फोटो – ट्विटर

आगामी T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान (India – Pakistan) या दोन्ही टीमचा एकाच गटात समावेश करण्यात आलेला आहे. या दोन टीम T20 वर्ल्ड कपमध्ये सहाव्यांदा एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. T20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीमध्ये आजवर भारताचेच वर्चस्व राहिले आहे. भारताने सर्व पाच मॅच जिंकल्या आहेत. या विजयी अभियानाची सुरुवात 2007 साली झाली. पहिल्या T20 वर्ल्ड कपमधील पहिल्या भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीचा इतिहास (India bowl-out Pakistan) मोठा रंगतदार आहे. आजच्याच दिवशी (On This Day 14 September 2007) 14 वर्षांपूर्वी दोन देशांमध्ये ही लढत झाली.

एकाच गटात समावेश

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश वन-डे वर्ल्ड कपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध पाचव्या वर्ल्ड कपमध्ये 1992 साली (Cricket World Cup 1992) पहिल्यांदा खेळले. 1987 मध्ये ते एकमेकांच्या विरुद्ध खेळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी दोन्ही टीम सेमी फायनलमध्येच पराभूत झाल्या.   

T20 वर्ल्ड कपमध्ये मात्र तो योग अगदी पहिल्या वर्ल्ड कपमध्येच जुळून आला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमचा स्कॉटलंडसह एकाच गटात समावेश करण्यात आला होता. या वर्ल्ड कपच्या काही महिनेपूर्वी झालेला T20 वर्ल्ड कप दोन्ही टीमसाठी मोठा निराशाजनक ठरला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2007) दोन्ही टीम नव्या कॅप्टनसह नव्या आशेनं दाखल झाल्या होत्या.

मोहम्मद आसिफचा भेदक स्पेल

इंग्लंडमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकण्यापूर्वी मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) हा पाकिस्तानचा मुख्य बॉलर होता. भारताविरुद्धची ती T20 मॅच आसिफनं त्याच्या भेदक बॉलिंगने गाजवली. आसिफने 4 ओव्हर्समध्ये अवघ्या 18 रनच्या मोबदल्यात गौतम गंभीर (0), वीरेंद्र सेहवाग (5), युवराज सिंह (1) आणि दिनेश कार्तिक (11)  या चार टॉप ऑर्डर्सच्या बॅट्समना आऊट केले. आसिफच्या स्पेलमुळे 7 व्या ओव्हरमध्येच भारताची अवस्था 4 आऊट 37 झाली होती.

शोएब अख्तरनं केली होती बॅटनं मारहाण, आफ्रिदीनं 14 वर्षांनी सांगितलं कारण

उथप्पाचा प्रतिहल्ला

टॉप ऑर्डर पॉवर प्लेमध्ये कोसळत असताना तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेला रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)  दुसऱ्या बाजूला शांतपणे उभा होता. त्याने सुरुवातीला आसिफच्या 4 ओव्हर्स संपण्याची वाट पाहिली. त्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. उथप्पानं 39 बॉलमध्ये 50 रनची महत्त्वाची खेळी खेळली.

उथप्पाला कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चांगली साथ दिली. तो एका बाजूने रन काढत होता. इराफान पठाणनमं शाहिद आफ्रिदीला लगावलेले सलग 2 सिक्स आणि नंतर अजित आगरकरनं उमर गुलला लगावलेले 2 फोर यामुळे टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 141 पर्यंत मजल मारली. धोनी अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये 33 रनवर आऊट झालाय

T20 क्रिकेटमध्ये 2007 साली 141 हा चांगला स्कोअर (India bowl-out Pakistan) समजला जात असे.

टीम इंडियाची जिद्द

महेंद्रसिंह धोनीच्या टीममध्ये इतिहासाचं ओझं न बाळगणाऱ्या नव्या तरुणाईचा समावेश होता. त्यांच्यामध्ये काही तरी करुन दाखवण्याची जिद्द होती. ती जिद्द टीम इंडियाच्या बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये दिसली.

आर.पी. सिंगने (RP Singh) पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करत पाकिस्तानला वेगवान सुरुवात मिळू दिली नाही. त्याला श्रीशांतने साथ दिली. आरपीने इम्रान नझीरला आऊट केले. मैदानात सेट होत असलेल्या सलमान बटचा अडथळा अजित आगरकरनं दूर केला. धोकादायक कमरान अकमल युवराजच्या थ्रो मुळे रन आऊट झाला. तर अनुभूवी युनूस खानला इराफानने स्वस्तात आऊट केले. त्यामुळे 9 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानची अवस्था चार आऊट 87 होती.

पाकिस्तानचे पुनरागमन

कॅप्टन शोएब मलिक (Shoaib Malik) आणि मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) या जोडीनं पाकिस्तानला सावरलं. त्यांनी पार्टनरशिप करण्यावर भर दिला. त्यांनी 40 रनची पार्टनरशिप केली. इराफान पठाणच्या स्पेलमधील शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा मलिकचा प्रयत्न फसला. त्याची बाऊंड्रीवर हरभजन सिंगनं कॅच घेण्यात काही चूक केली नाही.

शोएब मलिक गेला असला तरी शाहीद आफ्रिदी शिल्लक होता. T20 फॉरमॅट त्याच्यासाठीच बनवला आहे, असे मानले जात होते. आगरकरच्या बॉलिंगवर त्याचा एक कॅच हरभजननं सोडला. त्यानंतर लगेच आफ्रिदीनं एक त्याच्या स्टाईलनं चौकार लगावला. तो अपवाद वगळता भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानला बांधून ठेवले होते. पाकिस्तानला विजयासाठी 18 बॉलमध्ये 42 रन हवे होते. आता त्यांच्या सर्व आशा आफ्रिदीवर होत्या. त्यावेळी हरभजनच्या बॉलवर आफ्रिदी फसला. यावेळी दिनेश कार्तिकनं त्याचा कॅच घेतला.’

‘रिटायरमेंट का किंग कौन?’, शाहीद आफ्रिदी

शेवटच्या ओव्हर्सचा थरार

आफ्रिदी आऊट झाल्यानंतर मिसबाह हा पाकिस्तानचा एकमेव बॅट्समन मैदानात शिल्लक होता. या वर्ल्ड कपसाठी 33 वर्षांच्या मिसबाहची टीममध्ये निवड झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. आफ्रिदी आऊट झाल्यानंतर पाकिस्तानला जिंकण्यासाठी 14 बॉलमध्ये 39 रनची गरज (India bowl-out Pakistan) होती. त्यावेळी मिसाबहनं यासिर अराफतच्या मदतीनं प्रतिहल्ला करत ते टार्गेट 6 बॉल 12 रनवर आणले.

धोनीला शेवटची ओव्हर श्रीशांतला देण्यावाचून कोणता पर्याय नव्हता. श्रीशांतने त्यापूर्वी 3 ओव्हरमध्ये 18 रनच दिले होते. पण त्याला आता शेवटच्या ओव्हरच्या दबावात बॉलिंग करायची होती. अराफतनं पहिल्या बॉलवर 1 रन काढला. त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये मिसबाहनं 2 फोरसह 10 रन काढले. त्यामुळे भारत-पाकिस्तानचा स्कोअर समान झाला होता. पाकिस्तानला आता विजयासाठी 2 बॉलमध्ये फक्त 1 रनची गरज होती.

पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट

महेंद्रसिंह धोनीनं फिल्डर्स जवळ बोलावले होते. पाकिस्तानला आता फक्त 1 रनची गरज होती. श्रीसंतचा पाचवा बॉल मिसबाहला नीट खेळता आला नाही. त्यामुळे तो बॉल निर्धाव गेला. शेवटच्या बॉलवरही मिसबाहचा फटका नीट बसला नाही. नॉन स्ट्रायकरला असलेला अराफात जोरात पळाला होता.पण, मिसबाहला पळण्यास थोडा उशीर झाला. मिसबाहचा तो शॉट त्या टीममधील बेस्ट फिल्डर युवराजच्या दिशेनं गेला. युवराजनं काहीही चूक केली नाही. त्याने मिसबाहला रन आऊट केले. पाकिस्तानला शेवटच्या दोन बॉलमध्ये एक रन काढण्यात अपयश आले.

‘बॉल आऊट’चा थरार

फुटबॉलच्या पेनल्टी शूट आऊटवरून बॉल आऊट ही संकल्पना क्रिकेटमध्ये आणली होती. टी इंडियाने सरावाच्या दरम्यान बॉल आऊटची भरपूर प्रॅक्टीस केली होती. या प्रॅक्टीसमध्ये रॉबिन उथप्पा सर्वात आघाडीवर होता. त्यामुळे तो बॉल आऊटमध्ये (India bowl-out Pakistan)  धोनीचा एक पर्याय असणार हे नक्की होते.

भारताकडून बॉल आऊटमध्ये वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि उथप्पा या तिघांनीही स्टंप उडवले. पाकिस्तानच्या बॉलर्लना तो प्रकार झेपलाच नाही. अराफतनं फुल टॉस टाकला. तो मिस झाला. ते पाहून उमर गुलनं रन अप कमी करत बॉल टाकला तो देखील चुकला. शेवटी शाहीद आफ्रिदीचा बॉलही स्टंपला न लागता निघून गेला. टीम इंडियाने 3-0  या फरकाने बॉल आऊटमध्ये पाकिस्तानवर मात केली.

भारताच्या T20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानवरील वर्चस्वाला या मॅचमध्ये सुरुवात (India bowl-out Pakistan)  झाली होती.

(टीप- भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचचा आढावा घेणारी ही सीरिज आहे. हा या सीरिजमधील पहिला लेख आहे. )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: