
लेखक: निरंजन वेलणकर
आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये भारताकडून एक हजार रन पूर्ण केलेला सर्वांत वेगवान बॅटर कोण, असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपलं उत्तर काय असेल? विराट कोहली, एम एस धोनी, रोहित शर्मा, युवराज सिंह? नाही! ह्यापैकी कोणीही नाही! त्याचं उत्तर आहे मिताली राज! (Mithali Raj) आणि अगदी तिच्या नावाप्रमाणेच ती भारतीय महिला क्रिकेटवर राज्य करते आहे! नुकतीच ती महिलांच्या वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारी बॅटर बनली आहे! भारतीय महिला (Indian women cricket) खूप मोठ्या खंडानंतर क्रिकेट खेळत आहेत. आत्ताच्या इंग्लंड दौ-यावर तर त्यांनी सात वर्षांनंतर पहिली टेस्ट खेळली!
टीम इंडियाच्या पुरुषांची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी न्युझीलंडविरुद्ध खेळत होती, तेव्हा महिलांनी अतिशय थरारक झुंज देऊन ती टेस्ट ड्रॉ केली. शफाली वर्माच्या (Shafali Verma) दोन हाफ सेंच्युरी आणि स्नेह राणाची (Sneh Rana) नाबाद 80 रनची खेळी क्रिकेट फॅन्स दीर्घ काळ लक्षात ठेवतील.
वन-डे सीरिज भारताने गमावली तरीही अनेक खेळाडूंनी चांगला खेळ केला. मितालीनंतर भारतीय महिला क्रिकेटमध्ये असे अनेक युवा ‘राज’ येत आहेत. आणि आता नवीन जमान्यामधील मुलींच्या खेळींमुळे त्यांनाही प्रसिद्धी मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या T20 सीरिजमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), हरलीन देओलने (Harleen Deol) यांचे कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ह्या संदर्भात भारतीय महिला क्रिकेटची आपल्याला नव्याने ओळख करून घ्यायला हवी.
क्रिकेटच्या आधी अडथळ्यांची शर्यत!
आपण स्वत:ला कितीही प्रगत समाज समजत असलो तरी अनेक सामाजिक रोग आपल्याकडे अजूनही आहेत. स्त्रियांना आपल्या समाजात (आणि कित्येक स्त्रियांच्या नजरेतसुद्धा) बरोबरीचं स्थान दिलं जात नाही. मुली बाहुल्यांशी खेळणार आणि स्वयंपाकात मदत करणार तर दादा बाहेर दादागिरी करून येणार आणि सरळ जेवायला बसणार हेच चित्र आजही मोठ्या प्रमाणात आढळतं.
एक व्हिडिओ मध्यंतरी बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये एका मुलीला क्रिकेटर व्हायचं असतं. पण तिचे बाबा तयार नसतात. पण ती तिच्या इच्छेवर ठाम असते. त्यांच्या मदतीशिवाय ती खूप मेहनत करते, संघर्ष करते. पण ते तिच्याशी संबंध तोडतात. तिच्याशी बोलणं सोडून देतात. पुढे ती तिच्या हिमतीवर देशाच्या टीममध्ये जागा मिळवते आणि एका मॅचमध्ये देशाला जिंकूनही देते. तेव्हा कुठे तिच्या वडीलांना त्यांची चूक कळते आणि ते तिचं कौतुक करतात. आपल्याकडेही हेच चित्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुलींना त्यांच्या आवडीच्या खेळाच्या आधी हा अडथळ्यांच्या शर्यतीचा खेळ तर खेळावाच लागतो.
आता परिस्थिती बदलत आहे. यामधये दंगल, मेरी कोम, साँड की आँख, चक दे इ. चित्रपटांचा काही प्रमाणात वाटा आहे. अन्य खेळांमधील चँपियन महिला खेळाडूंबरोबरच परिस्थितीला बदलण्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटर्सचीही मोठी भूमिका आहे.
17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?
त्या डल क्रिकेट खेळत नाहीत
हे अडथळे हे केवळ घरच्यांनी सपोर्ट करण्यापुरते नसतात. अगदी स्त्री- पुरुष समानतेची चर्चा असलेल्या घरामध्येही मुलींना अगदी सहजपणे घरातच अडकवून ठेवलेलं असतं. लहानपणापासून त्यांना ‘परमिशन असलेले’ खेळ घरातले असतात. ठरलेल्या चाकोरीपेक्षा वेगळं काही केलं तर समाज त्यांना स्वीकारत नाही. पदोपदी अनेक प्रकारे त्यांची वाट अडवतो. अगदी भारतीय महिलांच्या क्रिकेटर्सनाही सोयी सुविधा, वेतन, समानता अशा आघाड्यांवर आजही झुंजावं लागतंच.
एखादी खेळाडू ह्या सगळ्या सिस्टीमशी झुंजत झुंजत अडथळ्यांवर मात करून ख-या मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडे खूप धमक आलेली असते. एक प्रकारचा मानसिक कणखरपणा आणि दडपण झुगारून देण्याची त्यांना सवयच झालेली असते. आजच्या जेमिमा रॉडरीज, हरमनप्रीत कौर अशा खेळाडूंमध्ये हा कणखरपणा स्पष्ट दिसतो. सर्व प्रतिकूलतांवर त्या मात करून खेळतात. आणि आज निश्चितपणे शफाली वर्मा, स्मृती मांधाना, जेमिमा, स्नेह राणा ह्या अशा खेळाडू आहेत ज्यांच्या मनगटामध्येही तितकाच जोर आहे. त्यामुळे मुली (Indian Women Cricket) खूप डल खेळतात, असं आता कोणी म्हणू शकत नाही!
गरज स्वीकार आणि सन्मानाची!
महिलांना समानतेची अजिबात गरज नाही. कारण समानता त्यांनी सिद्ध केली आहे. या नवोदित महिला खेळाडूंना गरज आहे आपल्या स्वीकाराची, सन्मानाची आणि कौतुकाची. असंख्य समस्यांशी आणि कौटुंबिक आघाड्यांवर झुंजत एखादी खेळाडू खेळायला लागते तेव्हा गरज असते. केवळ खेळ म्हणून नाही, तर जेव्हा एखादी मुलगी सर्व चाको-या ओलांडून एखादी नवीन गोष्ट करते, तेव्हा ती तिच्या कुटुंबात आणि तिच्या वर्तुळात एक क्रांतीच घडवत असते. त्यामुळेही अशा खेळाडूंचं खूप कौतुक करणं गरजेचं आहे. आपण महिला खेळाडूंना कौतुक दिलं, सन्मान दिला तर त्यातून अशा नवीन खेळाडूंचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि महिला खेळाडूंना विरोध करणारे पालक जागरूक होऊ शकतील.
7 वर्षांनंतर खेळणाऱ्या टीम इंडियाची अभिमानास्पद कामगिरी, ‘फॉलो ऑन’नंतरही वाचवली मॅच
भारतीय महिलांचा खेळ बघता बिकट परिस्थितीमध्येही त्या निश्चितपणे उत्तम कामगिरी करतील हा विश्वास वाटतो. आणि मैदानावरच्या खेळाबरोबर मैदानाच्या बाहेर असलेल्या ह्या अडथळ्यांच्या खेळामध्येही त्यांना जो त्रास सहन करावा लागला, तो पुढच्या पिढीतल्या मुलींना करावा लागणार नाही अशी जबरदस्त खेळी त्या निश्चित खेळतील. आणि मग तेव्हा महिला क्रिकेटर म्हंटलं की फक्त डायना एडलजी, मिताली राज किंवा झूलन गोस्वामी अशी मोजकी नावं आठवणार नाहीत.
(निरंजन वेलणकर, हे फिटनेसप्रेमी, सायकलिस्ट आणि क्रिकेट फॅन आहेत. तुम्ही त्यांना niranjanwelankar [at] gmail [dot] com या ईमेलवर संपर्क करु शकता. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.