
Desert Storm या शब्दाचा अर्थ म्हणजे वाळवंटात येणारं वादळ. तुम्ही आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक असाल तर तुम्हाला हा शब्द ऐकल्यानंतर अमेरिकेनं इराक विरुद्ध केलेलं पहिलं युद्ध आठवेल. वादळ, युद्ध या नकारात्मक शब्दाच्या पलीकडंही या शब्दाला एक अर्थ आहे. अनेक भारतीयांना गेल्या दोन दशकांपासून Desert Storm म्हंटलं की आजही एकच गोष्ट आठवते. त्या गोष्टीला आज 24 वर्ष झाली आहेत. आजच्याच दिवशी वय वर्ष 25 पूर्ण होण्यासाठी 2 दिवस बाकी असताना सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलिया विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 रन काढले होते. भारतीय फॅन्स ती इनिंग विसरणं कधीही शक्य नाही.
ही तीच इनिंग आहे…
ही तीच इनिंग आहे ज्यावेळी शेन वॉर्नला (Shane Warne) आपण हतबल असल्याचं मैदानात वाटलं. ही तीच इनिंग ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यात मैदानात काय सुरु आहे हे डेमियन फ्लेमिंगला (Damien Fleming) समजत नव्हतं. ही तीच इनिंग आहे, ज्यानंतर आयुष्यात गोष्टी किती वेगानं बदलतात हे स्टीव्ह वॉला (Steve Waugh) जाणवलं. ही तीच इनिंग आहे, जी पाहून भारतीय क्रिकेटमध्ये हे असं पहिल्यांदाच घडतंय, असं व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला (VVS Laxman) वाटलं. ही तीच इनिंग आहे, ज्याची टोनी ग्रेग (Tony Greig) यांनी केलेली कॉमेंट्री आजही अनेकांच्या लक्षात आहे. आणि ही तीच इनिंग आहे, ज्याबद्दल ‘कितीदा नव्याने तुला आठवावे…’ अशी भावना तुमच्या-आमच्या सारख्या भारतीय क्रिकेटच्या फॅन्सची होते.
काय होती परिस्थिती?
भारत-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ती कोका कोला कप (Coca-Cola Cup) स्पर्धा होती. साखळी फेरीतील शेवटची लढत. भारताला न्यूझीलंडला ओलांडून फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हरवणं किंवा न्यूझीलंडपेक्षा जास्त रन रेट करुन हरणं हे दोन पर्याय होते. भारताला हे दोन्ही जमणार नाही, असं तेंव्हा त्या मॅचच्या कॉमेंट्री पॅनलमधल्या चॅपल मंडळींना वाटत होते.
भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कुणी लवकर आऊट झालं तर त्याला कव्हर करणारी बाकीची मंडळी होती. भारतीय टीमची बॅटींग ऑर्डर सचिन तेंडुलकर या एकाच व्यक्तीवर अवलंबून होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 7 आऊट 284 रन केले तेंव्हा सचिनला आऊट केलं की काम झालं अशी भावना, ऑस्ट्रेलियाची आणि न्यूझीलंडच्या फॅन्सची होती.
सचिन तेंडुलकरची पाकिस्तानला पराभूत करणारी अविस्मरणीय खेळी!
त्या दिवशी फक्त आक्रमक सचिन दिसला
सचिन तेंडुलकरचा स्वाभाविक खेळ हा आक्रमक होता. त्याला अनेकदा टीमची गरज आणि मॅचमधील परिस्थिती पाहून सावध खेळावं लागत असे. विशेषत: सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये तो नेहमीच सावध खेळत असे. त्या दिवशी सचिनच्या मनात काही तरी वेगळंच होतं. तो पहिल्या बॉलपासून ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर तुटून पडला.
कॅस्प्रोविजवर सचिननं पहिल्यांदा हल्ला केला. त्याला दोन सिक्स लगावले. सौरव गांगुली आऊट झाला. पिंच हिटर म्हणून नयन मोंगिया आला सचिनला त्याची काहीच फिकीर नव्हती. कॅस्प्रोविज नंतर शेन वॉर्नचीही तीच अवस्था झाली. वॉर्ननं बॉल टाकताच सचिननं पुढं येऊन त्याला सहज फटके मारले.
भारताच्या एका बाजूनं विकेट पडत होत्या. गांगुली, मोगिंया, अझर आणि अजय जडेजा आऊट झाले. सचिनच्या सोबतीला व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आला. लक्ष्मण मैदानात येऊन स्थिरावण्यापूर्वी शारजात वाळूचं वादळ (Desert Storm) आलं. या वादळामुळे खेळ थांबवावा लागला.
… त्यानंतर सचिनचं Desert Storm
या वादळामुळे खेळाचा वेळ वाया गेला होता. आता भारताला विजयासाठी 46 ओव्हर्समध्ये 276 रनचं टार्गेट देण्यात आलं. फायनलमध्ये जाण्यासाठी 237 रन करायचे होते. सचिन तेंडुलकरनं आयुष्यात पहिल्यांदाच Desert Storm पाहिलं होतं. त्याला हॉलिवूडच्या सिनेमातील प्रसंग प्रत्यक्षात सुरु आहे, असा भास झाला.
सचिन वादळ नवं होतं. या वादळानंतर मैदानात दिसलेला सचिन क्रिकेट विश्वाला नवा होता. भारतासाठी परिस्थिती अवघड होती. कॅस्प्रोविज पुन्हा बॉलिंगला आला सचिननं त्याचं सरळ फटका मारत उत्तर दिलं. स्टीव्ह वॉ च्या डोक्यावरुन एक असाच अफलातून फटका मारला. डेमियन प्लेमिंग अधिक त्वेषानं आणखी फास्ट बॉलिंग करत होता. सचिनवर त्याचा परिणाम झाला नाही.
तो प्रत्येक रनसाठी वेगान पळत होता. बॉल बॅटला लागला की 2 रन काढायचे असा सचिनचा निर्धार होता. याच पद्धतीनं एक वेगवान दोन रन पूर्ण करत सचिननं सेंच्युरी पूर्ण केली. सचिन ही खेळी खेळत असताना लक्ष्मण त्याच्या सोबत होता. त्यानं या खेळीची आठवण सांगताना म्हंटलं आहे, “ मी दोन ओव्हर्सच्या दरम्यान सचिनशी बोलत होतो, पण मला माहिती होतं की, सचिनपर्यंत माझे शब्द पोहतच नाहीयत.”
क्रिकेट फॅन्सच्या डोळ्यात आजही पाणी आणणारी सचिनची सेंच्युरी
सचिन सेंच्युरीनंतरही सुसाट खेळत होता. भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये जाईल अशी आशा त्यामुळे निर्माण झाली होती. भारताला मॅच जिंकण्यासाठी 20 बॉलमध्ये 34 रन अशी परिस्थिती होती. सचिन 43 व्या ओव्हर्सच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. लक्ष्मण आणि ऋषिकेश कानिटकर जोडीला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 8 रन काढता आले.
ऑस्ट्रेलियानं ती मॅच 26 रननं जिंकली पण सचिनच्या Desert Storm मुळे त्यांची टीम हादरली होती. त्या धक्क्यातून ती दोन दिवसांनी झालेल्या फायनलमध्ये सावरलीच नाही. फायनलमध्ये सचिननं आणखी एक क्लासिक सेंच्युरी करत भारताला कोका कोला कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.