फोटो – ट्विटर, मुंबई इंडियन्स

आयपीएल 2022 साठी मुंबई इंडियन्सनं 4 खेळाडूंना रिटेन (MI Retention List 2022) केले आहे. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 2 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. त्यामुळे त्यांच्या विजेतेपदाची संख्या ही आता 5 झाली असून मुंबईची आयपीएल टीम ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम बनली आहे. मुंबई इंडियन्सनं या सर्व प्रक्रीयेची तयारी खूप पूर्वीपासून सुरू केली होती, असं टीमचे सहमालक आकाश अंबानी यांनी सांगितलं. मुंबईची ही तयारी प्रत्यक्ष निर्णयामध्ये देखील दिसली आहे. त्यांचा एक निर्णय हा इतर टीमपेक्षा भारी ठरला असून त्यामध्ये मुंबई इंडियन्सचं वेगळेपण स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्ससमोर होतं आव्हान

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मधील 7 जण हे गेल्या वर्षभरात टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह हे ते 7 खेळाडू. या 7 जणांनी गेल्या चार वर्षात मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सातत्यानं एकत्र खेळ केला आहे. त्यांनी टीममधील त्यांची भूमिका अनेकदा चोख पाडली. टीमच्या विजयात हातभार लावला.

त्याचबरोबर क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट हे तीन उपयुक्त विदेशी खेळाडू देखील मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होते. त्यांनी देखील मुंबई इंडियन्सच्या आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय टीमच्या विजयात योगदान दिले आहे. त्यामुळे या 10 जणांमध्ये 4 खेळाडूंची निवड करणे हे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंट समोर अत्यंत आव्हानात्मक काम (MI Retention List 2022) होते.

IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’

चौथ्या जागेचा पेच

मुंबई इंडियन्सच्या ‘टॉप 10’ खेळाडूंमध्ये रोहित (Rohit Sharma) आणि बुमराहची (Bumrah) निवड होणार हे सूर्य रोज पूर्वेला उगवतो इतकं सत्य होतं. कायरन पोलार्डचं मुंबई इंडियन्सच्या टीममधील स्थान आणि T20 क्रिकेटमधील त्याची क्षमता आणि दरारा पाहता विदेशी खेळाडूंसाठी असलेली जागा त्याला मिळणे हे देखील स्वाभाविक होते.

मुंबई इंडियन्सन चौथ्या जागी कुणाला निवड करणार याची सर्वांना उत्सुकता होती. या जागेसाठी इशान किशन (Ishan Kishan), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात स्पर्धा होती. या तिघांमध्ये मुंबईनं सूर्यकुमारची निवड (MI Retention List 2022) केली.

मुंबईची निवड का भारी?

हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सच्या रचनेत विकसित झालेला पर्याय मुंबई इंडियन्स समोर होता. हार्दिकचा फिटनेस हा त्याला त्राल देणारा मुद्दा आहे. त्यामुळे तो सध्या ‘बॉलिंग न करणारा ऑल राऊंडर’ उरला आहे. टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिकला जुना इतिहास आणि इमोशन याच्या आधारावर खेळवण्यात आले.

मुंबई इंडियन्सनं तो विचार केला नाही. सर्वोत्तम 4 खेळाडूंची निवड करताना त्यांच्या कामगिरीतील सातत्य आणि त्यांची फिटनेस हे मुद्दे देखील महत्त्वाचे असतात हे मुंबई इंडियन्सनं हार्दिकला रिटेन न करत दाखवून दिलं आहे.

एक केस स्टडी पाहूया…

आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद 2 वेळा जिंकणाऱ्या आणि यावर्षीच्या सिझनमध्ये (IPL 2021) फायनलपर्यंत धडक मारलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचं (Kolkata Knight Riders) उदाहरण केस स्टडी म्हणून पाहिलं तर मुंबई इंडियन्सचा निर्णय भारी काय आहे हे समजेल.

कोलकाता नाईट रायडर्सनं कायम अनफिट असणाऱ्या आंद्रे रसेलला (Andre Russell) रिटेन केले आहे. रसेलचा फिटनेस हा गेल्या 2 वर्षांपासून हरवला आहे. त्याच्यावर केकेआरनं अमेरिकेत उपचार केल तरीही फरक पडलेला नाही. यावर्षीच्या आयपीएलचा सेकंड हाफ युएईमध्ये झाला. त्यामध्ये रसेल केकेआरच्या 10 फक्त 3 मॅच खेळला.

रसेलच्या फिटनेसचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर देखील झाला आहे. तो मागील सिझनमध्ये एकूण 10 मॅच खेळला. यामध्ये त्यानं फक्त 19 ओव्हर्स बॉलिंग केली आहे. केकेआरसाठी सिझनमधील सर्वात महत्त्वाची फायनल मॅच तो खराब फिटनेसमुळे खेळू शकला नाही. फायनलमध्ये बॅटींग आणि बॉलिंग या दोन्ही प्रकारत रसेलची अनुपस्थिती केकेआरला जाणवली. सीएसके विरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेला रसेल संपूर्ण फिट असता तर कदाचित फायनलचा निकाल वेगळाही लागू शकला असता.

केकेआरनं या अनुभवातून, या पराभवातून धडा घेतला नाही. त्यांनी इमोशनल होत रसेलला रिटेन केले आहे. मुंबई इंडियन्सनं यावर्षीच्या अपयशापासून धडा घेतला. त्यामुळे त्यांनी हार्दिक पांड्याची टॉप 4 प्लेयर्समध्ये निवड (MI Retention List 2022) केली नाही.

मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेले खेळाडू आणि रक्कम

रोहित शर्मा16 कोटी
जसप्रीत बुमराह12 कोटी
सूर्यकुमार यादव8 कोटी
कायरन पोलार्ड6 कोटी
शिल्लक रक्कम48 कोटी

  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.