा अंदाज चुकवत गुजरात टायटन्सनं यश कसं मिळवलं?

मिलरचा किलर सिझन

दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (David Miller) गेल्या दोन सिझनमध्ये मिळून तो फक्त 10 मॅच खेळला होता. यंदाच्या मेगा ऑक्शनच्या (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी त्याला कुणी खरेदीही केले नाही. त्याला त्यांनी दुसऱ्या दिवशी खरेदी केले. आशिष नेहरानं त्याच्या ‘गुजरात मॉडेल’मध्ये मिलरचा सर्वोत्तम वापर केला. त्याला स्थैर्य, स्वातंत्र्य आणि सन्मान दिला.

मिलरनं पहिल्यांदाच एका आयपीएल सिझनमध्ये 300 पेक्षा जास्त बॉल खेळले. 142.72 चा स्ट्राईक रेट आणि 68.71 च्या सरासरीनं 481 रन केले. गुजरातनं या सिझनमध्ये 9 पैकी 8 मॅच टार्गेटचा पाठलाग करताना जिंकल्या. मिलरनं टार्गेटचा पाठलाग करताना 301 रन केले. त्या मॅचमध्ये त्याची सरासरी होती 150.50!  गुजरातनं आयपीएल फायनल जिंकली त्यावेळी मिलर मैदानात नाबाद असणं ही त्याच्यासाठी, टीमसाठी आणि स्पर्धेसाठी सर्वोत्तम गोष्ट होती.  

स्टेट्सला नाही जबाबदारीला महत्त्व

गुजरात टायटन्सनं आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंचे नाव किंवा स्टेट्स पाहिलं नाही. त्यांनी त्यांची उपयुक्तता ओळखली. त्यानुसार त्यांनी त्यांना जबाबदारी दिली. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियाला फिनिशरचा रोल दिला. त्यांनी तो रोल पूर्ण केला. वृद्धीमान साहाला ओपनिंगला पाठवत आक्रमक बॅटींग करण्याची जबाबदारी दिली. त्यानं त्याचे उत्तम स्ट्राईक रेटनं रिटर्न्स दिले.

मोहम्मद शमीनं ‘पॉवर प्ले’ मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेत गुजरातला कायम पुढं राहिल याची खबरदारी घेतली. यश दयाल आणि साई किशोर या तरूण बॉलर्सनी त्यांच्याक़डून भविष्यात आणखी अपेक्षा बाळगता येतील (IPL 2022 GT Season Review) हे दाखवून दिलं आहे.

राशिद खाननं त्याचा बेस्ट खेळ या टीमकडूनही केला. त्यानं प्रत्येक टप्प्यात हुकमी बॉलिंग केली. समोरच्या टीमला जखडून ठेवलं. लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध कमी रनचं टार्गेट वाचवलं. त्याचबरोबर बॅटींगमध्येही त्यानं दोन विजयात निर्णायक भूमिका बजावलीय. राशिद संपूर्ण स्पर्धेत 44 बॉलच खेळला पण त्यामध्ये त्यानं 91 रन केले आहेत.

IPL 2022, MI Review: ऑक्शनमधील गोंधळाचा स्पर्धेत फटका, टॉपच्या टीमनं गाठला तळ

गुजरात टायटन्समध्ये जबाबदारीला सर्वाधिक न्याय हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) दिला. त्यानं कॅप्टनपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तो भविष्यात टीम इंडियाचा कॅप्टन होईल का? ही चर्चा घाईची आहे. पण, आयपीलमध्ये त्यानं कॅप्टन म्हणून स्वत:ची जागा निर्माण केली आहे.

हार्दिकची जबाबदार कॅप्टनसी, खेळाडूंमध्ये विजेतेपदामुळे आलेला विश्वास आणि त्याला मिळणारी नेहरा-कर्स्टन जोडीची ड्रेसिंग रूममधील शांत साथ यामुळे गुजरात टायटन्स पुढील वर्षा संपूर्ण नवी टीम (IPL 2022 GT Season Review) दिसणार आहे.

स्पर्धेतील क्रमांक 1
सर्वात आनंदी क्षणआयपीएल स्पर्धेचं विजेतेपद
सर्वात खराब क्षणमुंबई इंडियन्सकडून शेवटच्या ओव्हरमध्ये निसटता पराभव
सर्वात अपयशी खेळाडूमॅथ्यू वेड
सर्वात यशस्वी बॅटरहार्दिक पांड्या
सर्वात यशस्वी बॉलरमोहम्मद शमी
लक्षवेधी खेळाडूडेव्हिड मिलर
पुढच्या वर्षी कुणाला काढावं?मॅथ्यू वेड, विजय शंकर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: