लेखक: निरंजन वेलणकर

फोटो – ट्विटर

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशा दिग्गजांच्या सोबत खेळूनही स्वत:ही छाप सोडणारा आणि एक अतिशय वेगळ्या प्रकारच्या फलंदाजीचा ब्रँड निर्माण करणारा विक्रमवीर म्हणजे वीरेंद्र सेहवाग! (Virender Sehwag) ज्याने क्रिकेट कसं खेळावं ह्याचे नवीन मापदंड घालून दिले असा अविश्वसनीय खेळाडू म्हणजे सेहवाग! नंतरच्या फळीतल्या अगदी डेव्हिड वॉर्नरसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही “सेहवागची मुले” म्हंटलं जावं इतका मोठा प्रभाव क्रिकेटवर सोडलेला तीक्ष्ण नजरेचा चाणाक्ष खेळाडू म्हणजे सेहवाग!

मुलतानचा सुलतान!

भारत व पाकिस्तान ( India vs Pakistan) ह्यांच्यात झालेल्या पाकिस्तानातल्या आजवरच्या शेवटून दुस-या टेस्ट सीरिजमध्ये म्हणजे मार्च 2004 मध्ये मुलतान येथे झालेल्या टेस्टमध्ये सेहवागने भारताकडून पहिल्यांदा ट्रिपल सेंच्युरी झळकवण्याचा मान मिळवला! या ट्रिपल सेंच्युरीपूर्वीच त्याने वन डे क्रिकेटच्या वेगाने खेळून टेस्ट जगतावर स्वत:चा ठसा उमटवला होता. अनेक वेगवान खेळ्या व विशेषत: ऑस्ट्रेलियातली त्याची 195 रन्सची खेळी ह्याची साक्ष होती. त्या खेळीमध्ये 195 रन्सवर असताना सिक्स मारण्याच्या प्रयत्नात तो आउट झाला! परंतु त्याचं मन इतकं कणखर आणि तयारी इतकी प्रखर की त्याने ट्रिपल सेंच्युरी ही सकलेन मुश्ताकला सिक्स मारूनच पूर्ण केली! तोपर्यंत भारताकडून कोणीही ट्रिपल सेंच्युरी झळकावलेली नव्हती! तो मान सेहवागला मिळाला ज्याच्यावर खरं‌ तर अतिशय बेभरवशाचा- बेजवाबदार आणि फक्त शॉटस खेळणारा खेळाडू हा शिक्का बसलेला होता!

पण, मुलतानच्या ह्या सामन्यामध्ये (Multan Test 2004) 29 मार्च 2004 रोजी सेहवागने शोएब अख्तर, महंमद सामी, शब्बीर अहमद, अब्दुल रझ्झाक अशा पाकिस्तानी बॉलर्सना अनंत काळ लक्षात राहील असा मार देऊन दिमाखामध्ये सिक्स मारूनच त्याची पहिली ट्रिपल सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमध्ये अगदी हाफ सेंच्युरी करणं हीसुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे. वनडे मॅचमध्ये एखादा खेळाडू लाटेवर स्वार होऊन सहजपणे कधी हाफ सेंच्युरी करूनही जातो. पण टेस्टमध्ये आणि तेही सलामीवीर म्हणून हाफ सेंच्युरी, नंतर सेंच्युरी, नंतर 150 रन, डबल सेंच्युरी व पुढे ट्रिपल सेंच्युरी करणं ही गोष्ट अतिशय कष्टसाध्य! त्यामुळे सेहवाग हा फक्त अद्भुत फलंदाज ठरत नाही तर तो एक अविश्वसनीय विचारांचा धनी ठरतो आणि अखंड प्रेरणास्रोत ठरतो.

( वाचा : जेंव्हा वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारताने चेन्नई टेस्ट जिंकली होती! )

‘All or Nothing’

जिथे इतर सर्व जण मान झुकवतात, जिथे इतरांची नाणी चालत नाहीत, तिथे कायम सेहवाग त्याच्या खास शैलीत खेळतो. आणि हर्षा भोगलेने म्हंटल्याप्रमाणे सेहवागची बॅटींग ही नेहमी all or nothing ह्यापैकी एकच असते. त्याच मालिकेतल्या अगदी पुढच्याच मॅचमध्ये तो शून्यावर आउट झाला होता! पण म्हणून त्याने निर्माण केलेला परिणाम, जगातल्या सर्व बॉलर्सना त्याने दिलेली दहशत आणि त्यांच्यावर गाजवलेलं वर्चस्व मागे पडत नाही. दक्षिण आफ्रिकन दिग्गज गोलंदाज शॉन पॉलॉकला एकाने एकदा विचारलं की, कोणत्या भारतीय फलंदाजाला तू घाबरायचास- सचिन, गांगुली का अझहरुद्दीन? त्यावर त्याचं उत्तर होतं सेहवाग!

भारताचा 2004 चा पाकिस्तान दौरा अविस्मरणीय ठरला. पहिल्या मॅचमध्ये सेहवागच्या ट्रिपल सेंच्युरीच्या बळावर भारताने मॅच जिंकलीच. पण त्यावेळी द्रविडच्या तात्पुरत्या नेतृत्वातल्या सामन्यामध्ये भारताच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयावर मोठी चर्चा झाली! कारण तेव्हा सचिन 194 रनवर नाबाद होता! पण सचिननं 194 रनसाठी 348 बॉल घेतले होते व जवळ जवळ तितक्याच बॉलमध्ये म्हणजे 374 बॉलमध्ये सेहवागने 309 रन केले होते! भारताच्या पाकिस्तानवरील वर्चस्वाच्या स्वर्णिम आठवणींमध्ये सेहवागने पाकिस्तानी बॉलर्सची नेहमी केलेली धुलाई सदैव लक्षात राहील. आणि त्या धुलाईच्या मालिकेची सुरुवात इथून झाली! नंतरही सेहवागने पाकिस्तानविरुद्ध एकदा 247 बॉलमध्ये 254 रन ठोकले आणि अनेक महत्त्वपूर्ण खेळीही केल्या.

( वाचा : ON THIS DAY : द्रविड-लक्ष्मण दिवसभर खेळले आणि ऑस्ट्रेलियाची XX XX ली! )

सेहवागला मुलतानचा सुलतान बनवणारी खेळी ही काही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली नाही. त्याने पुढे आणखीही एक ट्रिपल सेंच्युरी केली. योगायोगाने ती सुद्धा मार्च महिन्यात आणि चेन्नईच्या तीव्र उन्हामध्ये व आर्द्रतेमध्ये केली! आणि एकदा तर तो 293 रनवरही आउट झाला! सेहवागच्या बाबतीतली एक मोठी गोष्ट म्हणजे अगदी 99 वरही आऊट झाला तरी त्याच्या मनात कोणतीही खंत कधीच नसायची. दुस-या क्षणी त्याच्या चेह-यावर परत हसू यायचं! त्याची मानसिकता तर अशीच असायची-

ग़म और ख़ुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ

मै खुद को उस मक़ाम पे लाता चला गया

त्यामुळे जेव्हा असा एखादा खेळाडू larger than life बनतो, तेव्हा तो निव्वळ खेळाडू राहात नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही जिद्द ठेवा ही प्रेरणा देणारा प्रेरणास्रोत होतो. अनेकदा जीवनाच्या धावपळीमध्ये अंगातलं बळ हरवून जाण्याची वेळ येते. तेव्हा असा विक्रमवीर नवी ऊर्जा आणि नवीन प्रेरणा देऊन आपल्याही आयुष्यात प्राण फुंकतो!

( निरंजन वेलणकर, हे फिटनेसप्रेमी, सायकलिस्ट आणि क्रिकेट फॅन आहेत. तुम्ही त्यांना niranjanwelankar@gmail.com या ईमेलवर संपर्क करु शकता. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: