
क्रिकेटमध्ये लवकर प्रवेश, झटपट यश, थेट जुन्या ग्रेट खेळाडूशी तुलना, जगातील नंबर वन बॉलर म्हणून देशात हवा आणि मग गाडी घसरते ती इतकी घसरते की थेट पाच वर्षांची सक्तीनं बंद होते. पाच वर्षांनी पुन्हा सुरु होते. एक जबरदस्त परफॉर्मन्स, पुन्हा मग सॉलिड हवा, त्यानंतर लगेच गाडीचं घसरणं, एकमेकांशी वाद, टीका आणि त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा. पाकिस्तानचा (Pakistan) फास्ट बॉलर मोहम्मद आमिरची (Mohammad Amir) ही सर्व गोष्ट आहे. आमिरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. अर्थात पाकिस्तानी क्रिकेटमधील सर्व परंपरा आजवर पाळलेला आमिर रिटायमेंट मागे घेण्याची पाकिस्तानी परंपराही पाळेल, असा अंदाज लगेच सुरु झाला आहे.
काय म्हणाला आमिर?
मोहम्मद आमिरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. “मी या क्षणाला क्रिकेट सोडत आहे. मी इतका छळ सहन करु शकत नाही. जी गोष्ट घडली त्याची शिक्षा मी भोगली. पीसीबीनं माझ्यावर खूप गुंतवणूक केली असं सांगत लोकांनी माझा छळ केला आहे. मी माझ्यावरची बंदी पूर्ण करुन परतलोय. मी पाच वर्षांची बंदी पूर्ण केली आहे. एका वर्षात परत आलेलो नाही. शाहिद आफ्रीदीनं (Shahid Afridi) माझी मोठी मदत केली आहे. ज्या काळात माझ्याबरोबर क्रिकेट खेळायला कुणी तयार नव्हतं त्या काळात मला आफ्रिदीनं मोठी मदत केली आहे.’’
( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : एक कॅच सोडला आणि गिलख्रिस्ट लगेच निवृत्त झाला! )
आमिरला का झाली होती शिक्षा?
मोहम्मद आमिरनं वयाच्या सतराव्या वर्षी 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आमिरचं पदार्पण मोठ्या झोकात झालं. त्यानं 2009 T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये तिलकरत्ने दिलशानची महत्वपूर्ण विकेट घेतली. वयाच्या 18 व्या वर्षी टेस्टमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम त्यानं केला. त्यामुळे त्याची तुलना थेट पाकिस्तानचा फास्ट बॉलर वासिम अक्रमशी (Wasim Akram) होऊ लागली.
आमिरची टेस्ट काराकीर्द
टेस्ट | 36 |
विकेट्स | 119 |
सरासरी | 30.47 |
एका इनिंगमध्ये पाच विकेट्स | 4 |
पाकिस्तान टीमनं 2010 मध्ये केलेल्या इंग्लंड दौऱ्यात आमिरच्या चेहऱ्याची काळी बाजू जगाला दिसली. तो त्याचा सहकारी बॉलर मोहम्मद आसिफ आणि तेंव्हाचा कॅप्टन सलमान बट यांच्यासह स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. आसिफला सात तर बटला 10 वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. आमिर दोषींमध्ये सर्वात लहान असल्यानं त्याच्यावर सर्वात कमी म्हणजे पाच वर्षे क्रिकेटमध्ये बंदीची शिक्षा सुनावण्यात आली.
बंदीनंतर पुनरागमन
मोहम्मद आमिरनं बंदीनंतर पुनरागमनही झोकात केले. भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याने करियरमधला बेस्ट स्पेल टाकला. त्यानं पहिल्या सहा ओव्हरमध्ये फक्त 16 रन्स देत रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन या टॉप ऑर्डरच्या प्रमुख बॅट्समन्सना आऊट केले. त्याच्या त्या खतरनाक स्पेलमुळे पाकिस्ताननं भारताचा 180 रन्सनं मोठा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
आमिरची वन-डे काराकीर्द
वन-डे | 61 |
विकेट्स | 81 |
सरासरी | 29.62 |
एका इनिंगमध्ये पाच विकेट्स | 1 |
चॅम्पिन्स ट्रॉफीनंतर आमिरचा खेळ घसरला. त्यातच त्याने मागच्या वर्षी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. पाकिस्तान क्रिकेटला सर्वात जास्त गरज असताना आमिरनं टेस्ट क्रिकेट सोडणे अनेकांना पटलं नाही. त्यांनी आमिरवर जोरदार टीका केली. आमिर स्वार्थी असल्याचे आरोप झाले. यामधून आमिर आणि पीसीबीमधलं अंतर वाढलं.
शेवटची ठिणगी
आमिर -पीसीबी वादाची शेवटची ठिणगी यावर्षी पडली. न्यूझीलंड दौऱ्यासाठी 35 जणांची संभाव्य टीममध्ये आमिरचे नाव नव्हते. हा पीसीबीनं आपल्याला दिलेला ‘वेक अप’ कॉल होता असं आमिर सांगतो. तो लंकन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. देशापेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला महत्व दिल्याचे त्याच्यावर आरोप झाले. दोन्ही बाजूचा संघर्ष टोकाला गेल्यानंच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली.
( वाचा : भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ )
आमिर आयपीएल खेळणार?
मोहम्मद आमिर 28 वर्षांचा आहे. आता पाकिस्तानच्या जबाबदारीतून मोकळा झालाय. त्याच्यकडे अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे तो भविष्यकाळात इंग्लंडमध्ये स्थायिक होईल आणि त्याचा वरिष्ठ सहकारी अझर महमूदच्या मार्गानं इंग्लिश नागरिक म्हणून आयपीएलमध्ये येण्याची शक्यता देखील आहे. आमिरनं आयपीएलचा मोह सोडला तर तो पुन्हा पाकिस्तान क्रिकेटमध्येही परतू शकतो. अर्थात पाकिस्तान क्रिकेटच्या सर्व परंपरेचं पालन करत त्यानं रिटायरमेंट घेतली आहे. त्यामुळे रिटायरमेंट मागे घेऊन पुन्हा टीममध्ये परतणे ही पाकिस्तानी परंपरेची पुढची पायरी आहे. आमिरनं रिटायरमेंट घेतना ज्याचा उल्लेख केलाय तो शाहिद आफिदी या विषयावर त्याला बरंच मार्गदर्शन करु शकेल.
( वाचा : आफ्रिदी क्वारंटाईन न होताच श्रीलंकेत मॅच खेळला कारण… )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.