फोटो – ट्विटर

जोश हेजलवुड (Josh Hazelwood) हे नावं सध्याची क्रिकेट पाहणारी भारताची पिढी सहजासहजी विसरणार नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये 2020 साली झालेल्या टेस्ट मॅचमध्ये हेजलवूडची दाहकता टीम इंडियानं (Team India) अनुभवली आहे. हेजलवुडनं अ‍ॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी एक खतरनाक स्पेल टाकला. त्यानं 5 ओव्हरमध्ये फक्त 8 रन्स देत टीम इंडियाची निम्मी टीम आऊट केली. भारताचा टेस्ट क्रिकेटमधील आजवरचा निचांकी 36 रन्सचा विक्रम नोंदवण्यात हेजलवूडची मोठी भूमिका होती.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )

300 लोकसंख्येचं गाव

हेजलवूडचा जन्म आजच्याच दिवशी (8 जानेवारी 1991) झाला. सिडनीच्या उत्तरेला अवघी 300 लोकसंख्या असलेलं बेंडमीर हे त्याचं जन्मगाव. गावातील मर्यादीत लोकसंख्येमुळे त्याच्या शाळेतही खूप कमी मुलं होती. त्यामुळे जोश आणि त्याचा मोठा भाऊ एरॉन यांना शाळेचं संपूर्ण मैदान क्रिकेट खेळण्यासाठी मिळत असे. शाळेच्या मैदानावरच जोशनं सुरुवातीला कित्येक दिवस क्रिकेटचा सराव केला.

जोशनं अगदी कमी वयात शालेय स्तरावरील क्रिकेटमध्ये छाप पाडली. भक्कम शरीरयष्टी आणि अचूक बॉलिंग असलेल्या जोशचा ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) हा आदर्श आहे. हेजलवुडनं अगदी लहानपणापासूनच त्याच्या पेक्षा मोठ्या मुलासोबत क्रिकेटचा सराव केला आहे. हा सराव त्याच्या फायद्याचा ठरला. त्यामुळे त्याला मोठ्या आव्हानांचा लहाणपणीच सामना करण्याची संधी मिळाली. हेजलवुडची ऑस्ट्रेलियातील सर्वात बलाढ्य अशा न्यू साऊथ वेल्सच्या (New South Wales) टीममध्ये वयाच्या सतराव्या वर्षीच निवड झाली. त्यापाठोपाठ  अंडर 19 (U19) गटातील राष्ट्रीय टीमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे झाले. ऑस्ट्रेलियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळणारा तो लहान वयाचा मुलगा होता.

( वाचा : नवदीप सैनी : दर मॅचसाठी 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील टीम इंडियाचा सदस्य! )

लहान वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण

हेजलवूडला 2010 साली वयाच्या 19 व्या वर्षी वन-डे टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. 19 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो तिसराच ऑस्ट्रेलियन आहे. त्याला त्याच वर्षी भारत दौऱ्यावर जाणाऱ्या टेस्ट टीममध्येही त्याची निवड झाली होती. मात्र त्या दौऱ्यातून त्यानं दुखापतीमुळं माघार घेतली. त्यानंतर त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी पाच वर्षांची वाट पाहावी लागली. 2014 साली भारताविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) त्यानं आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये 68 रन्स देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या.

टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन

हेजलवुडनं अगदी कमी कालावधीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये बस्तान बसवलं. भारताविरुद्धच्या ऐतिहासिक स्पेलसाठी तर तो नेहमी लक्षात राहील. त्याचबरोबर 2015 साली झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये त्यानं 16 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 2017-18 च्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये 21 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या 4-0 अशा विजयात मोलाची भूमिका बजावली.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : कपिल देव @ 175*; एका इनिंगनं बदलला संपूर्ण देश! )

ऑस्ट्रेलियाच्या 2015 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचाही तो सदस्य आहे. त्यानं त्या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध 2017 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये त्यानं मार्कस स्टॉईनिससोबत शेवटच्या विकेटसाठी 50 पेक्षा जास्त रन्सची पार्टरनरशिप केली. या पार्टरनरशिपमध्ये त्याचं योगदान शून्य रन्सचं होतं. त्यामुळे बॅटिंगमधील एक अनोखा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे.

2018 साली केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्टनंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी लादण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन टीममध्ये अचानक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यावर्षी युएईमध्ये झालेल्या दौऱ्यात हेजलवूडची टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याच वर्षी झालेल्या भारत दौऱ्यातून त्यानं दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्यानं व्हाईस कॅप्टनशिप गमावली. त्यानंतर 2019 चा वर्ल्ड कपही त्याला दुखापतीमुळं खेळता आला नव्हता.

ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं असतं!

हेजलवूड शालेय स्तरावर भालाफेक या खेळात पारंगत होता. त्यानं या 12 व्या वर्षीच राज्य स्तरीय रेकॉर्ड केला होता. त्यानं भालाफेकीत करियर केलं असतं तर ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं असतं असं त्याचे तेंव्हाचे कोच सांगतात.

( वाचा : यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना! )

क्रिकेटमध्ये फास्ट बॉलिंग करताना हेजलवूडचे पडणारे यॉर्कर्स हे भालाफेकीपेक्षा कमी नाहीत हेच त्याचा सामना करणाऱ्या बॅट्समनचं मत असेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: