फोटो – ट्विटर / आयसीसी

भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टेस्ट सीरिजला ॲडलेडमध्ये सुरुवात होतीय. ॲडलेड ओव्हलचे (Adelaide Oval) हे ग्राऊंड यजमान ऑस्ट्रेलियासाठी एखाद्या भक्कम किल्ल्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानात आतापर्यंत 78 टेस्ट्स खेळल्या असून त्यापैकी 41 जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला 18 टेस्टमध्ये पराभव स्विकारावा लागलाय. या मैदानावरच्या 19 टेस्ट आजपर्यंत ड्रॉ झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या मैदानातील विजयाची टक्केवारी ही अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 52.56% इतकी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या भक्कम किल्ल्याचा अलिकडचा किंग आहे तो म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली. (Virat Kohli) विराट कोहलीचा किंग कोहली होण्याचा प्रवास ॲडलेडच्याच मैदानावर आठ वर्षांपूर्वी सुरु झाला. याच मैदानावर सहा वर्षांपूर्वी कोहलीनं पहिल्यांदा टीम इंडियाचे टेस्ट मॅचमध्ये नेतृत्व केले होते. इतकेच नाही तर याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी टेस्ट जिंकून टीम इंडियानं पहिल्या-वाहिल्या टेस्ट सीरिज विजयी अभियानाची सुरुवात केली होती.

( वाचा : टीम इंडियाची प्रॅक्टीस उत्तम, आता परीक्षेची प्रतीक्षा! )

बॅडपॅच संपवला!

विराटनं 2012 मध्ये ॲडलेडमध्ये पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळली. त्या टेस्टमध्ये विराटनं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात सेंच्युरी झळकावली होती. विराटची 2012 या कॅलेंडर वर्षातील ती एकमेव सेंच्युरी होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीच्या टेस्ट टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी कोहलीनं ॲडलेड टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावून तेंव्हाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला होता.

टेस्टमध्ये पहिल्यांदा कॅप्टन

ॲडलेड ओव्हलवर 2014 साली झालेली टेस्ट मॅच महेंद्रसिंह धोनीला दुखापतीमुळे खेळता आली नव्हती. त्यामुळे विराट कोहलीनं पहिल्यांदाच टीम इंडियाची टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन्सी केली. डेव्हिड वॉर्नर, मायकल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथच्या सेंच्युरीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांची इनिंग 7 आऊट 517 वर घोषित केली होती.   

ऑस्ट्रेलियाच्या या विशाल धावसंख्येला विराटनं आघाडीवर राहून चोख उत्तर दिलं होतं. विराट (115) आणि मुरली विजय, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या हाफ सेंच्युरीमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 444 रन्स काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 आऊट 290 रन्स काढले. टीम इंडियासमोर आता विजयासाठी 98 ओव्हर्समध्ये 365 रन्सचं टार्गेट होतं.

( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : वीरेंद्र सेहवागनं सहा तास संयमी खेळून टाळला होता भारताचा पराभव! )

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा झटपट आऊट झाले होते. त्यानंतर मुरली विजय आणि विराट कोहली जोडी जमली. आक्रमक विराटला संयमी विजयची साथ मिळाल्यानं कांगारुंच्या तोंडचं पाणी पळालं होतं. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 185 रन्सची पार्टनरशिप केली. विजयची सेंच्युरी फक्त 1 रन्सने हुकली. त्यानंतरही विराटची झुंज सुरु होती. विराटनं एकाकी झुंज देत 141 रन्स काढले. विराटला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली असती तर कदाचित टीम इंडियाने एक अशक्यप्राय वाटणाऱ्या विजयाची नोंद केली होती.

ऐतिहासिक अभियानाला सुरुवात

टीम इंडियाची 2018-19 टेस्ट सीरिजची सुरुवातही ॲडलेडमधूनच झाली होती. त्या टेस्टमध्ये विराटला सेंच्युरी करण्यात अपयश आलं. पण टीम इंडियाने प्रथम ती टेस्ट आणि नंतर पुढे सीरिज जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुदध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कॅप्टन बनला. विराट कोहली हा खऱ्या अर्थाने किंग कोहली बनला.

विराट यंदा कौटुंबीक जबाबदारीमुळे चार टेस्टच्या सीरिजमध्ये फक्त एकच टेस्ट खेळणार आहे. ॲडलेड या आवडत्या मैदानावर विराट एकमेव टेस्ट खेळतोय. त्यामुळे ही टेस्ट जिंकून टीम इंडियाला विजयी आघाडी देण्याचा विराटचा प्रयत्न असेल.

विराट कोहली @ ॲडलेड ओव्हल

टेस्ट3
इनिंग6
रन्स431
सर्वोच्च141
सरासरी71.83
100/503/0

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: