फोटो – ट्विटर

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही दिवस हे कधीही न विसरता येणारे आहेत. त्या अविस्मरणीय दिवसांपैकी एक आजचा दिवस (22 जून ) आहे. आजच्याच दिवशी 25 वर्षांपूर्वी (22 जून 1996) लॉर्ड्सवर इतिहास घडला. सौरव गांगुलीनं पदार्पणातील टेस्टमध्येच सेंच्युरी (Sourav Ganguly Hundred Lords) झळकावली. तर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टेस्ट क्रिकेटमधील पहिला बॉल खेळला. तेव्हा 23 वर्षांच्या असलेल्या या दोन तरुण पोरांनी लॉर्ड्सवर टीम इंडियाच्या नव्या पिढीची ओळख जगाला करुन दिली. त्यानंतर पुढे काय घडले तो इतिहास आहे.

चार वर्षांपूर्वीचे पदार्पण फेल

सौरव गांगुलीने लॉर्ड्स टेस्टच्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध गांगुलीनं पहिली आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच खेळली. त्यामध्ये तो 13 बॉलमध्ये 3 रन काढून आऊट झाला. त्या एकमेव वन-डे नंतर गांगुली चार वर्ष टीम इंडियाच्या बाहेर होता.

इंग्लंड दौऱ्यावरही गांगुलीची निवड झाली तेव्हा देखील त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड न पाहता तो वशिल्याचा माणूस अशी त्याच्यावर टीका झाली होती. त्या दौऱ्यातील मँचेस्टरमध्ये झालेल्या शेवटच्या वन-डेमध्ये गांगुलीनं तिसऱ्या क्रमांकावर येऊन 46 रनची खेळी केली होती. त्यानंतर टेस्ट सीरिजला सुरुवात झाली. सीरिजमधील पहिली टेस्ट एजबस्टला होती. त्या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून विक्रम राठोड, सुनील जोशी, पारस म्हांब्रे आणि व्यंकटेश प्रसाद या चार जणांनी पदार्पण केले. पण या यादीत गांगुली-द्रविडचा नंबर नव्हता. त्यांना टेस्टधील पदार्पणासाठी लॉर्ड्स टेस्टची वाट पाहावी लागली.

संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स!

संकटसमयी पदार्पण

टीम इंडियाचा तो इंग्लंड दौरा संकटाचा होता. वन-डे सीरिज गमावली होती. एजबस्ट टेस्टमध्ये इंग्लंडनं 8 विकेट्सनं विजय मिळवत आघाडी घेतली होती. त्या दौऱ्यात ओपनिंग बॅट्समन नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हा कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनशी मतभेद झाल्यानं (Mohammad Azharuddin) भारतामध्ये परतला होता. त्यातच लॉर्ड्स टेस्टपूर्वी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) जखमी झाला. त्यामुळे टीम मॅनेजमेंटनं लॉर्ड्स टेस्टमध्ये गांगुली-द्रविड या तरुणांना पदार्पणाची संधी देण्याचे ठरवले.

त्या टेस्टमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणारी इंग्लंडची टीम 344 रन वर ऑल आऊट झाली. गांगुलीनं त्या इनिंगमध्ये 15 ओव्हर्स बॉलिंग करत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाची अवस्था 1 आऊट 26 अशी होती तेव्हा गांगुली मैदानात उतरला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस तो सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) नाबाद परतला तेव्हा 26 रनवर खेळत (Sourav Ganguly Hundred Lords) होता.

विराट की विल्यमसन? 13 वर्षांच्या Fire vs Ice लढतीमध्ये कोण आहे सरस?

22 जून 1996

लॉर्ड्स टेस्टचा तिसरा दिवस. हा दिवस टीम इंडियाच्या आगामी काळातील दोन महान बॅट्समनची नांदी देणारा ठरला. सीम बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या गांगुलीची परीक्षा होती. तो त्या परीक्षेला धैर्यानं सामोरं गेला. त्याने ऑफ साईडला काही विलक्षण फटके मारले. (पुढे त्याला ‘God of Off-Side ही पदवी मिळाली.)  

गांगुलीनं तिसऱ्या दिवसाच्या खेळीच्या दरम्यान सचिन, अझर आणि अजय जडेजा हे तीन पार्टरनर गमावले. त्यानंतर त्याला भक्कम साथिदार मिळाला तो म्हणजे राहुल द्रविड.  तो देखील गांगुलीसारखीच पहिली टेस्ट खेळत होता. द्रविड बॅटींगला उतरला त्यावेळी भारताची अवस्था 5 आऊट 202 होती. आणखी एका पराभवाच्या दिशेने टीमची वाटचाल सुरु होती.

या कसोटीच्या क्षणी गांगुली आणि द्रविड या दोन नवोदीतांची जोडी जमली. गांगुलीची नजाकत आणि द्रविडचं भक्कम तंत्र याच्या पार्टरनरशिपने टीम इंडियावरील ते संकट परतवले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 94 रनची महत्त्वाची पार्टरनरशिप केली.

गांगुलीनं या खेळीच्या दरम्यान त्याची पहिली सेंच्युरी (Sourav Ganguly Hundred Lords)  झळकावली. तो 131 रन काढून आऊट झाला. लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पणात विदेशी खेळाडूने केलेला तो सर्वोच्च स्कोअर होता. त्याचा जवळपास 25 वर्षे अबाधित असलेला हा विक्रम अगदी महिन्याभरापूर्वी न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेनं मोडला.

गांगुलीनं लॉर्ड्स टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच सेंच्युरी करुन इतिहास रचला. राहुल द्रविडला ते भाग्य मिळाले नाही. त्याची सेंच्युरी 5 रननं हुकली. पण द्रविडनं तळाच्या बॅट्समनच्या मदतीनं टीम इंडियाला 429 पर्यंत नेले. त्याने टीमचा पराभवाचा धोका टाळला. त्यानंतर द्रविडनं त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये टीमच्या संकटमोचकाचे काम सातत्याने केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: