18 जानेवारी 1998 हा दिवस आज वयाची 30 वर्ष पूर्ण केलेला भारतीय क्रिकेट फॅन कधीही विसरु शकणार नाही. त्या दिवशी बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या इंडिपेंडन्स डे (Independence Cup) चषकाच्या तिसऱ्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव केला होता. भारताला विजयासाठी 2 बॉल्समध्ये 3 रन्सची गरज असता चौकार खेचणारा मराठमोळा ऋषिकेश कानिकटर (Hrishikesh Kanitkar Four) त्या मॅचचा हिरो होता.

बांग्लादेशमध्ये (Bangladesh) झालेल्या त्या तिरंगी स्पर्धेचे यजमान बांग्लादेशसह भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश सहभागी झाले होते. 50 वर्षांपूर्वी या तिन्ही टीम्स भारत देशाचा भाग होत्या. त्यांनतर सुरुवातीला भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि नंतर पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेश अस्तित्वात आले.

क्रिकेटचा विचार केला तर बांग्लादेशला ‘टेस्ट नेशन’ चा दर्जा मिळाला नव्हता. भारत आणि पाकिस्तानने तो पर्यंत एक-एक क्रिकेट वर्ल्ड कप जिंकले होते. बारा वर्षांपूर्वी चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादने मारलेला सिक्सर, शारजातील वर्षानुवर्षे शुक्रवारी हरलेल्या फायनल्स यामुळे मागील दशकात पाकिस्तानी क्रिकेटचं पारडं भारतावर जड होतं. अर्थात सलग दोन वर्ल्ड कपमध्ये भारताने जिद्दीनं खेळ करत पाकिस्तानला पराभूत केले होते.

वाढदिवस स्पेशल : कपिल देव @ 175*; एका इनिंगनं बदलला संपूर्ण देश! )

तिरंगी स्पर्धेतील साखळी फेरीत तीन मॅच तर त्यानंतर ऑस्ट्रेलियन तिरंगी सीरिजच्या धर्तीवर ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनल होणार होत्या. भारत आणि पाकिस्तानच्या टीम फायनलमध्ये जाणार आणि त्या दोन देशांतील मॅचमुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड भक्कम आर्थिक कमाई करणार असे सरळ गणित होते. प्रत्यक्षातही तसेच झाले. भारताने पहिली तर पाकिस्तानने दुसरी फायनल जिंकली. आता तिसरी फायनल या स्पर्धेचा विजेता (Hrishikesh Kanitkar Four) ठरवणार होती.

अन्वर ठरला अडसर!

तिसऱ्या फायनलमध्ये भारताचा कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनने ( Mohammad Azharuddin) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि आमिर सोहेल लवकर आऊट झाले. त्यानंतर भारताविरुद्ध हमखास खेळणाऱ्या सईद अन्वरची एजाज अहमद सोबत जोडी जमली. अन्वरनं 194 रनची वर्ल्ड रेकॉर्ड इनिंग खेळून वर्षही अजून उलटलं नव्हतं. भारतीय बॉलर्सवर त्याचं मोठं दडपण होते. अन्वर-अहमद जोडीने त्या दडपणाचा फायदा घेत तिसऱ्या विकेटसाठी 230 रन्सची पार्टरनरशिप केली. ऑस्ट्रेलियाच्या अँलन बॉर्डर-डीन जोन्स जोडीचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. अन्वर-अहमद यांच्या सेंच्युरीमुळे पाकिस्तानने निर्धारीत 48 ओव्हर्समध्ये 5 आऊट 314 रन्स केले.

ही मागच्या शतकातील आणि T20 क्रिकेट सुरु होण्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात इतके रन्स कुणीही यशस्वीपणे पूर्ण केले नव्हते. भारतीय टीमने यापूर्वी फक्त दोन वेळाच 300 चा टप्पा पार केला होता. त्यामुळे अनेकांना भारताच्या विजयाची आशा नव्हती.

सचिननं रचला पाया

कॅप्टनसीच्या ओझ्यातून नुकताच मुक्त झालेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि बंगालचा वाघ पुढे टीम इंडियाचा कॅप्टन होणारा सौरव गांगुलीला सहजासहजी हार स्वीकारणे मान्य नव्हते. या जोडीनं सुरुवातीच्या काही ओव्हर्स सावधपणे खेळून काढल्या. त्यानंतर सचिननं आक्रमण करण्यास सुरुवात केली. अझर महमूदच्या एकाच ओव्हरमध्ये सचिननं चार चौकार लगावले. ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताकचं स्वागत सिक्सरने केलं. सचिन 41 वर खेळत असताना शाहिद आफ्रिदीनं त्याला आऊट केलं. त्याने 41 रन्स काढण्यासाठी फक्त 26 बॉल्स घेतले. सचिनच्या या आक्रमक इनिंगमुळे विजयाचा पाया (Hrishikesh Kanitkar Four) रचला गेला होता.

गांगुली- रॉबिन जोडी जमली!

 सचिन आऊट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नवोजत सिंह सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर न येता रॉबिन सिंग (Robin Singh) खेळायला आला. रॉबिन सिंगचे ‘रनिंग बिटविन द विकेट’ सर्वोत्तम होते. त्यामुळे तो धावफलक सतत हलता ठेवेल आणि गरजेप्रमाणे गांगुलीसोबत (Sourav Ganguly) फटकेबाजी करेल असे टीम मॅनेजमेंटचे डावपेच होते. सौरव-रॉबिन जोडीनं हे डावपेच य़शस्वी ठरवले. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 179 रन्सची पार्टरनरशिप केली.

1990 च्या दशकातील Bits and Pieces Player

रॉबिन सिंग 83 बॉल्समध्ये 82 रन्स काढून आऊट झाला. अझर झटपट परतला. त्यानंतर रनरेट वाढवण्याच्या नादात गांगुली आऊट झाला. मात्र त्यापूर्वी गांगुलीनं 124 रन्सची अविस्मरणीय खेळी केली होती. ढाक्यातील मैदानात उत्तम प्रकारच्या लाईट्सची सोय नव्हती. मैदानात आंधार वाढत होता. मॅच थांबवण्याचा विचार सामनाधिकारी करत होते त्यावेळी भारत मागे होता. अझरनं त्याला हरकत घेतल्यानं कमी प्रकाशातही मॅच सुरु ठेवण्यात आली. भारताने त्यानंतर अजय जडेजा आणि सिद्धूच्या विकेट गमावल्या.

भारताना शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 18 रन्सची आवश्यकता होती. नयन मोंगियाने एका फोरसह 9 रन्स काढले, पण ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तो रन आऊट झाला. आता एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 9 रन्स हवे होते. मराठमोळा ऋषिकेश कानिटकर आणि अनुभवी बॉलर जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) मैदानात होते. कानिटकरनं त्या मॅचपूर्वी फक्त 2 वेळाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंग केली होती. नवखा कानिटकर आता त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची ओव्हर (Hrishikesh Kanitkar Four) खेळणार होता.

असा जिंकला भारत…

पाकिस्तानकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सकलेन मुश्ताक आला. त्याच्या पहिल्याच बॉलवर कानिटरनं चौकार मारुन दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. पहिल्या बॉलवर फक्त एक रन निघाला. दुसरा बॉल श्रीनाथने सिक्सर मारण्याच्या निर्धाराने बॉल खूप उंच मारला. बॉल खूप उंच गेला आणि पाकिस्तानच्या तीन फिल्डर्सच्यामध्ये पडला. कानिटकर-श्रीनाथ जोडीनं दोन रन्स पळून काढले. चौथ्या बॉलवर श्रीनाथने एक रन्स काढल्याने कानिटकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला.

ON THIS DAY: फक्त 44 बॉलमध्ये 149 रन! डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन?

भारताला विजयासाठी 2 बॉल्समध्ये 3 रन्स हवे होते. कानिटकरचा पहिल्या बॉलवर चौकार मारण्याचा प्रयत्न फसला होता. प्रयत्न फसला तरी कानिटकर शांत होता. त्याचा स्वत:वर विश्वास होता. ‘आपण फोर नक्की मारु शकतो’ हा त्याला विश्वास होता.

कानिटकरनं सकलेनच्या पाचव्या बॉलवर त्याला आणि संपूर्ण भारताला जे हवे होते तेच केले. सकलेनला फोर मारला. भारतानं पाकिस्तानचा थरारक लढतीत पराभव केला. जावेद मियांदादच्या सिक्सरचे भूत भारतीय टीमच्या मानगुटीवरुन उतरले. मैदानात कानिटकर-श्रीनाथने, ड्रेसिंगरुमध्ये भारतीय प्लेयर्सनी तर ती मॅच घरातील टीव्हीवर पाहणाऱ्या भारतीयांनी एकमेकांना मिठी मारत विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. मराठमोळा ऋषिकेश कानिटकर हा हिरो ठरला. आज इतक्या वर्षानंतरही ऋषिकेश कानिटकर त्या चौकारासाठी (Hrishikesh Kanitkar Four) भारतीयांच्या लक्षात आहे.

ऋषिकेश कानिटकरचा थरारक चौकार, पाहा व्हिडिओ

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: