फोटो – ट्विटर

क्रिकेटमधील काही गोष्टी अशा आहेत, की ज्या तुम्ही क्रिकेट फॅन नसाल आणि भारतीय असाल तरी त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. टीम इंडियाचा फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने टाकलेला एक बॉल असाच आहे. व्यंकटेश प्रसाद हा विषय जरी कधी गप्पांमध्ये निघाला, तरी अनेकांना जी घटना आठवते. त्या ऐतिहासिक घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 9 मार्च 1996 रोजी वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानचा तेंव्हाचा कॅप्टन आमिर सोहेल (Aamir Sohail) याच्या उद्दामपणाला पुढच्याच बॉलवर प्रसादनं त्याला आऊट करुन (Prasad vs Sohail) उत्तर दिले होते.

मॅचमध्ये काय झालं?

क्रिकेट वर्ल्ड कपच्या बाद फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) ही हाय व्होल्टेज लढत पहिल्यांदाच होत होती. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या त्या लढतीच्या टॉसपूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन वासिम अक्रमनं (Wasim Akram) दुखापतीचं कारण देत माघार घेतली होती. नवजोत सिंग सिद्धूचे 93 रन आणि अजय जडेजाची 25 बॉल 45 रनची आक्रमक इनिंग याच्या जोरावर भारतानं पहिल्यांदा बॅटींग करताना 8 आऊट 287 असा आव्हानात्मक स्कोअर उभा केला.

पाकिस्तानची आक्रमक सुरुवात

अक्रमच्या अनुपस्थितीमध्ये पाकिस्तानची कॅप्टनसी सांभाळणारा आमिर सोहलनं सईद अन्वरच्या (Saeed Anwar) साथीनं पाकिस्तानला जोरदार सुरुवात करुन दिली. थोड्या वेळापूर्वी अजय जडेजा वकार युनुसची धुलाई करत असताना मैदान डोक्यावर घेणाऱ्या प्रेक्षकांमध्ये टाचणी पडेल इतकी शांतता पसरली होती. ‘ही जोडी लवकर फुटू दे’, अशीच प्रार्थना मैदानातील प्रेक्षक करत होते.

जवागल श्रीनाथनं (Javagal Srinath) 11 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सईद अन्वरला आऊट करुन भारताला पहिलं यश मिळवून दिले. अन्वर परतला असला तरी सोहेल भरात होता. त्याने पाकिस्तानची सेंच्युरी आणि स्वत:ची हाफ सेंच्युरी पूर्ण केली होती.

…आणि तो क्षण आला!

माणसाकडं सर्व अधिकार असतात तेंव्हा तो कसा वागतो यावर त्याचं व्यक्तिमत्व कळतं. क्रिकेटमध्ये पूर्ण भरात खेळणारा खेळाडू त्याच्या वागण्यातून समोरच्या खेळाडूचा किती आदर करतो यावरुन त्याच्या बद्दलच्या आदराची फुटपट्टी कमी-जास्त होत असते.

आमिर सोहलला त्याचं भान राहिले नाही. व्यंकटेश प्रसाद पाकिस्तानच्या इनिंगमधील 15 वी ओव्हर टाकत असताना त्याचा संयम सुटला. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर सोहेलनं प्रसादला फोर मारला. तो फक्त फोर मारुन थांबला नाही. तर तो बॉल ज्या दिशेनं गेला आहे, त्या दिशेला बॅट दाखवत मी पुन्हा एकदा तसाच शॉट मारणार आहे आणि तुझ्या बॉलची तिथंच जागा आहे, असं त्यानं प्रसादला डिवचलं.

सोहलची ती कृती ती मॅच पाहणाऱ्या प्रत्येकला राग आणणारी होती. प्रसादही साहजिकच संतप्त झाला होता. प्रसादनं त्याला पुढच्याच बॉलवर बोल्ड केले. आमिरच्या उद्दापणाला प्रसादनं चोख उत्तर (Prasad vs Sohail) दिले.

मॅचमध्ये पुढे काय झालं?

आमिर सोहेल आऊट झाल्यानंतर भारतानं मॅचवर पकड मिळवली. एजाज अहमद आणि इंझमाम उल हक झटपट आऊट झाले. जावेद मियाँदाद (Javed Miandad) आणि सलिम मलिक (Salim Malik) या अनुभवी जोडीनं पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आवश्यक रन रेट राखता आला नाही.

( वाचा : इशांत शर्मा @100 : ‘वो तो है अलबेला, हजारों मे अकेला’!

अखेर ती जोडी फुटली आणि पाकिस्तानच्या पराभवाची औपचारिकता पूर्ण झाली. जावेद मियाँदादच्या तीन दशकांच्या आंतरराष्ट्रीय करियरमधील ती शेवटची मॅच ठरली. प्रसाद वि. सोहेल ही लढत (Prasad vs Sohail) त्या मॅचमधील टर्निंग पॉईंट होती. त्यामुळेच भारतानं पाकिस्तानला पराभूत करुन वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: