फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022) होणार आहे. पुढील वर्षी लखनौ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच IPL मध्ये सहभागी होतील. त्यामुळे या स्पर्धेत खेळणाऱ्या एकूण टीमची संख्या 10 होणार आहे. या ऑक्शनपूर्वी जुन्या 8 टीमना कोणते खेळाडू ऑक्शपूर्वी राखायचे आहेत, याची यादी बीसीसीआयला देण्याची शेवटची तारीख मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 आहे. या 8 टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार (IPL 2022 Retention) आहेत ते पाहूया

मुंबई इंडियन्समध्ये चौथ्या नावासाठी तिघांमध्ये स्पर्धा

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तीन नाव निश्चित केले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ही तीन नावं मुंबई इंडियन्सनं निश्चित केली आहेत. हे तीन्ही खेळाडू T20 प्रकारातील मॅच विनर आहेत. तसेच मुंबई इंडियन्सच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मुंबई इंडियन्सनं रिटेन करणे स्वाभाविक आहे.

मुंबई इंडियन्समधील चौथ्या नावासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya), इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या तीन भारतीयांमध्ये स्पर्धा होती. मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2020 मधील विजेतेपदात या तिघांचाही मोठा वाटा होता. या तिन्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये ओळख मुंबई इंडियन्समधील कामगिरीमुळेच मिळाली आहे.

हार्दिक पांड्याचा फिटनेस ही मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यानं गेल्या वर्षभरात फार बॉलिंग केलेली नाही. हार्दिकच्या निवडीत हा मोठा अडथळा ठरला. इशान किशनला टीममध्ये घेतले तर विकेट किपर आणि ओपनिंग बॅटर या दोन्ही गोष्टी मुंबई इंडियन्सला मिळतील. त्यामुळे या तीन जणांमध्ये इशानचे नाव सर्वाधिक आघाडीवर (IPL 2022 Retention) होते. पण अखेर ऐनवेळी मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवला रिटेन केले आहे. सूर्यकुमारला रिटेन करत मुंबईच्या मॅनेजमेंटनं मिडल ऑर्डरमध्ये एक भरवशाचा प्लेयर ठेवला आहे.

रोहित शर्मानं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या यशाचे ‘गुपित’

CSK च्या यादीत रैना नाही

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) चिन्ना थाला सुरेश रैनाचा (Suresh Raina) रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश नाही. आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून रैना CSK च्या टीममध्ये आहे. चेन्नईनं आजवर नेहमीच त्याला रिटेन केले आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती, देशांतर्गत क्रिकेटमधील अल्प सहभाग तसेच मागील आयपीएल स्पर्धेत हरपलेला फॉर्म यामुळे पहिल्यांदाच चेन्नईच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत रैना नसेल.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणखी एक आयपीएल सिझन खेळणार हे जवळपास नक्की झालंय. त्यामुळे चेन्नईच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव पहिलं असेल. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली ही नावं चेन्नईनं निश्चित (IPL 2022 Retention) केली आहेत.

सोप्या मंत्राचा मोठा विजय, धोनीच्या टीमनं घडवला इतिहास

RCB मध्ये विराट सोबत आणखी कोण?

विराट कोहली (Virat Kohli) आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा कॅप्टन नाही. असं असलं तरी तो RCB चा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. त्यामुळे आरसीबीच्या यादीत पहिलं नाव त्याचचं आहे. विराटसोबतच ग्लेन मॅक्सवेलचं (Glenn Maxwell) नाव देखील आरसीबीनं नक्की केलं आहे. मॅक्सवेलनं IPL 2021 मध्ये दमदार खेळ केला होता. आता डिव्हिलियर्स रिटायर झाल्यानं मॅक्सवेल हा आरसीबीचा सर्वात मोठा विदेशी खेळाडू (IPL 2022 Retention) बनला आहे.

आरसीबीच्या यादीतील तिसरं नाव हे फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) आहे. सिराजचा या वर्षभरात बॉलर म्हणून झपाट्यानं विकास झाला आहे. त्याचा फायदा उठवण्याचा आरसीबीचा प्रयत्न आहे. आरसीबी मॅनेजमेंट आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यात आर्थिक कारणांवर एकमत झालं नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे चहलचं नाव मागे पडलं. त्याचबरोबर तरुण खेळाडू देवदत्त पडिक्कललाही आरसीबीनं रिटेन केलेले नाही.

जुन्या सवयींचा ऐनवेळी फटका, चांगल्या कामगिरीनंतरही नेहमीचा शेवट!

KKR भावी कॅप्टनला सोडले

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) गेल्या काही सिझनमध्ये बॅटींगमध्ये अनेक बदल केले. या सर्व बदलामध्ये एकाची जागा कधीही बदलली नाही. तो खेळाडू म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतून आयपीएलमध्ये आलेल्या गिलकडे KKR टीमचा भविष्यातील चेहरा आणि भावी कॅप्टन म्हणून पाहिले जात होते. मात्र पुढील सिझनसाठी KKR नं शुभमन गिलला रिटेन केले नाही.

आंद्रे रसेल (Andre Russell) , सुनील नरीन (Sunil Narine),  वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ही चार नाव KKR नं निश्चित केले आहेत.

दिल्लीची यादी फायनल

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या गेल्या तीन वर्षातील सातत्यपूर्ण टीमनं त्यांच्या चार खेळाडूंची नावं फायनल केली आहेत. ऋषभ पंतला (Rishbah Pant) दिल्ली कॅप्टन म्हणून कायम ठेवणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स पंतसह पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि नॉर्खिया या खेळाडूंना रिटेन (IPL 2022 Retention) करणार आहे.

संकटात सावरणाऱ्या श्रेयस अय्यरनं सोडली दिल्ली, पंतसह 4 जण कायम

SRH केली घोडचूक

सनरायझर्स हैदराबाद (SRH) ही मागील आयपीएलमध्ये तळाला राहिलेली टीम यंदा घोडचूक करण्याच्या मार्गावर आहे. माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोबत SRH मॅनेजमेंटचे संबंध बिघडले आहेत. त्यामुळे वॉर्नर या टीमकडून पुढील सिझनमध्ये खेळणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर T20  क्रिकेटमधील सर्वात मोठा स्पिनर राशिद खानला (Rashid Khan) SRH करारमुक्त केले आहे.

सनरायझर्सनं आपल्याला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून रिटेन करावं अशी राशिदची मागणी होती. ती मागणी सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटला मान्य नाही. सनरायझर्स फक्त केन विल्यमसनला (Kane Williamson) रिटेन करणार नाही, अशी चर्चा होती. पण सनरायझर्सनं शेवटच्या क्षणी अब्दुल समद (Abdul Samad) आणि उमरारन मलिक (Umran Malik) या दोन तरूण खेळाडूंना रिटेन केले आहे.

राजस्थानची 3 नावं नक्की

संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सोडणार अशी चर्चा होती. पण, राजस्थानच्या मॅनेजमेंटला त्यांच्या कॅप्टनला थांबवण्य़ात यश आलं आहे. संजूसोबतच T20 क्रिकेटमधील मोठा खेळाडू जोस बटलरला (Jos Buttler) देखील राजस्थान रिटेन करणार आहे. त्याचबरोबर मुंबईचा तरुण खेळाडू यशस्वी जैस्वालचे नावही राजस्थानच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत आहे.

बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हे दोन मोठे खेळाडू राजस्थानच्या टीममध्ये आहेत. पण या दोघांनाही फिटनेसची समस्या आहे. तसंच आर्थिक कारणांमुळे देखील या खेळाडूंना रिटेन करण्यात राजस्थानला अडचण येत आहे. त्यामुळे त्यांची नावं रिटेन खेळाडूंच्या यादीमधून मागं पडली आहेत.   

इंग्लंड क्रिकेटला नव्या युगात नेणारा मिस्टर 360!

पंजाब कुणाला करणार रिटेन?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक काळ शेवटच्या चारमध्ये राहणारी पंजाब किंग्जची (Punjab Kings) टीम यंदा एकाही खेळाडूला रिटेन करणार नाही, अशी चर्चा होती. पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rhahul)  टीमसोबत राहणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. निकोलस पूरनसोबतची पंजाबची बोलणी आर्थिक कारणांमुळे यशस्वी होऊ शकली नाही.

पंजाब किंग्जच्या मॅनेजमेंटनं अखेर बऱ्याच चर्चेनंतर त्यांचा ओपनिंग बॅटर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि तरुण फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला रिटेन केले आहे.

टीमरिटेन करण्यात आलेले खेळाडू
मुंबई इंडियन्सरोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड
चेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, मोईन अली ऋतुराज गायकवाड,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज
कोलकाता नाईट रायडर्सआंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन,
दिल्ली कॅपिटल्सऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्खिया
सनरायझर्स हैदराबादकेन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक
राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
पंजाब किंग्जमयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: