फोटो – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलणारी घटना कोणती असा प्रश्न विचारला? तर 1983 मध्ये कपिल देवच्या टीमने जिंकलेला वर्ल्ड कप हे स्वाभाविक उत्तर येईल. त्याचबरोबर आणखी एक उत्तर हमखास येते. त्या घटनेला आज (14 मार्च 2002) या दिवशी 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 21 वर्षांपूर्वी आजचा दिवस उजाडला होता, तेंव्हा असं काही घडेल याची अनेकांनी कल्पना केली नव्हती. दिवस मावळला. इतिहास घडला तरी असं काही घडलंय हे अनेकांना खरं वाटत नव्हतं. दिवसभर मॅच पाहणे जमले नाही अशा अनेक भारतीय फॅन्सचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. होय, आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 मार्च 2001 या दिवशी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण (VVS Laxman) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये संपूर्ण दिवस खेळून काढला होता. द्रविड – लक्ष्मणच्या त्या अद्भुत पार्टरनरशिपला (Dravid – Laxman Epic Partnership) आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत.

काय होती पार्श्वभूमी?

कोलकाता टेस्टपूर्वी (Team India) भारतीय टीम मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) काळ्या अध्यायातून सावरत होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (0-3), न्यूझीलंड दौऱ्यात (0-2) अशा फरकानं भारताने टेस्ट सीरिज गमावली होती. भारत – ऑस्ट्रेलिया सीरिजमधील  (India vs Australia 2001 Test Series) मुंबईत झालेली पहिली टेस्ट देखील आपण 10 विकेट्सने गमावली होती. त्यामुळे सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) टीम सीरिजमध्ये कमबॅक करेल अशी आशा खूप कमी जणांना होती.

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कोण होतं?

स्टीव्ह वॉ (Steve Waugh) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या त्या टीमचा जगभर दरारा होता. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. त्या टीममधील 11 च्या 11 खेळाडू हे मॅच विनर होते. स्टीव्ह वॉ, हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, लँगर, मार्क वॉ, शेन वॉर्न, गिलेस्पी, ग्लेन मॅग्रा असे दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू कोलकाता टेस्टमध्ये खेळत होते.  

राहुल द्रविडच्या 49 अद्भुत गोष्टी!

पहिल्या तीन दिवसात काय-काय झालं?

स्टीव्ह वॉ ने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींग घेतली. हरभजन सिंगच्या (Harbhjan Singh)  हॅट्ट्रीकने पहिला दिवस गाजला. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 445 रन केले. त्याला उत्तर देताना भारताची पहिली इनिंग ही फक्त 171 रनवर आटोपली. व्ही.व्ही.एस लक्ष्मणनं 59 रन काढत एकाकी प्रतिकार केला. भारताला ‘फॉलो ऑन’ मिळाला. भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्टीव्ह वॉ चे स्वप्न आता आवक्यात आले होते.

भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हा तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला होता. त्याने सौरव गांगुली सोबत चौथ्या विकेटसाठी शतकी पार्टरनरशिप केली. मात्र ही पार्टनरशिप पुरेशी नव्हती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा लक्ष्मणची सेंच्युरी झाली होती. सहाव्या क्रमांकावर आलेला राहुल द्रविड त्याला साथ देत होता. भारताचा स्कोर 4 आऊट 254 असा होता.

द्रविड – लक्ष्मणची अद्भूत पार्टनरशिप (Dravid -Laxman Epic Partnership )

14 मार्च 2001 हा दिवस उजाडला. कोलकाता टेस्टचे दोन दिवस तर भारताची शेवटची बॅटींग जोडी शिल्लक होती. भारताला मॅच वाचण्यासाठी मोठी आघाडी घेणे आवश्यक होते. द्रविड-लक्ष्मण त्या दिवशी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळले.

त्या दोघांनी संपूर्ण दिवस ऑस्ट्रेलियाला दाद दिली नाही. मॅग्रा, शेन वॉर्न, गिलेस्पी आणि कॅस्प्रोविज असा बॉलिंग अटॅक ऑस्ट्रेलियाकडे होता. त्या दिवशी त्यामधील एकाचाही उपयोग झाला नाही. द्रविड-लक्ष्मणच्या पार्टनरशिपपुढे (Dravid – Laxman Epic Partnership ) जगज्जेता स्टीव्ह वॉ इतका हताश झाला होता की त्याने त्या इनिंगमध्ये तब्बल 9 बॉलर वापरले. विकेट किपर गिलख्रिस्ट आणि स्वत: कॅप्टन स्टीव्ह वॉ सोडले तर त्या मॅचमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अन्य 9 जणांनी 14 मार्च 2001 या दिवशी बॉलिंग केली.

ऑस्ट्रेलियावर तशी वेळ शेवटची कधी आली होती हे कुणालाच आठवत नव्हतं. द्रविड-लक्ष्मणच्या पार्टरनशिपमुळे (Dravid -Laxman Epic Partnership ) ती वेळ आली. व्ही.व्ही. लक्ष्मण याने त्या दिवशी भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा सुनील गावसकर यांचा रेकॉर्ड मोडला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा लक्ष्मण 275 आणि द्रविड 155 रन काढून खेळत होते. या जोडीने संपूर्ण दिवसभर खेळून 335 रन जोडले. चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताचा स्कोअर हा 4 आऊट 589 इतका झाला होता.

राहुल द्रविडच्या परदेशातील पाच अविस्मरणीय टेस्ट इनिंग

ऑस्ट्रेलियाची XX XX ली!

कोलकाता टेस्टच्या पाचव्या दिवशी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी करणारा पहिला भारतीय बनला नाही. तो 281 रनवर आऊट झाला. भारताने 7 आऊट 657 या स्कोअरवर दुसरी इनिंग घोषित केली.

कोलकाता टेस्टच्या शेवटच्या दिवसाच्या सत्रातमध्ये सर्व चार रिझल्ट शक्य होते. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांच्या स्पिन बॉलिंगमुळे भारताने फॉलो ऑन मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

विराट कोहली काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर मुरली विजयला उद्देशून ‘शाम तर खेलेंगे तो इनकी XX जायेगी असं म्हणाला होता. कोहली हे बोलण्याच्या दीड दशकं आधी कोलकाता टेस्टमध्ये द्रविड-लक्ष्मण संध्याकाळपर्यंत (खरंतर संपूर्ण दिवसभर) खेळले. त्यांच्या या अद्भूत पार्टरनरशिपमुळे (Dravid -Laxman Epic Partnership ) क्रिकेट विश्वात श्रेष्ठत्वाच्या अहंकारात वावरणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचे गर्वहरण झाले’ अशी भावना अनेक क्रिकेट फॅन्सची 14 मार्च 2001 या दिवशी झाली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: