निर्धारित 50 ओव्हरची मॅच फक्त 4 बॉलमध्ये संपल्याचा आश्चर्यकारक प्रकार क्रिकेटच्या मैदानात घडला आहे. ही मॅच कोणती गल्लीतील मॅच नव्हती. तर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI ने या मॅचचं आयोजन केले होते. चार बॉलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्याची कामगिरी ही मुंबईनं केली आहे. BCCI नं आयोजित केलेल्या महिलांच्या राष्ट्रीय वन-डे चॅम्पियनशीप (Women ODI Cup) स्पर्धेमध्ये मुंबईच्या महिलांनी (Mumbai Women) नागालँडच्या महिलांचा (Nagaland Women) फक्त 4 बॉलमध्ये 10 विकेट्स राखून पराभव केला आहे.

हे कसं झालं?

देशांतर्गत वन-डे स्पर्धेतील कदाचित सर्वात छोटी वन-डे मॅच इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar Stadium) झाली. या मॅचमध्ये नागालँडची पहिल्यांदा बॅटींग होती. नागालँडची टीम या स्पर्धेतील एक कमकुवत टीम आहे. यापूर्वी मध्य प्रदेश (Madhya Pradesh Women) टीम विरुद्ध देखील ते फक्त 16 बॉलमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी आणखी तळ गाठला.

मुंबईची कॅप्टन सायली सातघरे (Sayali Satghare) ही या विजयाची शिल्पकार होती. सायलीनं 8.4 ओव्हरमध्ये फक्त 5 रन देत रनपेक्षा जास्त म्हणजे 7 विकेट्स घेतल्या. मुंबईकडून एम. दक्षिणीनं 2 तर एस. ठकोरनं एक विकेट घेतली

( वाचा : महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 : वाचा भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक )

सहा जणी शून्यावर आऊट

मुंबईच्या बॉलिंगपुढे नागालँडची बॅटींग ऑर्डर अगदी पत्त्याच्या बंगल्याशी स्पर्धा करत ढेपाळली. त्यांच्या टीममधील सहा जणी या शून्यावर आऊट झाल्या. तर एकीलाही दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. सारीबानं सर्वात जास्त 9 रन काढले. तर मुंबईनं 3 रन अतिरिक्त (Extras) देत नागालँडचा स्कोर 17 पर्यंत नेण्यात हातभार लावला. नागलँडची टीम 17.4 ओव्हरमध्ये 17 रन वर ऑल आऊट झाली.

मुंबईसाठी 18 रनचं टार्गेट हे अगदीच किरकोळ होते. मुंबईच्या महिलांनी (Mumbai Women) हे फक्त 4 बॉलमध्येच पूर्ण करत इतिहास रचला. मुंबईकडून इशा ओझानं 3 बॉलमध्ये 3 फोरसह नाबाद 13 तर वृषाली भगतने 1 बॉलमध्ये सिक्सर खेचत मॅच जिंकून दिली. नागालँडनं एक रन अतिरिक्त दिला.

या स्पर्धेत बुधवारी झालेल्या अन्य मॅचमध्ये मध्य प्रदेशनं बडोद्याचा 98 रननं पराभव केला. मध्य प्रदेशनं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 220 रन केले. त्याला उत्तर देताना बडोद्याची टीम 122 रन काढून ऑल आऊट झाली. तर केरळनं पंजाबचा 67 रननं पराभव केला. केरळनं दिलेलं 217 रनचं टार्गेट पंजाबला पेलवलं नाही. पंजाबची टीम 9 आऊट 149 रन करु शकली.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: