फोटो – ट्विटर/ICC

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलची (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. टेस्ट क्रिकेटला लोकप्रियता मिळावी म्हणून ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या ऐतिहासिक फायनलसाठी मोठी वातावरण निर्मिती करण्यात आली. प्रत्यक्षात फायनल मॅच ही लोकप्रियता वाढवणारी तर क्रिकेट फॅन्सना रोज जास्तीत जास्त निराश करणारी ठरली आहे. याला कारण फायनलमध्ये गेलेल्या भारत किंवा न्यूझीलंडच्या टीम नाहीत तर इंग्लंडमधील हवामान आहे. फायनल मॅचच्या झालेल्या पचक्यामुळे इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन चांगलाच वैतगला (Kevin Pietersen On WTC) आहे. त्याने या प्रकारची फायनल इंग्लंडमध्ये ठेवूच नका अशी मागणी केली आहे.

दोन दिवस पाण्यात

18 जून रोजी सुरु झालेल्या या फायनल मॅचमधील पहिला आणि चौथा दिवस संपूर्ण पाण्यात गेला. पहिल्या दिवशी पावसामुळे टॉस देखील होऊ शकला नाही. तर दुसरा आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ देखील खराब प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला. जो खेळ झाला त्यामध्येही सतत पावसाचा आणि खराब प्रकाशाचा अडथळा येत होता. या वातावरणाचा त्रास खेळाडूंच्या एकग्रतेवरही झाला.

टेस्ट मॅचच्या एका दिवशी 90 ओव्हर्स या हिशेबाने आजवर चार दिवसांमध्ये 360 ओव्हर्सचा खेळ होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात निम्म्याहून कमी म्हणजे 142.1 ओव्हर्सचाच खेळ इंग्लंडमधील खराब हवामानामुळे झाला आहे. या टेस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ झाला. पण, यामध्ये देखील 38.5 ओव्हर्सचा खेळ वाया गेला. पहिला दिवस पाण्यात गेल्यानंतर रोज अर्धा तास खेळ लवकर सुरू करुन 98 ओव्हर्सचा खेळ करण्याची आयसीसीची योजना हे हवामान पाहता कविकल्पना ठरली आहे.

फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर, विजेता कोण? ICC चा नियम जाहीर

पीटरसनची ICC कडे मागणी

‘इंग्लंडमधील सर्व काही उदात्त, मंगल…’ ही आयसीसीची कल्पना असावी. त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यांनी इंग्लंडच्या पावसाळ्यात तिथं ही फायनल ठेवली. आयसीसीच्या या नियोजनावर भारत किंवा न्यूझीलंडच्या नाही तर इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसननं टीका केली आहे.

इंग्लंडच्या यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेल्या पीटरसननं या विषयावर एक ट्विट करत ही टीका केली आहे. “मला हे सांगायला खूप वेदना होते. पण या प्रकारची एकमेव आणि महत्त्वाची मॅच यूकेमध्ये घेऊ नये” असं ट्विट पीटरसननं (Kevin Pietersen On WTC)  केलं आहे.

पीटरसननं ही मॅच कुठे व्हावी याचा सल्ला देखील ICC ला दिला आहे. “मला ठरवण्याची संधी मिळाली असती तर मी WTC चा एकमेव सामना दुबईमध्ये घेतला असता. तटस्थ जागा. जोरदार स्टेडियम. खात्रीचे हवामान. उत्तम ट्रेनिंगची सुविधा आणि प्रवासाची साधनं. आणि हो, आयसीसीचे ऑफिस देखील स्टेडियमच्या बाजूलाच आहे.” असे मत पीटरसननं व्यक्त केले (Kevin Pietersen On WTC) आहे.

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपचाही (Cricket World Cup 2019) पावसामुळे वारंवार रसभंग झाला. त्या अनुभवातून कोणताही धडा आयसीसीने घेतला नाही, आणि पुन्हा एकदा या स्पर्धेची फायनल मॅच इंग्लंडमध्येच ठेवली होती. या अतिरेकी इंग्लंड प्रेमाचा क्रिकेटला आणखी किती फटका बसणार आहे, हे आयसीसीचे अधिकारीच सांगू शकतील.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: