Dhoni finishes off in style, a magnificent strike into the crowd, India lifts the World Cup after 28 years, the party starts in the dressing room, and it is an Indian captain who has been absolutely magnificent on the night of the finals’’ प्रसिद्ध समालोचक आणि सध्या भारतीय टीमचे कोच असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या या अजरामर कॉमेंट्रीला आज दहा वर्ष झाली आहेत. दहा वर्षानंतरही हे शब्द अनेक भारतीय क्रिकेट फॅन्सना पाठ आहेत. या शब्दांचं मोल देखील तितकंच खास आहे. आजच्या दिवशी 10 वर्षांपूर्वी (2 एप्रिल 2011) रोजी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) तो सिक्स मारला आणि भारतीय टीम दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन (India World Champion)  बनली.

28 वर्षांचा दुष्काळ

भारतानं 2011 च्या तब्बल 28 वर्ष आधी म्हणजे 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता. कुणाला काही समजण्याच्या आतच कपिल देवच्या टीमनं (Kapil Dev) 83 साली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतरचे सहा वर्ल्ड कप प्रत्येक वेळी टीम इंडियाकडून वर्ल्ड कप जिंकण्याची (India World Champion) अपेक्षा होती.

या 28 वर्षांमध्ये क्रिकेटपटूंच्या दोन पिढ्या बदलल्या. तिसरी पिढी उतरणीला लागली होती. पण भारतीय फॅन्सची प्रतीक्षा कायम होती. 1987 आणि 1996 मध्ये आशा जागल्या होत्या. पण दोन्ही वेळेस सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभव झाला. 2003 साली तर विजेतेपदाचा घास अगदी तोंडाशी आला होता, पण फायनलमध्ये मोठा भ्रमनिरास झाला. आजही आपल्यासाठी 2003 ची वर्ल्ड कप फायनल हे एक वाईट स्वप्न आहे.

( वाचा : कपिल देवनं फक्त कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला! )

वर्ल्ड कप फायनलपूर्वी काय झाले?

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत सुरुवातीपासून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. पण त्या वर्ल्ड कपमध्ये भारताची वाटचाल सरळ झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला. इंग्लंड विरुद्धची मॅच टाय झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध रिकी पॉन्टिंगला सेंच्युरी करण्याची संधी भारताने दिली. तर सेमी फायनल जिंकण्यात पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगचा आणि मिसाबह उल हकच्या संथ खेळाचा देखील मोठा वाटा होता. या प्रकराच्या सर्व अडथळ्यांवर मात करत भारताने वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला.

दोनदा टॉस

वर्ल्ड कप फायमलमध्ये एकदा नाही तर दोनदा टॉस झाला. पहिल्यांदा टॉस झाल्यावर कुमार संगकारानं (Kumar Sangkara) कॉल नीट ऐकूच आला नाही, असा दावा केला. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा टॉसला तयार झाला. दुसऱ्यांदा झालेला टॉस संगकारानं जिंकला आणि तात्काळ पहिल्यांदा बॅटींग घेतली.

झहीरचा स्पेल, मुनाफ Unsung Hero

झहीर खानच्या (Zaheer Khan) अती आक्रमकतेमुळे 2003 ची वर्ल्ड कप फायनल हरली असं आजही अनेकांचं मत आहे. झहीरला आठ वर्षांनी पुन्हा एकदा फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याच्याकडे पूर्वीचा कटू अनुभव होता. त्याने ती चूक सुधारण्याचं काम झहीरनं केलं. झहीरचं पहिल्या 5 ओव्हरनंतर बॉलिंग विश्लेषण होतं 5 ओव्हर 3 मेडन 6 रन आणि 1 विकेट!

( VIDEO : आमिर सोहेलनं सुरु केलं व्यंकटेश प्रसादनं संपवलं, ऐतिहासिक घटनेची 25 वर्ष )

झहीर खानला फायनलमध्ये साथ देण्याचं काम मुनाफ पटेलनं (Munaf Patel) केलं. मुनाफनं संपूर्ण वर्ल्ड कप चांगली कामगिरी केली होती, पण त्याची तेंव्हा आणि आजही चर्चा होत नाही. वर्ल्ड कप फायनलही फारशी वेगळी नव्हती. मुनाफनं पहिल्या 20 ओव्हर्सपैकी 6 ओव्हर्स टाकल्या. त्यामध्ये त्याने फक्त 18 रन दिले. झहीरनं निर्माण केलेला दबाव कायम राहिल याची काळजी मुनाफनं घेतली. झहीर मुनाफच्या अजूक माऱ्यामुळे श्रीलंकेला पहिल्या 20 ओव्हरमध्ये 83 रनच करता आले होते.

