फोटो – डेक्कन क्रॉनिकल

भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची (Mumbai) ओळख आहे. मुंबईने भारताला अनेक जगप्रसिद्ध बॅट्समन दिले. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईने भारताला एक गुणवान बॉलरही दिला. त्या बॉलरचे नाव होते अजित आगरकर (Ajit Agarkar) भारताने 2003 साली ऑस्ट्रेलियात तब्बल 22 वर्षांनी टेस्ट मॅच जिंकली होती. या ऐतिहासिक विजयात अजित आगरकरच्या एका भन्नाट स्पेलचा मोलाचा वाटा होता.

भारतीय टीम 2003-04 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती. सीरिजमधल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. रिकी पॉन्टिंगच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 556 रन्स काढले. द्रविड-लक्ष्मणने झुंजार खेळ करत चोख उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रन्सची आघाडी मिळाली होती.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

भारताला मॅचवर पकड मिळवण्यासाठी बॉलर्सनी चोख काम करणे आवश्यक होते. आगरकरने बॉलर्सच्या या अभियानाचे नेतृत्व केले. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग सातवेळा शून्यावर आऊट झाल्याने त्याला ‘बॉम्बे डक’ (Bombay duck) असे टोपननाव पडले होते. त्याच्या त्या सलग सात शून्याची आजही हेटाळणी होते.

‘बॉम्बे डक’ म्हणून ओळखला जाणारा तोच अजित आगरकर ॲडलेड टेस्टच्या विजयातील महत्त्वाचा घटक होता. आगरकरने सुरुवातीलाच एक इनस्विंग टाकत जस्टीन लँगरला LBW आऊट केले. त्यानंतर त्याने रिकी पॉटिंगला आऊट करत टीम इंडियाला सर्वात मोठे यश मिळवून दिले. आकाश चोप्राने पॉटिंगचा चांगला कॅच पकडला होता. पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी करत टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवणारा पॉटिंग दुसऱ्या इनिंगमध्ये भोपळाही फोडू शकला नाही.

( वाचा : स्मिथ-वॉर्नर नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला मोठा धोका! )

पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट्स मिळवणारा आगरकर नंतरच्या स्पेलमध्ये कांगारुंना गुंडाळण्याच्या इराद्यानेच बॉलिंगला आला. त्याने सलग चार ओव्हर्समध्ये चार विकेट्स घेत कागांरुंच्या शेपटाला वळवळ करु दिले नाही. त्याने त्या चार ओव्हर्समध्ये एका बाजूने नांगर टाकत उभा असलेल्या सायमन कॅटिचसह अँडी बिचेल, जेसन गिलेस्पी आणि स्टुअर्ट मॅक्गिल यांना आऊट केले.

अजित आगरकरने 41 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक स्पेलमुळे ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 196 रन्सवरच संपुष्टात आली. टीम इंडियाने 230 रन्सचं आव्हान सहा विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत तब्बल 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: