फोटो – ट्विटर/WisdenIndia

देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज फास्ट बॉलर बॉलर पंकज सिंह रिटायर (Pankaj Singh Retires) झाला आहे. पंकजचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट बहरण्याआधीच कोमजलं. पण, तो रणजी क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फास्ट बॉलर होता. राजस्थानला दोन रणजी विजेतेपद मिळवून देण्यात त्याच्या बॉलिंगचे मोठे योगदान होते. पंकजने 2004 साली पदार्पण केले. त्यानंतर 2018 पर्यंत राजस्थानच्या टीमचा सदस्य होता. तो शेवटची काही सिझन पुदुच्चेरीकडून खेळला. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. भारतीय क्रिकेटमध्ये ‘अनलकी पंकज’ (Unlucky Pankaj) अशी देखील त्याची ओळख आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज

पंकज सिंहची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर 2007-08 साली ऑस्ट्रेलियावर गेलेल्या टीममध्ये निवड झाली. अंडर 19 वर्ल्ड कप, नॅशनल क्रिकेट अकदामी, एमआरएफ फाऊंडेशन, रणजी क्रिकेट हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पाडत पंकज ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता.

पंकजकडे फास्ट बॉलर्सला आवश्यक अशी अंगकाठी होती. त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन चांगली होती. त्याच्याकडे बाऊन्स आणि स्विंग दोन्ही होते. तो जुना बॉल आऊट स्विंग करु शकत असे. आपल्याकडच्या अस्त्रांचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेलं क्रिकेटचा मेंदू त्याच्याकडे होता. तो कॅप्टनसोबत विकेट प्लॅन करत असे. ती विकेट घेण्यासाठी आवश्यक कष्ट घेण्याची त्याची नेहमी तयारी असे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाटा पिचवर त्याने सातत्याने मिळवलेलं यश हे त्याचे उदाहरण (Pankaj Singh Retires) आहे.

पर्थ टेस्टमध्ये हुकली संधी

पंकजची पहिल्यांदा निवड झाली तो ऑस्ट्रेलिया दौरा क्रिकेटबाह्य कारणामुळेच बराच गाजला. सिडनी टेस्टमधील मंकीगेट प्रकरणानंतर दौरा अर्धवट सोडून टीम येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

सिडनीनंतर पर्थ टेस्ट होती. त्या टेस्टमध्ये पंकजला पदार्पण करण्याची संधी मिळणार असंच मानलं जात होतं. पण टीम मॅनेजमेंटने नवोदीत पंकजच्या ऐवजी इराफान पठाणला (Irfan Pathan) त्याच्या बॅटींगमधील स्कील पाहून संधी दिली. त्या सीरिजमधील इराफानची ती पहिली टेस्ट होती. पर्थ टेस्टमध्ये रिकी पॉन्टिंगला टाकलेल्या एका स्पेलमुळे टीम इंडियाला इशांत शर्मा (Ishant Sharma) मिळाला. पंकज संपूर्ण ऑस्ट्रेलिया सीरिज बेंचवर होता. एकदाही अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी न मिळूनही त्याला टीम इंडियातून वगळण्यात (Pankaj Singh Retires) आले.

थेट 2014 साली संधी

पंकज सिंह ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सातत्याने चांगली कामगिरी करत होता. 2010 साली झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला एकमेव वन-डे खेळायला मिळाली. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन आयपीएल टीमकडून खेळला. पण त्याची बॉलिंग आयपीएल स्पर्धेला साजेशी नव्हती. राजस्थानला दोन सलग रणजी विजेतेपद मिळवून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याची 2014 साली इंग्लंड दौऱ्यावर निवड झाली.

अनलकी पंकज

इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टच्या सीरिजमध्ये (India vs England) पंकजनं तिसऱ्या टेस्टमध्ये साऊथम्पटनमध्ये पदार्पण केले. इशांत शर्मा जखमी झाल्यानं त्याला टीममध्ये संधी मिळाली. त्या सीरिजमध्ये दोन टेस्टनंतर टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर होती. साऊथम्पटनचं मैदानही त्याला मदत करणारे होते. पंकजला पदार्पण करण्यासाठी सर्व काही सेट होते.

पंकजला मैदानाचा वापर करत चांगली बॉलिंग करण्याची गरज होती. त्याने ती केली. इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्सना त्याने अडचणीत आणले. त्याच्या करियरमधील 13 व्या बॉलवर पंकजनं मोठी संधी निर्माण केली होती. पंकजनं टाकलेला बॉल इंग्लंडचा कॅप्टन अ‍ॅलिस्टर कुकला (Alastair Cook) नीट खेळता आला नाही. तो थेट स्लीपच्या फिल्डरच्या दिशेनं गेला. नुसत्या दिशेनं नाही तर त्याच्या हातात तो बॉल जात होता. स्लिपमध्ये टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) उभा होता. जडेजानं तो कॅच सोडला. कुकनं पुढे 95 रन केले.

पंकजने त्या टेस्टमध्ये अनेक संधी निर्माण केल्या. त्याने 156 रन काढणाऱ्या गॅरी बॅलन्सला चकवले. 80 ओव्हरनंतर धोनीनं नवा बॉल घेतला. नव्या बॉलवर पंकजनं इयान बेलला LBW पकडले. पंकजनं जोरदार अपिल केलं. त्याच्या क्रिकेट करियरमधील कदाचित ते सर्वात जोरदार अपिल असावं. त्याची आजवरची सर्व मेहनत, त्याची आणि त्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांसाठी त्याने ते अपिल केलं होतं. त्या अपिलाचाही अंपायरवर काही परिणाम झाला नाही. अंपायरचं बोट वर आलं नाही.

साऊथम्पटन टेस्टमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) एक विकेट मिळाली. अंपायरच्या वादग्रस्त निर्णयाचा त्याला फायदा झाला. मोईन अलीला (Moeen Ali) अगदी हाफ पिच बॉलवर अजिंक्य रहाणेनं मारलेल्या खराब शॉटवर यश मिळाले. पंकजच्या बॉलवर तो कॅच आणि टीम इंडियासाठी मॅच सोडणाऱ्या जडेजानं त्या प्रकारचे 100 पैकी 99 कॅच अगदी एका हाताने घेतले असते. तो नेमका एक चुकलेला कॅच, निसटलेला क्षण पंकजच्या वाट्याला आला.

चितेकी चाल, बाज की नजर और जडेजा का थ्रो… पाहा VIDEO

पंकज बॉलिंग करत होता. संपूर्ण इनिंगमध्ये पंकजला विकेट मिळाली नाही. चांगली बॉलिंग होऊनही अशा प्रकारची इनिंग फास्ट बॉलरच्या आयुष्यात येते, हे पंकजला माहिती होते. ती इनिंग टेस्ट पदार्पणातच पंकजच्या वाट्याला आली. पुढे जोस बटलरनं (Jos Buttler) पंकजच्या जखमेवर मीठ चोळले. त्याच्या एका ओव्हरमध्ये 20 रन काढले. त्या एका खराब ओव्हरनंतर पंकज टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात एकही विकेट न घेता सर्वात जास्त रन देणारा बॉलर बनला.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 420 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा

26 स्पेल 69 ओव्हर्स 415 बॉल

पंकजला पहिल्या टेस्टमध्ये एकही विकेट मिळाली नाही. महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या प्रयत्नाचं मॅच संपल्यानंतर कौतुक केलं. पण टेस्ट क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी फक्त कौतुक नाही तर मैदानातील भक्कम कामगिरी देखील तितकीच आवश्यक असते.

पंकजला अखेर त्याच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पहिलं यश मिळालं. 26 स्पेल 69 ओव्हर्स आणि 415 बॉलनंतर त्याला जो रुटच्या (Joe Root) रुपात पहिले यश मिळाले. त्यानंतर त्याने बटलरला आऊट करत विकेटची संख्या दोन केली. पंकजनं खेळलेल्या दोन्ही टेस्टमध्ये टीम इंडियानं मोठ्या फरकानं गमावल्या. दोन मोठ्या पराभवानंतर सीरिजमध्ये मागे पडलेल्या टीम इंडियात बदल होणार हे स्वाभाविक होते. त्या बदलसाठी पंकज सिंह हा स्वाभाविक पर्याय होता. त्यानंतर पंकज पुन्हा कधीही टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात (Pankaj Singh Retires) दिसला नाही.

धोनीचा सल्ला

पंकज सिंहची ‘अनलकी पंकज’ अशी इंग्लंड दौऱ्यानंतर ओळख झाली. स्वत: पंकजला ती ओळख, त्या ओळखीतून मिळणारी सहानुभूती नको होती. ‘आयुष्यात लक असं काही नसतं. तुम्ही स्वत: तुमचं नशिब घडवायचं असतं.’ हा महेंद्रसिंह धोनीनं दिलेला सल्ला पंकजनं मानला. सात वर्ष प्रयत्न केले. त्याला संधी मिळाली नाही.

पंकजनं आता कोच व्हायचं ठरवलं आहे. कोचिंगच्या अभ्यासक्रमाच्या दोन लेव्हल त्याने पूर्ण केल्या आहेत. तो लवकरच त्याच्या नव्या भूमिकेत दिसेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळालेली लवकर संधी आणि झटपट यश ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशीरा मिळालेली संधी, अपुरं यश आणि नंतर कायमचे बाहेर हे दोन टोकाचे अनुभव पंकजनं 17 वर्षाच्या करियरमध्ये (Pankaj Singh Retires)  घेतले आहेत. या अनुभवातून तो त्याच्या शिष्यांना घडवेल. त्याचे शिष्य क्रिकेटच्या मैदानात कोणतेही आव्हान पेलण्यास सज्ज असतील अशी खात्री आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: