
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Teandulkar) 24 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द अनेक अविस्मरणीय खेळींनी सजली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरीची सेंच्युरी करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिननं अनेक अविस्मरणीय सेंच्युरी झळकावल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये (Chennai Test 1999) आजच्याच दिवशी (31 जानेवारी 1999) 22 वर्षांपूर्वी सचिननं झळकावलेली सेंच्युरी ही सचिनची सर्वोत्तम सेंच्युरी मानली जाते.
भारतीय टीम 1989 साली पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती. त्यानंतर तब्बल दशकभर दोन्ही देशांमधील टेस्ट क्रिकेट बंद होते. पाकिस्तानची टीम 1999 नंतर दोन टेस्टची सीरिज खेळण्यासाठी भारतामध्ये आली होती. पाकिस्तानच्या त्या दौऱ्याकडे फक्त क्रिकेट विश्वाचं नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे देखील बारीक लक्ष होते. पाकिस्तानच्या ऐतिहासिक भारत दौऱ्यातील पहिली टेस्ट चेन्नईत झाली.
पाकिस्तानकडे वासिम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनूस (Waqar Younis) हे क्रिकेट जगातले दोन खतरनाक बॉलर्स होते. त्यांच्या जोडीला संपूर्ण भरात असलेला ‘दुसरा’ फेम ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक. (Saqlain Mushtaq) युवा शाहिद आफ्रिदीनंही (Shahid Afridi) आपल्या ‘हातचालाखी’ च्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटमधल्या या सर्वात ‘हाय- व्होल्टेज’ मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी 271 रन्सचं लक्ष्य होतं. पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगमुळे भारताची अवस्था 5 आऊट 82. त्यामध्ये अंपायरने ढापलेल्या सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) वादग्रस्त विकेटचाही समावेश होता.
सचिन एका बाजूला उभा होता. त्याची आणि नयन मोंगियाची (Nayan Mongia) जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टरनरशिप केली. मोंगिया आऊट झाला तरी सचिन खेळत होता. चेन्नईचे (Chennai Test 1999) दमट हवामान कोणत्याही क्रिकेटपटूच्या फिटनेसची परीक्षा घेणारचं असतं त्यातचं सचिनला त्या टेस्टमध्ये पाठदुखीनं हैराण केलेलं होतं. तरी देखील आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध (India vs Pakistan) भारताला विजय मिळवून द्यायचाच या एकाच निर्धाराने त्यानं तब्बल 405 मिनिटं बॅटिंग केली. विजय अगदी हातातोंडाशी असताना सचिन आऊट झाला. सचिन परतला तेंव्हा भारताला केवळ 17 रन्स हवे होते.
चौथ्या दिवसाचे काही ओव्हर्स आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी होता. त्यामुळे अगदी रमत-गमत हे रन्स काढले तरी चालणारं होतं. तरी देखील शेवटच्या चौघांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.सचिन परतल्यानंतर अवघ्या चार रन्समध्ये भारताच्या पुढच्या तीन विकेट्स पडल्या. सचिननं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला भारत 12 रन्सने पराभूत झाला. नेता पडला की कोसळायचं ही आपली जुनी परंपरा शेवटच्या तिघांनी पाळली.
( वाचा : Video: सिडनी टेस्टच्या आठवणी, सचिन तेंडुलकर नाबाद 241! )
भारतीय टीमनं विजयाच्या दारातून पराभव खेचून आणला. सचिनच्या सेंच्युरीची जी फूलं भारतीय टीमच्या विजयात उधळली गेली असती पण तसं व्हायचं नव्हतं. भारताचा चेन्नई टेस्टमध्ये पराभव झाला असला तरी सचिनची ती झुंजार खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे. भारतीय क्रिकेटचे फॅन्स त्या दिवसाच्या आठवणीने नेहमी हळवे होतात.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.