टेस्ट क्रिकेट वाचवणे, जिंकणे किंवा बाजूचे सर्व कोसळत असताना एकट्याने लढा देणे हे काम टीम इंडियासाठी सातत्याने करणारा बॅट्समन म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid). भारताची पाटा पिच असो किंवा परदेशातील स्विंग पिच द्रविडने सर्व पिचवर सातत्याने रन्स केले. त्यामुळे टेस्ट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध सेंच्युरी झळकवणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान त्याने मिळवला होता. राहुल द्रविडच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या परदेशातील पाच अविस्मरणीय इनिंगला उजाळा देऊया

270 वि. पाकिस्तान – रावळपिंडी 2004

रावळपिंडी टेस्टपूर्वी दोन्ही टीम्सने एक-एक टेस्ट जिंकल्या होत्या. त्यामुळे रावळपिंडी टेस्टला मोठं महत्वं आलं होतं. भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये 224 रन्सवर रोखलं. त्यानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने पहिल्याच बॉलवर त्या सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागला शून्यावर आऊट करुन भारतला मोठा धक्का दिला.

राहुल द्रविड इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला मैदानात उतरला. त्याने पुढे 740 मिनिटे आणि 495 बॉल्स बॅटिंग करत 270 रन्स काढले. पार्थिव पटेल, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुलीसोबत त्याने महत्त्वाच्या पार्टरनरशिप केल्या. द्रविडच्या त्या मॅरेथॉन खेळीमुळेच भारताला पहिल्या इनिंगमध्ये 600 रन्सचा डोंगर उभा करता आला. पुढे भारताने रावळपिंडी टेस्ट आणि ती सीरिज जिंकली. 270 हा द्रविडच्या टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअर आहे.

( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )

 233 वि. ऑस्ट्रेलिया – ॲडलेड 2003

ऑस्ट्रेलियाच्या 556 रन्सला उत्तर देताना भारताची 4 आऊट 85 अशी नाजूक अवस्था होती. त्यावेळी द्रविड-लक्ष्मण जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 303 रन्सची पार्टरनरशिप करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.

राहुल द्रविड आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मणची कोलकाता टेस्टनंतर आणखी एक अविस्मरणीय पार्टरनरशिप. कोलकाता टेस्टमध्ये लक्ष्मण मोठा भाऊ होता, तर ॲडलेडमध्ये द्रविड. द्रविडने सेहवाग स्टाईलने सिक्सर मारत त्याची सेंच्युरी पूर्ण केली. लक्ष्मण 148 रन्स काढून आऊट झाला. तर द्रविडने डबल सेंच्युरी झळकावली. चौथ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 230 रन्सचं टार्गेट असताना द्रविडने नाबाद 70 रन्स काढले. अखेर त्यानेच विजयी फटका लगावला. द्रविडच्या खेळीमुळेच भारताने तब्बल 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियात टेस्ट जिंकली.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

148 वि. इंग्लंड – हेडिंग्ले 2002

नेहमीच्या इंग्लिंश वातावरणात आणि स्विंग होणाऱ्या पिचवर सौरव गांगुलीने पहिल्यांदा बॅटिंग घेत सर्वांना धक्का दिला होता. सेहवाग झटपट आऊट झाल्याने हा निर्णय टीम इंडियावर उलटण्याची शक्यता होती. त्या परिस्थितीमध्ये द्रविडने संजय बांगरसोबत संयमी भागीदारी केली. डोईजड होऊ पाहणाऱ्या इंग्लंडच्या बॉलर्सना द्रविडने थोपवून धरलं.

द्रविडला 150 रन्सचा टप्पा पूर्ण करण्यात फक्त दोन रन्स कमी पडले. द्रविडच्या पायाभरणीनंतर सचिन आणि गांगुलीनेही सेंच्युरी झळकावत टीम इंडियाला मोठा स्कोअर उभा करुन दिला. टीम इंडियाने ती टेस्ट जिंकली. कठीण परिस्थितीमध्ये इनिंगची पायाभरणी करणाऱ्या राहुल द्रविडला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

148 वि. दक्षिण आफ्रिका – जोहान्सबर्ग 1997

राहुल द्रविडची टेस्ट पदार्पणात सेंच्युरी काढण्याची संधी पाच रन्सने हुकली. त्यानंतर त्याला पहिली सेंच्युरी झळकावण्यासाठी 1997 पर्यंत वाट पाहावी लागली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये त्याने पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. ॲलन डोनाल्ड, शॉन पोलॉक, लान्स क्लूसनर आणि ब्रायन मॅकमिलन या दक्षिण आफ्रिकेच्या चार फास्ट बॉलर्सचा सामना करत द्रविडने 148 रन्स काढले.

द्रविडने दुसऱ्या इनिंगमध्येही 81 रन्सची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 356 रन्सचे टार्गेट ठेवले. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची 8 आऊट 228 अशी नाजूक अवस्था झाली होती. त्याचवेळी आफ्रिकेच्या मदतीला पाऊस धावून आला आणि टीम इंडियाची विजयाची संधी हुकली.

( वाचा : सिडनी टेस्टच्या आठवणी : सचिन – वॉर्नची पहिली लढाई, लक्ष्मणचा उदय आणि ऐतिहासिक मालिका विजय! )

190 आणि 103* वि. न्यूझीलंड – हॅमिल्टन 1999

भारतीय बॅट्समन्सची नेहमीच परीक्षा पाहणाऱ्या हॅमिल्टनच्या पिचवर राहुल द्रविडने दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावत टीम इंडियाचा पराभव टाळला. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 366 रन्सचा आव्हानात्मक स्कोअर केला होता. त्यावेळी द्रविडने एका बाजूने किल्ला लढवत 190 रन्स काढत टीम इंडियाला 50 रन्सची आघाडी मिळवून दिली.

टीम इंडियासमोर चौथ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 415 रन्सचे मोठे टार्गेट होते. त्यावेळी भारताची अवस्था दोन आऊट 55 अशी झाली होती. त्यावेळी द्रविडने गांगुलीच्या मदतीने आणखी पडझड होऊ न देता टेस्ट ड्रॉ केली. दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणारा द्रविड हा विजय हजारे, सुनील गावस्कर यांच्यानंतरचा तिसरा भारतीय बनला.

सूचना – * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: