फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कपनंतर लगेच पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) घरी न परता बांगलादेशच्या दौऱ्यावर गेली आहे. बांगलादेशमध्ये 3 T20 आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज ही टीम खेळणार आहे. हा दौरा सुरू होण्यापूर्वीच या टीमला देशातून हाकलून देण्याची मागणी बांगलादेशमध्ये झाली. प्रॅक्टीस करताना पाकिस्ताननं त्यांचा झेंडा लावणं हे यासाठी निमित्त ठरलं. बांगलादेशच्या नागरिकांना हे पाकिस्ताननं आपल्या देशावर केलेलं आक्रमण वाटलं. त्यानंतर पाकिस्तानी मॅनेजमेंटनं स्पष्टीकरण देत सारावासारव केली आहे. पण, पाकिस्तान टीमच्या या दौऱ्यामुळे त्यांनी पूर्व पाकिस्तानला म्हणजेच आजच्या बांगलादेशच्या क्रिकेटला कशी वागणूक दिली? बांगलादेशच्या निर्मितीपूर्वी पूर्वी पाकिस्तानात क्रिकेट (East Pakistan Cricket) कसं होतं, हे समजून घेणे आवश्यक आहे.

14 ऑगस्ट1947 या दिवशी ब्रिटीशांनी भारताची फाळणी केली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. भारताच्या पश्चिमेकडील चार राज्य (पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत) आणि पूर्वेचं एक (पूर्व बंगाल) या पाच राज्यांचा मिळून पाकिस्तान हा देश ब्रिटीशांनी तयार केला. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये पश्चिम पाकिस्तानातील सरकारनं पूर्वेकडील नागरिकांचा अतोनात छळ केला. त्यानंतर भारतीय लष्करानं त्यांची या अत्याचारातून मुक्तता करत बांगलादेशची निर्मिती केली. पाकिस्तानच्या बांगलादेश दौऱ्यातील पहिली मॅच आज (19 नोव्हेंबर 2021) रोजी होणार आहे. त्या निमित्तानं तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील किती क्रिकेटपटू पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये खेळले हे जाणून घेणे योग्य आहे.  

क्रिकेट, पाकिस्तानी फोलपणाचे माध्यम

पाकिस्तानला एक करणारं माध्यम म्हणजे क्रिकेट, असा जगातील अनेकांचा समज आहे. वास्तविक पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच्या चार-पाच दशकातील क्रिकेट पाहिलं तर हे किती फोल आहे, हे लक्षात येते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरच्या क्रिकेटवर पंजाबमधील काही शहरं आणि कराचीमधील मोहाजीर (फाळणीनंतर भारतामधून पाकिस्तानात स्थायिक झालेल्या व्यक्ती) यांचाच समावेश होता. पश्चिम पाकिस्तानच्या अन्य खेळाडूंना त्यात स्थान नव्हते. पूर्व पाकिस्तानचा विषय खूप तर लांब होता.

पाकिस्तानमधील दोन प्रांताचा द्वेष क्रिकेटच्या मैदानावरही दिसत असे. 1968 साली कराचीमध्ये इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये स्थानिक प्रेक्षकांनी पाकिस्तानचा कॅप्टन सईद अहमदची टर उडवली होती. याचे कारण म्हणजे तो कराचीमधील मोहाजीर हनीफ मोहम्मदला हटवून पाकिस्तानचा कॅप्टन झाला होता.

कराचीमधील खेळाडूची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी करणे किंवा त्याला टीममधून वगळणे हा मोहाजीरांच्या गळचेपीचा मुद्दा बनत असे. कराचीतील या मोहाजीरांचे पाकिस्तानातील पंजाबी सोडा स्थानिक सिंधींशी देखील पटत नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो हे सिंधी पंतप्रधान असूनही टीममध्ये एकही सिंधी खेळाडू नाही, हा तेथील वृत्तपत्रांचा आक्षेप होता. कराचीमधील खेळाडू जावेद मियाँदादला देखील ते ‘आपलं’ मानण्यास तयार नव्हते.

भारतविरोधी विखार भरलेला क्रिकेटपटू कमी, गुंड जास्त

पूर्व पाकिस्तानातील क्रिकेट

पाकिस्तानच्या निर्मितीच्या पूर्वीपासून बंगालमध्ये क्रिकेट व्यवस्था (East Pakistan Cricket) होती. पाकिस्ताननं तेथील व्यवस्थेकडं लक्ष दिलं नाही. पूर्व पाकिस्तानच्या टीमला 1954 साली सर्वात प्रथम कायदे आझम ट्रॉफी ही स्थानिक पातळीवरची क्रिकेट स्पर्धा खेळता आली. त्यानंतर त्यांनी थेट 1959 साली ही स्पर्धा खेळली. त्यानंतर ती टीम 1969 पर्यंत या स्पर्धेत नियमित खेळली.

पूर्व पाकिस्तानचे एकूण 67 खेळाडू या स्पर्धेत खेळले. यापैकी 26 जणांनी फक्त 1 मॅच खेळली. तर फक्त 2 जण 10 पेक्षा जास्त मॅच खेळले. अब्दुल लतीफ या पूर्व पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी बॅट्समननं 15 तर दौलत झमननं 11 मॅच खेळल्या. अन्य कुणालाही कायदे-आझम स्पर्धेत दोन आकडी मॅच खेळता आल्या नाहीत. पश्चिम पाकिस्तानमधून नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं पूर्व पाकिस्तानात गेलेल्या क्रिकेटपटूंना मात्र त्या टीममध्ये (East Pakistan Cricket) नियमित संधी मिळत असे.

तीन्ही फॉरमॅटमध्ये मैदानावर जांभई देणारा क्रिकेटपटू

नाईलाज झाला म्हणून…

न्यूझीलंडची टीम 1969 साली टेस्ट मॅच खेळण्यासाठी पूर्व पाकिस्तानातील ढाकामध्ये आली होती. त्यावेळी त्या टीममध्ये पूर्व पाकिस्तानमधील बंगाली भाषिक खेळाडूचा समावेश केला नाही तर ही टेस्ट उधळून लावण्याचा इशारा बंगाली राष्ट्रवादी संघटनांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारच्या आदेशानंतर निवड समितीनं रकीबूल हसन (Raqibul Hasan) या तेंव्हा 16 वर्षांच्या खेळाडूचा पाकिस्तानच्या टीममध्ये समावेश केला. तो न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्टमध्ये 12 वा खेळाडू म्हणून खेळला.

त्यानंतर 1971 साली ढाकामध्ये कॉमवेल्थ XI विरुद्ध झालेल्या अनधिकृत टेस्टमध्ये त्याचा पाकिस्तानच्या अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यावेळी बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा जोरात होता. त्यामुळे ती अनधिकृत टेस्ट पूर्ण झाली नाही.

थोडक्यात, 1947 ते 1971 या काळात पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीममधील अंतिम 11 मध्ये एकही पूर्व पाकिस्तानचा खेळाडू (East Pakistan Cricket)  खेळला नाही. रकीबूल हसन हा निवडीच्या सर्वात जवळ आला होता. पण त्यालाही अंतिम संधी मिळाली नाही. अर्थात त्याच्या समावेशामागे सरकारी हस्तक्षेप आणि बांगलादेशी राष्ट्रवादी संघटनांची भीती हे मुख्य कारण होते.

Well Done! काश्मीर प्रीमियर लीगबाबत BCCI चा पाकिस्तानला हिसका

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 24 वर्ष पूर्व पाकिस्तानची क्रिकेटसह (East Pakistan Cricket) सर्व क्षेत्रात गळचेपी करणाऱ्या पाकिस्तान सरकारनं पाकव्याप्त काश्मीरसाठी स्वतंत्र लीग भरवली. तेथील क्रिकेटपटूंना नवं स्टेज देण्याचा पाकिस्तान सरकारचा हा दावा त्यामुळेच हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं करण्यात आला आहे.

संदर्भ

List of East Pakistan first-class cricketers

The ethnicities of Pakistani cricket

Meet the only Bengali to have played for Pakistan

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: