
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॉलर अनिल कुंबळे (Anil Kumble) रिटायर होऊन आता एक दशक उलटले आहे. कुंबळेनं टेस्ट क्रिकेटमध्ये 619 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताचा सर्वात यशस्वी बॉलर असून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी स्पिनर आहे. कुंबळेनं त्याच्या कारकिर्दीमध्ये जगातील अनेक दिग्गज बॅट्समन्सना ‘सळो की पळो’ करुन सोडले होते. श्रीलंकेचा कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यापैकीच एक आहे. कुंबळेच्या बॉलिंगमुळे आपली झोप उडाली होती, अशी कबुली संगकारानं (Sangakkara on Kumble) दिली आहे.
कुठे दिली कबुली?
कुमार संगकारा हा श्रीलंकेचा एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बॅट्समन होता. क्रिकेटच्या सर्व प्रकारात आणि सर्व मैदानात त्याने चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेला भक्कम टीम बनवण्यात संगकाराचे योगदान होते. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच श्रीलंकेनं वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर 2014 साली भारताचा पराभव करुन T20 वर्ल्ड कप जिंकला.
संगकारा 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिटायर झाला. रिटायरमेंटनंतर 6 वर्षांनीही तो कुंबळेच्या बॉलिंगचा धसका विसरलेला नाही. ICC नं कुंबळेचा ‘नुकताच हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश केला आहे. या निमित्तानं ICC नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत स्टीफन फ्लेमिंग, संगकारा, जयवर्धने वासिम अक्रम या दिग्गजांनी कुंबळेच्या बॉलिंगची प्रशंसा केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मुजोरीमुळे कुंबळेच्या संतापाचा झाला होता कडेलोट!
काय म्हणाला संगकारा?
संगकारानं या व्हिडीओमध्ये कुंबळेचे (Sangakkara on Kumble) वर्णन चॅम्पियन असे केले आहे. “एक बॅट्समन म्हणून माझी अनेक रात्रीची झोप कुंबळेचा विचार करुन उडाली आहे. तो नेहमीच्या लेगस्पिनरपेक्षा वेगळा होता. उंचपुऱ्या कुंबळेच्या हाय आर्म अॅक्शन बॉलिंगला खेळणे सोपे काम नव्हते. त्याचा बॉल टप्पा पडल्यावर वेगानं येत असेत. बॉल एकदम सरळ आणि लाईनवर येई. या प्रकारच्या बॉलवर रन काढणे सोपे नव्हते.कुंबळे एक चांगला क्रिकेटपटू आणि चांगला माणूस देखील आहे. तो फक्त भारताचा नाही तर वर्ल्ड क्रिकेटमधील चॅम्पियन क्रिकेटपटूपैकी एक आहे.’’ या शब्दात संगकारने कुंबळेची प्रशंसा केली आहे.
जयवर्धने आणि अक्रमनेही दिली दाद
श्रीलंकेचा माजी कॅप्टन महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि पाकिस्तानचा माजी कॅप्टन वासिम अक्रम (Wasim Akram) यांनीही कुंबळेच्या कामगिरीला दाद दिली आहे. ‘कुंबळेचा सामना करण्यासाठी खास योजना तयार करावी लागत असे,’ असं जयवर्धनेनं सांगितलं. तर अक्रमनं, कुंबळेचं ‘एक अवघड आणि दुसऱ्या लेग स्पिनरपेक्षा वेगळा बॉलर’ असं वर्णन केलं आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.