जयवर्धनेचं नियोजन

20 ओव्हरमध्ये 83 रन काढणाऱ्या श्रीलंकेनं 50 ओव्हर्सच्या शेवटी 274 पर्यंत मजल मारली. ही सर्व श्रीलंकेचा त्या टीममधील सर्वात अनुभवी बॅट्समन महेला जयवर्धने (Mahela Jayawardne) याची कमाल होती. जयवर्धनेनं त्या मॅचमध्ये त्याचा अनुभव आणि कौशल्य पणाला लावून खेळ केला. तो सुरुवातीला संथ खेळला. मधल्या टप्प्यात त्यानं धावफलक हलता ठेवला आणि शेवटच्या टप्प्यात त्याला भरती आली.

भारताच्या सर्व बॉलर्सचा जयवर्धनेनं शेवटी समाचार घेतला. वर्ल्ड कप फायनलमध्ये एक अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. त्याच्या सेंच्युरीमुळेच भारताला 275 रनचं आव्हानात्मक टार्गेट मिळालं.

भारताची खराब सुरुवात

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप फायनलमध्ये सचिनची (Sachin Tendulkar) बॅटींग पाहण्याची साऱ्या जगाला उत्सुकता होती. सचिन-सेहवाग (Virender Sehwag) ही आपली जोडी नंबर 1 बॅटींगला उतरली तेंव्हा सर्वांनाच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) एका खतरनाक स्पेलनं त्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. अंगठातोड यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने सेहवागला शून्यावर LBW केले. त्यानंतर त्याने सचिनला 18 रनवर आऊट करत भारताला त्या दिवसातला सर्वात मोठा धक्का दिला. 7 व्या ओव्हरच्या सुरुवातीला भारताची अवस्था 2 आऊट 31 अशी नाजूक झाली होती.

( वाचा : वर्ल्ड फायनलमध्ये मलिंगाला पाच सिक्स मारणारा बॅट्समन )

दिल्लीकर जोडी जमली

भारताला या बिकट अवस्थेतून अनुभवी गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि तरुण विराट कोहली (Virat Kohli) या दिल्लाकर जोडीनं सांभाळले. त्यांनी वर्ल्ड कप जिंकायचाच या निर्धाराने डोकं खाली घालून शांतपणे पार्टरनरशिप केली. ही जोडी चांगली जमली होती. विराट कोहली रंगात येत होता. त्यावेळी दिलशाननं एक अफलातून कॅच घेत विराटला आऊट केलं. गंभीर-विराट जोडीनं केलेल्या पार्टरनरशिपनेच भारताच्या विजेतपदाचा (India World Champion) पाया रचला गेला.

…आणि धोनी आधी आला!

विराट आऊट झाल्यानंतर बॅटींगमध्ये युवराजचा (Yuvraj Singh) नंबर होता. त्याचा वर्ल्ड कपमधील फॉर्म पाहता तोच येणार अशी सर्वांना खात्री होती. पण महेंद्रसिंह धोनीनं सर्वांचे अंदाज चुकवले. युवराजच्या आधी तो स्वत:  बॅटींगला आला.

धोनीला त्या वर्ल्ड कपमध्ये बॅट्समन म्हणून कमाल करता आली नव्हती. त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनलसाठी राखून धरला होता. धोनी फायनलमध्ये जी इनिंग खेळला ती सतत सर्वांच्या लक्षात राहणार आहे.

( ON THIS DAY : महेंद्रसिंह धोनीने दिला होता क्रिकेट विश्वाला धक्का! )

धोनी इतकीच चांगली इनिंग गौतम गंभीर देखील खेळला. 2007 चा T20 वर्ल्ड कप फायनलचाही गंभीर हिरो होता. 2011 मध्येही तो जिद्दीनं खेळला म्हणून धोनीचे आणि भारतीय टीमचे हात वर्ल्ड कपला लागले. धोनी-गंभीरच्या जोडीनं 28 वर्षांनी वर्ल्ड कप भारतामध्ये येणार याची खबरदारी (India World Champion) घेतली. गंभीरची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. याची आजही हळहळ वाटते. पण त्याच्या हुकलेल्या सेंच्युरीपेक्षा त्यानं काढलेल्या 97 रनचं मोल मोठं आहे.

गंभीर आऊट झाल्यानंतर धोनीनं युवराजच्या मदतीनं भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. धोनीनं त्याच्या खास स्टाईलनं सिक्सर लगावत भारताला वर्ल्ड चॅम्पियन (India World Champion) केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 28 वर्षांनंतर तो जादूई क्षण अखेर अवतरला होता.

रवी शास्त्रींच्याच शब्दात पुन्हा एकदा सांगायचे असेल तर…. “Dhoni finishes off in style, a magnificent strike into the crowd, India lifts the World Cup after 28 years

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: