फोटो – ट्विटर/Ahwin_tweetz

भारतीय क्रिकेटच्या मुख्य नकाशापासून दूर रांचीमध्ये वाढलेला, तिथं स्वत:चं क्रिकेटचं तंत्र विकसित केलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) जागतिक क्रिकेटमधील मोठा ब्रँड कसा बनला याची गोष्ट मोठी विलक्षण आहे. 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात भारतीय क्रिकेटवरची मोठ्या शहरांची मक्तेदारी संपली, ती संपवणाऱ्या पिढीतला महेंद्रसिंह धोनी हा मोठा चेहरा होता. एक बॅट्समन, विकेटकिपर आणि कॅप्टन अशा तीन्ही जबाबदाऱ्या त्याच्या इतक्या दीर्घकाळ कोणत्याही कॅप्टननं क्रिकेट विश्वात सांभाळल्या नाहीत.

धोनीकडे बॅटींग, विकेट किपिंग आणि कॅप्टनसी प्रत्येक क्षेत्रात धोनीचं स्वत:चं तंत्र होतं, ते तंत्र त्याने कधी लपवलं नाही. त्याचबरोबर नवं तंत्र आत्मसात करण्याचा लवचिकपणा देखील त्याने दाखवला. T20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या ICC च्या तीन्ही स्पर्धा जिंकणारा तो क्रिकेट विश्वातील एकमेव कॅप्टन आहे. या तीन्ही स्पर्धा त्यानं कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात जिंकल्या आहेत, हे आणखी विशेष. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं परदेशात सातत्यानं टेस्ट हरल्या, पण त्याचबरोबर टीम सलग 18 महिने टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 होती. सौरव गांगुलीनंतर भारतीय क्रिकेटपटूंची एक पिढी घडवण्याचं काम धोनीनं केलं.

धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होऊन महिनाभराने एक वर्ष पूर्ण होईल. त्याआधी एक वर्ष त्याचा क्रिकेटमधला वावर थांबला होता. क्रिकेटचं मैदान सोडून सोशल मीडिया, मुलाखती, पार्टी असे अनेक पर्याय चर्चेत राहण्यासाठी उपलब्ध असताना धोनी त्यात पूर्वी कधीही रमला नाही. आजही त्यात तो नसतो. त्यानंतरही धोनीचं वलय आजही टिकून आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला सातत्याने येत असलेल्या अपयशानंतर धोनीच्या कॅप्टनसीची चर्चा आणखी सुरु झाली आहे. धोनीच्या टेम्परामेंटचा ICC स्पर्धांमध्ये टीमला मोठा फायदा झाला असं मत महेंद्रसिंह धोनीचे फॅन असलेल्या वैभव धर्माधिकारी (Vaibhav Dharmadhikari) यांनी व्यक्त केली आहे. धोनीच्या आजवरच्या क्रिकेट प्रवासावर त्यांनी त्यांची नेमकी मतं मांडली आहेत.

महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’नं साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ला मुलाखत देण्यासाठी तयार झाल्याबद्दल धन्यवाद. महेंद्रसिंह धोनीचा रांची ते टीम इंडिया हा प्रवास सर्व अर्थानं वेगळा आहे. संघर्षाचा आहे. या प्रवासाबद्दल काय सांगाल?

वैभव : नमस्कार, मला दिलेल्या ह्या संधी बद्दल cricket मराठी टीम चे खूप आभार. मी  ‘cricket मराठी चा नियमित वाचक आहे. मला या साईटवरील लेख खूप आवडतात. महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर “तो आला त्याने पाहिलं आणि जिंकून घेतल सारं ” अशीच सर्व क्रिकेट फॅन्सची भावना होता. धोनी भारतीय क्रिकेटमध्ये स्थिर झाल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्याची ‘Untold Story’ देखील उलगडली. रांचीपासून सुरु झालेला त्याचा प्रवास भारतीय तरुणांना प्रेरणादायी ठरला आहे.

प्रश्न : धोनीच्या सुरुवातीच्या काळातील कोणती इनिंग पाहिल्यावर तुम्हाला तो भविष्यात मोठा खेळाडू बनेल असं वाटलं?

वैभव : खरं सांगायचं झालं तर, एकच अशी इनिंग किंवा  मोमेंट सांगता येणार नाही कारण, माझ्यासाठी धोनीची एन्ट्री तशी हळुवारच होती. धोनीची पाकिस्तान विरुध्द पहिली सेंच्युरी नक्कीच लक्षात राहणारी आहे. पण, त्याने पुढील काळात टीम इंडियाच्या लोअर ऑर्डरमधील पोकळी भरली. त्यामुळे माझा धोनीवरचा विश्वास दृढ झाला. त्यानंतर पुढील काही वर्षांमध्ये तो क्रिकेट आयकॉन बनला. सचिनच्या युगात असे बरेच क्षण होते जिथं टीम इंडिया close matches pressure situation मध्ये  विजयश्री खेचून आणू शकली नाही,  तोच आनंद धोनीच्या कालखंडात वारंवार  मिळाला.

प्रश्न : धोनी 2007 च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन झाला. तो भारतीय क्रिकेटसाठी खूप कसोटीचा कालखंड होता. धोनीच्या त्या वर्ल्ड कपमधील कॅप्टनसीबद्दल काय सांगाल?

वैभव : क्रिकेट वर्ल्ड कप 2007 मधील धक्कादायक पराभवानंतर तो कसोटीचा कालखंड होती. त्या काळात धोनीला एक संधी मिळाली. त्याच्याकडून कुणाच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. त्याला नवीन खेळाडूंबरोबर नवीन फॉरमॅटमध्ये (T20) नव्याने सुरवात करायला मिळाली. त्या  संधीचा योग्य फायदा घेत टीम इंडियाने  स्पर्धा जिकंली. दिग्गजांनी T20 क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यानं धोनीला तरुण खेळाडूंची टीम तयार करता आली.  हे सगळे खरे असले तरी धोनीने ती स्पर्धा जिंकून आपले कर्णधारपदाचे कौशल्य सिद्ध केले, हे विसरता येणार नाही.

प्रश्न : टीम इंडियाच्या सीनियर प्लेयर्सना धोनीनं नीट वागणूक दिली नाही. त्यांना धोनीमुळे सन्मानानं निवृत्त होता आलं नाही, असा आरोप केला जातो. या आरोपावर तुमचे मत काय?

वैभव : निवड समितीने त्या काळामध्ये काही कठोर निर्णय घेतले यामध्ये दुमत नाही. हे निर्णय धोनीच्या प्रभावाखाली घेतले असं मानलं तरी त्या काळात मिळालेलं यश पाहता धोनीला दिलेलं स्वातंत्र्य योग्यच होते, असं मी म्हणेल. त्याचबरोबर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंनीही त्यांच्या रिटायरमेंटनंतर धोनीविरुद्ध वक्तव्य केलं नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

प्रश्न : याच प्रश्नाला जोडून पुढचा प्रश्न आहे की धोनीनं त्याच्या कॅप्टनसीमध्ये काही खेळाडूंना झुकतं माप दिलं असा दावा केला जातो. तो तुम्हाला पटतो का?

वैभव : आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, धोनीने ज्या खेळाडूंची पाठराखण केली त्या खेळाडूंना जास्त काळ संधी दिली त्यामुळे त्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी त्यांची कारकिर्द गाजवली. याचच अर्थ हा निर्णय टीमसाठी फायदेशीर ठरला. खेळाडूंना टीममधील जागेची शाश्वती, कॅप्टनचा पाठींबा ह्या गोष्टी मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये फार महत्वाच्या असतात असे मला वाटते. त्याचा त्यांच्या एकूण खेळावर परिणाम होतो.

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा (ICC Tournaments) खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्या स्पर्धेसाठी, स्पर्धेतील मोठ्या मॅचसाठी, मॅचमधील निर्णायक क्षणी त्याचे खेळावरील, एकाग्रतेमधील संतुलन ढासाळू नये यामध्ये कॅप्टनचे योगदान सर्वात मोठे असते.

प्रश्न : आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाची कॅप्टनसी करणे हा एक वेगळा दबाव आहे. धोनी हा तीन वेगळ्या आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा क्रिकेट विश्वातील एकमेव कॅप्टन आहे. धोनीनं या स्पर्धेत कॅप्टनसीचा दबाव कसा पेलला?  एक क्रिकेटपटू किंवा एक व्यक्ती म्हणून त्याच्यात काय वेगळेपण होतं?

वैभव : त्याचा स्वभाव, कामातील व्यावसायिकता आणि प्रोसेस (Process) या गोष्टी यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. धोनी प्रोसेसचा फार मोठा पुरस्कर्ता आहे. एखादी प्रोसेस ठराविक काळ नियमितपणे आचरणात आणल्यास त्याचे फळ मिळते, हे तो वारंवार मुलाखतीमध्ये सांगतो. धोनीवर दबाव निश्चितच होता परंतु त्याच्या स्वभावामुळे त्याच्या खेळावर किंवा टीमवर त्याचा प्रभाव पडला नाही.

कुठल्याही  टीमला आणि कॅप्टनला यशस्वी होण्यासाठी कॅप्टनचा टीमवर आणि टीमचा कॅप्टनवर असणारा विश्वास हे दोन महत्त्वाचे घटक आहेत वेळोवेळी टीम सकंटात असताना धोनीनं बॅट्समन म्हणून ते सिद्ध केले. त्याचबरोबर कॅप्टन म्हणूनही योग्य रणनीती  आखून टीमला विजयश्री खेचून आणली. मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टीम यशस्वी होण्यासाठी त्याला धोनीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची देखील जोड मिळाली.

धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया चॅम्पियन का बनली? माजी क्रिकेटपटूनं सांगितलं कारण

प्रश्न : 2011 वर्ल्ड कपची फायनल आणि त्यामधील धोनीची इनिंग याबद्दलच्या तुमच्या आठवणी काय आहेत?

वैभव : मॅच जिंकण्यासाठी धोनीने मारलेला सिक्स हा अविस्मरणीय क्षण आहे. त्याचबरोबर त्याने स्वत:ला बॅटींग ऑर्डरमध्ये प्रमोट  केले तो देखील एक महत्वाचा क्षण होता.  पहिल्या इनिंगनंतर श्रीलंका वरचढ वाटत  होती. गौतम गंभीर आणि धोनीची पार्टनरशिप (right & left hand  combination ) श्रीलंकेच्या बॉलिंग अटॅकसाठी डोकेदुखी ठरली. पुढे, धोनी आणि युवराजच्या पार्टनरशिपमध्ये देखील हेच सूत्र कायम राहिले 

प्रश्न : धोनीच्या टेस्ट मॅचमधील कॅप्टनसीवर अनेकांनी टीका केली. विशेषत: विदेशातील सलग पराभव. त्यामधील त्याची बचावत्मक कॅप्टनसी यामुळे त्याचे फॅन्स देखील धोनीवर नाराज असतात तुम्ही याकडे कसा पाहता?

वैभव : ही टीका बऱ्याच प्रमाणात योग्य आहे. माझ्या मते, धोनीकडे टेस्ट मॅचमध्ये आत्मविश्वास कमी होता. विशेषत: विदेशी खेळपट्टीवर हे प्रकर्षाणे जाणवले. धोनीची कॅप्टनसी ही स्पिनर्ससोबत नेहमी प्रभावी ठरली. विदेशी खेळपट्टीवर स्पिनर्स  बचावात्मक काम करु शकतात पण 20 विकेट्स घेऊ शकत नाहीत. आज विराट-शास्त्री च्या कालखंडात  हे चित्र पालटलेले आहे. धोनीनं योग्य वेळीच डिसेंबर 2014 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली, हे सर्वांसाठीच अनपेक्षित होती. पण, हा निर्णय घेतल्याबद्दल मला त्याचे कौतुक वाटते.   

महेंद्रसिंह धोनीनं दिला होता क्रिकेट विश्वाला धक्का

प्रश्न : धोनीच्या कॅप्टनसीमुळे त्याच्यातील बॅट्समनवर अन्याय झाला. त्याने विशेषत:  लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये वरच्चा क्रमांकावर बॅटींग करायला हवी होती असं वाटतं का?

वैभव : हो. एक प्रेक्षक म्हणून  हे सातत्याने जाणवले. वरच्या क्रमांकावर धोनी अजून जास्त प्रभावशाली ठरला असता. त्याचबरोबर आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की धोनी टीममध्ये नवा होता त्यावेळी त्याच्यापेक्षा बॅटींगचे तंत्र सरस असलेले अनुभवी बॅट्समन टीममध्ये होते. तसेच नंतरच्या काळात धोनीच्या क्रमांकावर खेळायला योग्य उत्तराधिकारी टीम इंडियाला मिळाला नाही, त्यामुळे त्याने कधी स्वत:ला प्रमोट केले नाही.

प्रश्न : धोनी टीममध्ये आला तेव्हा त्याची विकेट किपिंग पाहून तो गोल किपर आहे अशी अनेकांनी टीका केली तिथून ते आज तो वयाच्या 40 व्या वर्षी देखील एक चपळ आणि बुद्धीमान विकेट किपर आहे त्याच्या या प्रवासाबद्दलचं तुमचं निरिक्षण काय आहे?

वैभव : गमतीचा भाग असा की, धोनीने शालेय जीवनात गोल किपर म्हणूनच सुरवात केली होती. धोनीची विकेट कीपिंग ही टेक्स्टबुकला साजेशी  नाही. त्याचे अनुकरण करणे हे अवघड आहे. हे खरं असलं तरी धोनीनं त्याच्या विकेट किपिंगमध्ये चुका केल्याचे फारसं आढळत नाही, या मुद्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधावे वाटते. धोनीच्या अनेक अविस्मरणीय विकेट कीपिंगच्या क्षणांपैकी सर्वाधिक लक्षात राहणारा  क्षण म्हणजे  बांगलादेश विरुद्ध धोनीने घडवून आणलेला रन आऊट जो आजही सर्वांच्या लक्षात आहे.

प्रश्न : धोनी विकेट किपिंग करताना, कॅप्टनसी करताना टीमच्या बॉलर्सना विशेषत:  स्पिन बॉलर्सना मदत करणारा एक मोठा सोर्स होता. टीम इंडियामध्ये हा सोर्स आजही आहे की हरवलाय?

वैभव : टीम इंडिया आज स्वत:च्या स्ट्रेंथवर भर देते. आपण प्रतिस्पर्धी टीमच्या विकनेसचा फायदा घेण्यात तसेच प्रसंगावधान बाळगून योग रणनीती आखण्यात कमी पडत आहोत.

प्रश्न : धोनीच्या आयपीएल कॅप्टनसीबद्दल काय सांगाल?

वैभव : आयपीएल मध्ये धोनीभोवती असणारे वलय हे त्याच्या कॅप्टनसीमध्ये देखील जाणवते. धोनी आयपीएल कॅप्टन म्हणून अधिक स्थिर वाटतो. चेन्नईच्या पीचवर होणाऱ्या सीएसकेच्या सामन्यांमध्ये स्पिनर्सकडून साथ मिळाल्यावर धोनीची कॅप्टनसी अधिक खुलते. अलिकडच्या काळात धोनीनं स्वत:वरची जबाबदारी कमी करु ब्राव्हो सारख्या अनुभवी खेळाडूवर जास्त जबाबदारी द्यायला हवी. तसंच तरुण खेळाडूंना योग्यवेळी संधी द्यावी असे मला वाटते .

प्रश्न : 2019 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमधील धोनीच्या बॅटींगचं गणित बरोबर होतं की त्याचं गृहितक चुकलं होतं?

वैभव : एक चाहता म्हणून मी हे मान्य करणार नाही. पण, एकंदरीत वर्ल्डकप स्पर्धेत धोनीच्या बॅटींगमधील आक्रमकता कमी झाली आहे, हे निश्चित जाणवत होते.  

‘रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण जास्त मॅच जिंकू’

प्रश्न : धोनीनं भारतीय क्रिकेटला काय वारसा दिला आहे?

वैभव : तीन आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद ही बहुमूल्य ठेव आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये टीमनं वर्चस्व निर्माण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये आधीचा वारसा पुढे चालवला. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटची भविष्यात चर्चा होईल त्यावेळी टीम इंडिया आणि धोनी याचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चा कधीही पूर्ण होणार नाही.

प्रश्न : मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल

वैभव : Cricket मराठी हा फार स्तुत्य उपक्रम आहे. क्रिकेट या आवडत्या खेळाबद्दल मायबोलीत व्यक्त होता येणे यासारखा दुसरा आनंद नाही. ‘Cricket मराठी’ वर नियमितपणे देशांतर्गत, आयपील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संदर्भातील लेख प्रसिद्ध होतात.  मायबोलीत प्रसिद्ध होणारे हे लेख माझ्यासारख्या अनेक वाचकांसाठी एक पर्वणीच असतात.  ‘Cricket मराठी’ च्या टीमला पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

(वैभव धर्माधिकारी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नियमितपणे क्रिकेट आणि अन्य खेळ फॉलो करतात. तुम्ही त्यांना @iamvaibhavnd या ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलवर फॉलो करु शकता. तसेच (vaibhav dharmadhikari) या पत्त्यावर त्यांच्या क्लबहाऊसमधील चर्चा देखील ऐकू शकता.)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading