
भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची (Tokyo Olympics 2020) सुरूवात जोरदार झाली आहे. मीराबाई चानू (Mirabai Chanu) या भारतीय वेटलिफ्टरनं महिलांच्या 49 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडर (Silver Medal) पटकावले. मीरानं वेटलिफ्टिंगमधील भारताची दोन दशकांची प्रतीक्षा संपवली. वयाच्या 12 व्या वर्षांपासून ज्या खेळामध्ये स्वत:ला झोकून दिलं, त्या खेळात मीराबाईनं ऑलिम्पिक मेडलची कमाई केली. 135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ऑलिम्पिक मेडल ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. ते मिळवण्यासाठी मीराबाईचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आहे.
अशी घडली मीराबाई
मीराबाई चानू मणिपूरची. भारताच्या इशान्य भारतामधील एक लहान राज्य. या राज्यात क्रीडा संस्कृती घट्ट रुजली आहे. 1990 च्या दशकात खेळामध्येही करियर करता येतं, याची जाणीव येथील तरुणांना झाली. त्यामधून स्पोर्ट्स क्लब सुरु झाले. मणिपूरच्या चार महिला वेटलिफ्टर गेल्या पाच ऑलिम्पिकमध्ये खेळल्या आहेत. चीन आणि दक्षिण कोरियाच्या वेटलिफ्टर्सना ऑलिम्पिकच नाही तर जगातील प्रत्येक स्पर्धेत भारतानं आव्हान दिलंय. यामध्ये मणिपूरमध्ये रुजलेल्या क्रीडा संस्कृतीचा वाटा आहे.
मीराबाई चानूचं गाव इंफाळपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मीराबाईचे वडील सरकारी खात्यातमध्ये कनिष्ठ पदावर नोकरीला होते. ती सहा भावंडामधील सर्वात लहान. वडिलांची नोकरी घराचा खर्च भागवण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे तिच्या आईने छोटे चहाचे दुकान देखील चालवले आहे.
मीरा (Mirabai Chanu) लहानपणी जंगलातील लाकडाची मोळी घेऊन घरी येत असे. असे. त्याचबरोबर पाण्यासाठी देखील तिनेअनेक किलोमीटर भटकंती केली आहे. या सर्व कष्टामधून तिने वेटलिफ्टिंगचा पहिला धडा घेतला. कूंजरानी देवी (Kunjarani Devi) ही मीराची आयडॉल. भारताची दिग्गज वेटलिफ्टर असलेल्या कुंजूरानीनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. तिच्या या कामगिरीनं मीराचं आयुष्य बदललं. तिने इंफाळमधील अनिता चानू यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला.
मीराचे घर ते इंफाळमधील अकादमी यांच्यात 20 किलोमीटर अंतर होते. रोज सकाळी ती ट्रकमधून लिफ्ट घेऊन किंवा सायकलवरुन अकादामीमध्ये जात असे. काही वेळा तिला ट्रकमधून अर्ध्या अंतरापर्यंतच लिफ्ट मिळे. त्यानंतर मीरानं उरलेलं अंतर पायी चालत पूर्ण केलं आहे. अनेकदा तिच्या बहिणींनी पैसे वाचवून ते मीराला प्रवास खर्चासाठी दिले आहेत. या सर्व अडचणीनंतरही तिची इच्छाशक्ती कमी झाली नाही. मीराकडं (Mirabai Chanu) सांगण्यासाठी शेकडो कारणं होती, तिने यापैकी कोणतंही कारण न देता अकादमीमधील ट्रेनिंग मन लावून केलं. दुपारच्या ब्रेकमध्ये घरी जाणे तिला शक्य नव्हते. तर त्यावेळी अकदामीमध्येच थांबून संध्याकाळचे ट्रेनिंग करत मीरा परतत असे.
होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!
मीराबाईचा प्रवास
मीरानं 2011 साली राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत पहिले मेडल जिंकले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. वयाच्या 19 व्या वर्षी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीरानं सिल्व्हर मेडलची कमाई केली. त्यानंतर पुढील काही स्पर्धांमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी करत मीरानं रिओ ऑलिम्पिमध्ये (Rio Olympics 2016) धडक मारली. रिओमध्ये तिच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा होती.
रिओमध्ये निराशा
क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेत म्हणजेच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मीराचा पहिला अनुभव निराशाजनक ठरला. तिला सहापैकी फक्त एका प्रयत्नामध्ये यश मिळाले. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. या सेटबॅकनंतर तिचं आयुष्य बदललं. मीरा यामुळे खचली नाही. तर ती पुन्हा जोमानं उभी राहिली.
रिओ ऑलिम्पिकनंतर झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने गोल्ड मेडल जिंकले. या स्पर्धेत गोल्ड जिंकणारी ती करनाम मल्लेश्वरी (Karnam Malleshwari) नंतरची दुसरी भारतीय. होती. त्यानंतर 2018 साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही मीरानं मेडल पटकावले.
आईनं मणिपूरच्या बाहेर पहिल्यांदा पाऊल टाकले
मीरानं ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर या प्रवासात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. मेडल जिंकल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत तिने तिच्या आईचा तोम्बी चानू (Tombi Chanu) यांचा उल्लेख केला आहे. मीराला घडवण्यात त्यांनी घेतलेल्या कष्टाचा मोठा वाटा आहे.
महिना 2 ते 3 हजार रुपये कमावणाऱ्या नवऱ्याला मदत करण्यासाठी चहाची टपरी चालवण्यापासून ते मीराचं डाएट सांभाळणे, तिला धीर देणे, तिच्यावर विश्वास दाखवणे आणि तिची स्वप्न कधीही हरवणार नाहीत याची काळजी घेणे या सर्व कसरती त्यांनी सांभाळल्या. 2018 साली टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सोबत मीराबाई चानूला (Mirabai Chanu) खेलरत्न (Khel Ratna) पुरस्कारानं गौरवण्यात आले. त्यावेळी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी मणिपूरच्या बाहेर पहिल्यांदा पाऊल ठेवले. ‘आज गावातील सर्व मला मीराची आई म्हणून ओळखतात’ अशी भावना त्यावेळी त्यांनी व्यक्त केली होती. रिओमध्ये मेडल जिंकल्यानंतर आज सर्व जग त्यांना मीराची आई म्हणून ओळखत आहे. ‘मेरी बेटी मेरा अभिमान’ या घोषवाक्याचा अर्थ हा मीराच्या पालकांना पाहून कळतो.
ऑलिम्पिक मेडल
मीराला 2018 साली मोठी दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला वजन उचलण्यास त्रास होत असे. मीरासाठी वजन न उचलणे म्हणजे श्वास न घेण्यासारखं होतं. या दुखापतीवरही तिने मात केली. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, ऑलिम्पिक असोसिएशन, वेटलिफ्टिंग फेडरेशन, ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची पात्रता असलेल्या खेळाडूंना मदत करणारी गोल्ड क्वेस्ट ही संस्था या सर्वांचे तिला पाठबळ होते.
कोरनामुळे ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेलं. मीराला या काळात प्रगत सरावासाठी अमेरिकेत पाठवण्यात आले. या वाटचालीत मीराला मदत करणाऱ्या अनेक दृश्य -अदृश्य प्रत्येक हातांचा तिच्या क्षमतेवर विश्वास होता. मीराच्या खेळातून, तिच्या हार न स्वीकारण्याच्या वृत्तीमधून त्यांना ती यंदा ऑलिम्पिक मेडल नक्की जिंकेल याचा विश्वास वाटत होता.
भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई वजन उचलण्यासाठी आली त्यावेळी तिने तिच्याकडून संपूर्ण देशाच्या असलेल्या अपेक्षांचं ओझं पेललं होतं. या ओझ्यानं तिचे खांदे दबले नाहीत. ती कसोटीच्या क्षणी गोंधळली नाही. पाच वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं अपयश तिने यंदा पुसून टाकलं. भारताला टोकियोमध्ये पहिलं मेडल जिंकून दिलं. तिचं हे मेडल पंतप्रधानांपासून सर्वसामान्यापर्यंत प्रत्येकाला आनंद देऊन गेलं. आपल्या घरातील व्यक्तीनं ही कामगिरी केल्याची सर्वांची भावना होती. मीराबाईनं (Mirabai Chanu) देखील हे मेडल संपूर्ण देशाला अर्पित केले आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.