फोटो – Cricket Addictor

राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाची ‘द वॉल’ असे का म्हंटले जाते? हे समजून घ्यायचे असेल तर भारताच्या (Team India) 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील ॲडलेडमधील (Adelaide) त्याच्या खेळाची उजळणी करणे आवश्यक आहे.

भारत – ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 2001 साली झालेल्या अजरामर टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात गेली होती. सौरव गांगुलीच्या त्या टीमला लढणे माहिती होते. सचिन, सौरवसह सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, नेहरा, आणि अजित अगरकर असे झुंजार खेळाडू त्या टीममध्ये होते. ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट गांगुलीच्या सेंच्युरीमुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर दोन्ही टीम्स ॲडलेडमध्ये आमने-सामने होत्या.

बॅटिंगला मदत करणाऱ्या ॲडलेड ओव्हलच्या पिचवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह वॉ ने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. त्यावेळी ऑस्ट्रेलिया टीम जगभर आक्रमक खेळासाठी ओळखली जात असे. त्यांनी पहिल्याच दिवशी 400 रन्स काढले. रिकी पॉटिंग तर विशेष फॉर्मात होता. त्याने 242 रन्स काढले. त्याला सर्वांनी उपयुक्त साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 556 रन्सचा डोंगर उभा केला होता. भारताकडून वीरेंद्र सेहवागने आक्रमक तर आकाश चोप्राने सावध सुरुवात केली. चांगल्या सुरुवातीनंतर आगोदर ते दोघे आणि नंतर सचिन-गांगुली झटपट आऊट झाल्याने बिनबाद 66 वरुन टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 85 अशी झाली होती. तेंव्हा द्रविड आणि लक्ष्मण एकत्र आले.

द्रविड – लक्ष्मण पुन्हा एकत्र

द्रविड – लक्ष्मण जोडीनं 2001 च्या कोलकाता टेस्टमध्ये अशाच नाजूक परिस्थितीमध्ये पार्टनरशिप करत एका खळबळजनक विजयाची नोंद केली होती. भारताचे फॅन्स त्यांनी अशाच खेळाची पुनरावृत्ती करावी ही प्रार्थना करत होते. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. द्रविड-लक्ष्मण जोडी पुन्हा जमली. यंदा त्यांचा रोल बदलला होता. आता द्रविड मुख्य तर लक्ष्मण त्याच्या साह्यकाच्या भूमिकेत होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 303 रन्सची पार्टनरशिप केली.

( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )

‘राहुल द्रविड त्या टेस्टमध्ये देवासारखं खेळला’ असं वर्णन सौरव गांगुलीनं नंतर केलं होतं. द्रविड सुरुवातीला मैदानावर घट्ट पाय रोवून उभा होता. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा मारा रोखण्यासाठी त्याने आधी भक्कम तटबंदी केली. लक्ष्मणच्या साथीने किल्ला मजबूत केला आणि नंतर ऑस्ट्रेलियावर प्रतिहल्ला चढवला. द्रविडने अगदी सेहवाग स्टाईलने सिक्सर खेचत त्याची सेंच्युरी पूर्ण केली. लक्ष्मण आऊट झाल्यानंतरही त्याचा निर्धार ढळला नाही. तो अखेरपर्यंत लढला. द्रविड 594 मिनिटे म्हणजेच 9 तास 54 मिनिटे आणि 446 बॉल्स खेळून 233 वर सर्वात शेवटी आऊट झाला. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगच्या टोटलपासून फक्त 33 रन्स दूर होता.

‘द वॉल’ ने पाडली भिंत!

अजित अगरकरच्या भेदक स्पेलमुळे ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 196 वर आटोपली आणि टीम इंडियासमोर विजयासाठी 230 चं टार्गेट होतं. पहिल्या इनिंगमध्ये मॅरेथॉन इनिंग खेळलेला द्रविड दुसऱ्या इनिंगमध्येही पुन्हा उभा राहिला. त्याने सेहवाग, सचिन आणि पुन्हा एकदा लक्ष्मणसोबत भागिदारी करत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं. ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या अभेद्य खेळीपुढे अखेर ऑस्ट्रेलियाची भिंत पडली. टीम इंडियाने तब्बल 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच जिंकली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: