फोटो – ट्विटर/stevesmith49

हिरो आधी मार खातो. अगदी संपण्याच्या मार्गावर असतो. त्यानंतर तो पुन्हा एकदा परीक्षेच्या दिवसाची तयारी करतो. त्या तयारीत अनेक अडथळे येतात. त्यानंतर तो पुन्हा परीक्षेला उभा राहतो. पहिल्याच प्रयत्नात खणखणीत कामगिरी करत आपण हिरो असल्याचं सिद्ध करतो. स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) आयुष्यात असाच पुन्हा एकदा तो हिरो आहे, हे दाखवण्याचा प्रसंग आजच्याच दिवशी 2019 साली (On This day 2019) घडला होता. स्मिथच्या आजवरच्या सर्व सेंच्युरीमधील बेस्ट सेंच्युरी (Steve Smith Best 100) त्यानं आजच्याच दिवशी झळकावली आहे.

लाजीरवाणा प्रसंग

क्रिकेट विश्वातील एक काळा डाग असलेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणात स्टिव्ह स्मिथसह डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कॅमेरुन बॅनक्राफ्ट (Camerin Bancroft) यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. बॅनक्राफ्टला 9 महिने तर स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली.

या बंदीनंतर स्मिथ वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) ऑस्ट्रेलियन टीममध्ये परतला. त्यावेळी त्याला इंग्लंडमध्ये सतत प्रेक्षकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे एजबस्टनमध्ये 1 ऑगस्ट 2019 रोजी सुरु झालेली अ‍ॅशेस सीरिज त्याच्यासाठी खडतर परीक्षेचा पेपर होता. स्मिथनं यापूर्वी झालेल्या अ‍ॅशेसमध्ये 687 रन काढले होते. तो बंदी होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा निर्विवाद नंबर 1 बॅट्समन होता. पण हा सर्व इतिहास त्याच्या पुनरागमनाच्या वेळी फार महत्त्वाचा ठरत नव्हता. ‘जवळपास 16 महिन्यांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये परतलेला स्मिथ एजबस्टनमध्ये कसा हे खेळणार?’ हे त्याच्या करियरसाठी सर्वात महत्त्वाचे होते.

Live मॅचमध्ये केली होती गडबड, जुन्या प्रकरणात अडकणार ऑस्ट्रेलियन दिग्गज?

ऑस्ट्रेलियाची पडझड

स्मिथवर बंदी घातल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन झालेल्या टीम पेननं (Tim Paine) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक बॉलिंगपुढे ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्राफ्ट हे स्मिथचे ‘त्या’ कारस्थानातील साथीदार झटपट आऊट झाले. स्मिथ मैदानात स्थिर होण्यापूर्वी उस्मान ख्वाजा देखील परतला.

स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि ख्रिस वोक्स (Chris Wokes) ही फास्ट बॉलर्सची जोडी ऑस्ट्रेलियन्सना त्रस्त करत होती. त्यामुळेच जेम्स अँडरसन फक्त 4 ओव्हर टाकून दुखापतीमुळे मैदानातून बाहेर गेला तरीही इंग्लंला फरक पडत नव्हता. वोक्सनं पहिलीच अ‍ॅशेस इनिंग खेळणाऱ्या ट्रेविस हेडला 35 रन काढून आऊट केलं. लंचनंतर ऑस्ट्रेलिया आणखी अडचणीत सापडली होती.

मॅथ्यू वेड आला आणि गेला. टीम पेन, जेम्स पॅटीसन आणि पॅट कमिन्स हे तीघं जण मिळून फक्त 11 रनची भर घालू शकले. स्मिथ 34 रनवर असताना योग्य DRS घेतल्यानं वाचला होता. पण ते त्यावेळी इंग्लडला फार महत्त्वाचं वाटत नव्हतं. कारण, ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 आऊट 122 अशी झाली होती.

लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

स्मिथची बेस्ट सेंच्युरी

ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 आऊट 122 अशी झाली त्यावेळी पीटर सीडल स्मिथच्या मदतीला आला. सीडलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील अस्थिरच होते. अ‍ॅशेसपूर्वीच्या इंग्लिश कौंटी सिझनमध्ये तो चांगला खेळला होता. विशेष म्हणजे त्यानं 32 च्या सरासरीनं रन काढले होते. त्यामुळे एजबस्टन टेस्टसाठी जोश हेजलवुडच्या जागी सीडलची निवड झाली होती.

स्मिथनं पीटर सीडलला बॉल बघून खेळण्याचा सल्ला दिला. तो त्याने मानला. स्मिथ आणि सिडल जोडीनं 9 व्या विकेटसाठी 88 रनची पार्टनरशिप केली. त्यामध्ये सीडलचा वाटा बरोबर निम्मा म्हणजे 44 रनचा होता. सीडल आऊट झाल्यानंतर नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा बॅट्समन मैदानात उतरला. त्यावेळी स्मिथ सेंच्युरीपासून 14 रनने दूर होता.

आधी 6 आणि नंतर 4

आपली सेंच्युरी हुकण्याची जास्त शक्यता आहे, हे स्मिथला माहिती होते. त्यावेळी त्यानं आक्रमक खेळ सुरु केला. 92 रनवर असताना त्याने मोईन अलीला एक रन काढण्याचा प्रयत्न न करता थेट सिक्स मारला. त्यानंतर बेन स्टोक्सला खणखणीत फोर लगावत सीरिजमधील 9 वी आणि त्याच्या क्रिकेट करिअरमधील सर्वात बेस्ट सेंच्युरी पूर्ण केली.

सेंच्युरीनंतरही स्मिथच्या बॅटमधून रनचा ओघ सुरूच होता. त्याला स्टुअर्ट ब्रॉडनं आऊट करण्यापूर्वी स्मिथनं 144 रन काढले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमधील स्कोअर होता 284.

पुढे काय झालं?

इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 90 रनची आघाडी घेत 374 रन काढले. स्मिथनं दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा सेंच्युरी लगावत 142 रनची खेळी केली. मॅथ्यू वेडनंही सेंच्युरी लगावत स्मिथला साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं दुसरी इनिंग 7 आऊट 487 रनवर घोषित केली.

इंग्लंडला एजबस्टन टेस्ट जिंकण्यासाठी 398 रनचं आव्हान होतं. यजमान टीमला ते आव्हान झेपलं नाही. त्यांची टीम 146 रनवर ऑल आऊट झाली. स्मिथच्या बेस्ट सेंच्युरीमुळे (Steve Smith Best 100) ऑस्ट्रेलियानं एजबस्टन टेस्ट 251 रननं जिंकली. त्यानंतर संपूर्ण सीरिजमध्ये 110.57 च्या सरासरीनं 774 रन काढले. ती सीरिज 2-2 ने ड्रॉ झाली. पण आधीची सीरिज जिंकल्यामुळे अ‍ॅशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे राहिली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

      

error: